भावाच्या मृत्यूचा वचपा काढण्याच्या उद्देशाने डॉ. धर्मकारे यांचा आरोपींनी केला निर्घुण खून
गोळया झाडून हत्या केल्याच्या या गुन्ह्यातील ४ आरोपींना यवतमाळ जिल्हा पोलीसांनी केले जेरबंद
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड/उमरखेड : उमरखेड येथील आर.पी.उत्तरवार कुटीर रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी नांदेड चे भूमिपुत्र डॉ.हनुमंत संताराम धर्मकारे यांची उमरखेड-पुसद रोडवर साखळी महाविदयालय समोर एका अज्ञात इसमाने गोळया झाडून हत्या केली.या प्रकरणात डॉ.हनुमंत धर्मकरे यांना गोळ्या घालून ठार करणारा मारेकरी हा दुचाकी अपघातात मयत झालेल्या एका रुग्णाचा भाऊ असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून सदरील आरोपीने भावाच्या मृत्यूचा वचपा काढण्यासाठी हा निर्घुण खून केल्याची माहिती यवतमाळ चे पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली आहे.तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी फरार असून ४ आरोपींना जेरबंद करण्यात यवतमाळ पोलीसांना यश आले आहे.
अधिक असे की,दि.११ जानेवारी २०२२ रोजी सांयकाळी ४:४५ ते ५:०० वाजताच्या दरम्यान उमरखेड येथील आर. पी.उत्तरवार कुटीर रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. हनुमंत संताराम धर्मकारे यांची उमरखेड-पुसद रोडवर साखळी महाविदयालय समोर एका अज्ञात इसमाने गोळया झाडून हत्या केली.सदरील घटनेचे तीव्र पडसाद यवतमाळ, नांदेडसह राज्यात उमटले.याचे गांभीर्य लक्षात घेऊन यवतमाळ चे पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी तात्काळ उमरखेडला जाऊन घटनास्थळाची पाहणी केली.तसेच पोलीस स्टेशन उमरेखड,बिटरगाव,पोफाळी, दराटी यांचे प्रत्येकी एक एक पथक,स्थागुशा येथील चार पथके व सायबर सेलचे दोन पथके असे एकुण दहा पथके तयार करण्यात आली.सदरील पथकांना योग्य ते मार्गदर्शन करुन जिल्ह्यातील व जिल्ह्यालगतच्या सर्व सिमा सिल करण्यात आल्या.स्थागुशा व सायबर सेल यांनी मृतक यांचा पुर्व इतिहास,कौटुंबिक कलह व आर्थिक वाद याची पडताळणी केली,घटनास्थळावरील तसेच उमरेखड शहरातुन बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्याचे व जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार यांना तपासण्याचे आदेश दिले.
वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत धर्मकारे यांचा पुर्व इतिहास, कौटुंबिक पार्श्वभूमि व आर्थिक वाद यावरुन डॉक्टर यांचे मृत्यूस असे भक्कम कारण शोधण्याकरीता प्रयत्न करण्यात आले.तसेच डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्या वैद्यकिय सेवाकाळात घडलेल्या घटनांबाबतची सखोल माहिती प्राप्त करण्यात आली.त्याचदरम्यान सन २०१९ मध्ये पोलीस स्टेशन उमरखेड अप क्रं. १९६/२०१९ कलम २७९,३०४ (अ) भादवि मधिल मृतक नामे शेख अरबाज शेख अब्रार याचा दि.०४ मे २०१९ चे रात्री २:०० वाजताच्या सुमारास शिवाजी चौक उमरखेड येथे दुचाकीचा अपघात झाला होता,त्या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास शासकीय रुग्णालय उमरखेड येथे उपचाराकरीता भरती करण्यात आले होते.यावेळी उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू झाला.त्यावेळस आर.पी.उत्तरवार कुटिर रुग्णालय येथे डॉ. हनुमंत धर्मकारे हे कर्तव्यावर हजर होते.डॉ.हनुमंत धर्मकार यांच्या हलगर्जीपणामुळेच अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी त्यावेळी केला होता. त्यादरम्यान पोलीसांनी घटनेची शहानिशा करून वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करुन प्रकरण हाताळले होते. त्यावेळेस मृतकाचा लहान भाऊ नामे ऐफाज अब्रार शेख व त्याचे इतर नातेवाईक यांनी डॉक्टरांसोबत हुज्जतबाजी करुन त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी ही दिली होती.
