भारतीय संविधान हाच राष्ट्रीय धर्म-डॉ.शरद गायकवाड
प्रा.डॉ.शरद गायकवाड कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित
अंबुज प्रहार प्रतिनिधी
सातारा : भारतीय संविधान हाच समग्र भारतीयांचा खरा राष्ट्रीय धर्म आहे.त्याचे पालन केले पाहिजे,असे मत सामाजिक कार्यकर्ते,दलित णळवळीचे अभ्यासक तथा प्रख्यात वक्ते प्रा.डाॅ.शरद गायकवाड यांनी व्यक्त केले.येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तेराव्या कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी पुरस्कार प्राप्त सत्कार मुर्ती म्हणून ते बोलत होते.
पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी विचारमंचावर संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळे,उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे,कार्यवाह ॲड.हौसेराव धुमाळ,विश्वस्त डॉ. सुवर्णा यादव उपस्थित होते.नगरवाचनालयाच्या पाठक सभागृहात या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रा.डॉ.शरद गायकवाड यांना ज्येष्ठ साहित्यिक,अनुवादक,संपादक किशोर दिवसे यांच्या हस्ते कॅप्टन साहेबराव बनसोडे सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करण्यात आला.तर प्रा.सुवर्णा यादव यांनी पीएचडी पदवी प्राप्त केल्या बद्दल त्यांचा प्रमुख पाहुणे किशोर दिवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.प्रा.डॉ शरद गायकवाड यांना राजेंद्र गायकवाड यांनी फेटा बांधला.या वेळी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ शिक्षक आघाडी,ॲट्रॉसिटी जनजागरण कृती समिती,सातारा यांसह आदी संस्था,संघटना व व्यक्तींच्या वतीने सत्कार करण्यात आला.तसेच प्राचार्य भाऊसाहेब खराते यांनी प्रतिष्ठानचे आजीव सभासदत्वाचा पाच हजार रुपयांचा धनादेश यावेळी दिला.त्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदरचा १३ वा पुरस्कार असून प्रतिष्ठानचे संस्थापक सदस्य ज्येष्ठ दिवंगत सामाजिक कार्यकर्ते कॅप्टन साहेबराव बनसोडे यांच्या जन्मदिनी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे मानकरी प्रा.डॉ.शरद गायकवाड हे सातारा तालुक्यातील अंगापूर गावचे सुपूत्र आहेत.त्यांचे अलिकडेच प्रकाशित झालेले ‘प्रबोधन चळवळीतील मातंगांची शौर्यगाथा’ हे पुस्तक बहुचर्चित आहे.प्रा. गायकवाड हे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे अकादमीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बंधुत्व प्रतिष्ठानचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.याच बरोबर ऑक्टोबर २०१९ मध्ये रशियातील मॉस्को शहरात पुश्किन विद्यापीठात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी होण्याचा सन्मान त्यांना मिळाला आहे.थायलंड देशातील बँकॉक येथे पार पडलेल्या फुले-शाहू-आंबेडकर विचार व प्रसार जागतिक साहित्य संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. समताधिष्ठीत समाज प्रस्थापनेसाठी त्यांनी महापुरुषांच्या विचारांचे प्रबोधन जागरसाठी महाराष्ट्र,गोवा,आंध्र,कर्नाटक आदी राज्यात फिरून शेकडो व्याख्याने दिली आहेत.त्यांनी स्वतःच्या पोतराज परंपरेला तिलांजली देऊन अनेक पोतराजांचेही जटा निर्मूलनाचे कार्य केलेले आहे.पोतराज प्रथा व जटा निर्मूलन राज्य परिषदेचेही आयोजन केले होते.त्यांनी बहुजन समाजावरील अनेक अन्याय-अत्याचार प्रकरणांविरुद्धच्या अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतलेला आहे.म.फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीचे अनेक विवाह लावण्यात पुढाकार घेऊन त्यांचे पौरोहित्यही त्यांनी केले आहे.त्यांचे लिखित मातंग समाज : साहित्य आणि संस्कृती,ॲट्रॉसिटी कायदा,अण्णा भाऊंचा भाऊ – शंकर भाऊ साठे,बहुजनवादी साहित्य ( क्रांतीचं कुळ आणि बंडाचे मूळ ) यासह आदी ग्रंथ प्रकाशित झाले असून जागतिकीकारण आणि मराठी साहित्य,जागतिकीकरणाचा अवकाश आणि परिवर्तनाच्या चळवळी या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे.पहिले फुले- शाहू- आंबेडकर व मार्क्सवादी युवा सांस्कृतिक साहित्य संमेलन,कोल्हापूर व नाशिक येथील दुसरे दलित,भटके विमुक्त,ओबीसी व आदीवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.आतापर्यंत विविध ठिकाणी सुमारे २० पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले असून त्यांच्या अतुल्य कार्याची दखल घेऊन त्यांना उपरोक्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करतांना किशोर दिवसे म्हणाले की,समाजातील अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याची नितांत गरज आहे.तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञान कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे.तर सत्कार मुर्ती प्रा.डॉ.गायकवाड हे पुढे म्हणाले की,सातारच्या पुरोगामी चळवळीने मला घडवले आहे.युक्रेन वरील रशियाच्या आक्रमणावरुन जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाची गरज आहे हे सिद्ध झाले आहे. फुले- शाहू-आंबेडकर विचार प्रबोधनाचा जागर करणे, आंबेडकरवाद समाजामध्ये रुजवणे हेच आहे माझे ध्येय आहे.बौद्ध व मातंग समाजातील पिढ्यान पिढ्यांची दरी मुजवण्याचे व पंंचशीलाचा झेंडा फडकवण्याचे काम अखेरच्या श्वासापर्यंत मी करत रहाणार असल्याचा निर्धार ही प्रा.डॉ. गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.आपलं बालपण हलगी वाजविण्यात,पोतराजकीच्या अंधश्रद्धेत गेले.आता मी बुद्धाचा ध्यास घेतला असून ‘हलगी सोडा, माणसं जोडा ‘ मोहीम राबवून समाजा -समाजातील दरी कमी करण्यासाठी काम करत आहे,असे ते म्हणाले.
सोहळ्याचे प्रास्ताविक दिनकर झिंब्रे यांनी केले.तर पुरस्कार सत्कार मुर्ती व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.सुवर्णा यादव यांनी करुन दिला.रमेश इंजे यांनी संस्थेची व कॅप्टन पुरस्काराची माहिती दिली.तसेच हौसेराव धुमाळ यांनी सुरेख असे सूत्रसंचालन केले व उपस्थितांचे आभार यशपाल बनसोडे यांनी मानले.प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष केशवराव कदम, कॅप्टन साहेबराव बनसोडे यांच्या पत्नी यमुनाताई व बनसोडे कुटुंबीय,राजश्री गायकवाड,शाहू गायकवाड,जयवंत सावंत प्रकाश गायकवाड, नवनाथ लोंढे,पत्रकार अरुण जावळे