सदरील प्रकरणातील तांत्रिक बाबींचे बारकाईने विश्लेषन केले असता व या घटनेतील प्राप्त संशईतांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये दिसत असलेला संशईत इसम हा शेख ऐफाज शेख अब्रार याच्या सारखा चहरापट्टी व शरीरयष्टीचा दिसत असल्याने त्याबाबत गोपनिय बातमीदाराची नेमणूक करुन अधिक माहिती काढली असता आरोपी नामे ऐफाज ऊर्फ अप्पु शेख अब्रार(२२) याने त्याचे मामा नामे सैय्यद तौसिफ सैय्यद खलील(३५) रा.ढाणकी व त्याच्या इतर मित्रांच्या मदतीने डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना ठार मारुन ढाणकी येथून पसार झाल्याची गोपनीय माहिती मिळाली.सदरील गोपनीय माहितीची व तांत्रिक बांबीची सांगड घालून गुन्हयातील आरोपी नामे सैय्यद तौसिफ सैय्यद खलील (३५), सैय्यद मुस्ताक सैय्यद खलील(३२),शेख मोहसिन शेख कय्युम (३४),शेख शहारुख शेख आलम(२७) सर्वजण रा.ढाणकी यांना शिताफीने ताब्यात आले.त्यानंतर कौशल्याने त्यांची विचारपुस करण्यात आली असता त्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शेख ऐफाज शेख अब्रार(२२) याने डॉ.हनुमंत धर्मकारे यांचेवर पाळत ठेऊन त्यांच्यावर गोळया झाडुन ठार केले व त्वरीत ढाणकी गाठले.तर गुन्हयात वापरलेली दुचाकी त्याने ढाणकी येथील त्याचा मामा सैय्यद तौसिफ सैय्यद याच्या ताब्यात दिली व त्याच्या इतर साथीदाराच्या मदतीने ढाणकी येथुन तो पसार झाला.शेख ऐफाज शेख अब्रार याने आपला भाऊ शेख अरबाज ऊर्फ हड्डी शेख अब्रार यांच्या मृत्यूचा वचपा व बदला घेण्याच्या उद्देशाने तसेच त्याच्या भावाच्या मृत्युचा प्रतिशोध घेण्याच्या उद्देशाने डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्यावर गोळ्या झाडून ठार मारल्याची खळबळजनक माहिती निष्पन्न झाली आहे.
सदरील गुन्हयामध्ये सैय्यद तौसिफ सैय्यद खलील(३५), सैय्यद मुस्ताक सैय्यद खलील(३२),शेख मौहसिन शेख कय्युम(३४), शेख शहारुख शेख आलम(२७) सर्वजण रा.ढाणकी यांना अटक करण्यात आली आहे.तसेच सदरील गुन्हयातील मुख्य आरोपीस पसार करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन क्रं.एम.एच.०४ डी. एन.६२६३ हस्तगत करण्यात आले आहे.तर मुख्य आरोपी मारेकरी हा फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी दहा पोलीस पथके वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत.सदरील गुन्ह्याचा उद्देश/हेतु याबाबत अधिक सखोल तपास करण्यात येत आहे.याच बरोबर सदरील गुन्ह्याच्या तपासामध्ये भा.द.वि.चे कलम १०९,१२० (च).२१२ भारतीय हत्यार कायदा कलम ३. २७ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३ (२) (व्ही) ची वाढ करण्यात आली आहे.
हा गंभीर गुन्हा उघडकीस आणण्याकरीता रवतमाळचे पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ,अपर पोलीस अधिक्षक के.ए.धरणे,उमरखेड उपविभागिय पोलीस अधिकारी प्रदिप पाडवी,स्थागुशाचे पो.नि.प्रदिप परदेशी,पो. स्टे.उमरखेडचे पो.नि.अमोल माळवे,पो.स्टे.बिटरगाव व पो. स्टे.दराटी चे ठाणेदार,सायबर सेलचे प्रभारी अधिकारी अमोल पुरी यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र परीश्रम घेऊन या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला असून फरारी मुख्य आरोपीस देखील लवकरच जेरबंद करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
अत्यंत गंभीर,संवेदनशील,आव्हानात्मक गुन्हयाचा तपास व्यावसायीक कौशल्याचा व नैपुण्याचा पुरेपुर उपयोग करीत ४८ तासात उघडकीस आणल्याबददल पोलीस अधिक्षक यवतमाळ यांनी तपास पथकातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना रुपये १ लाख रुपये रोख प्रोत्साहनपर बक्षीस,सीनोट, जीएसटी जाहीर केले आहे.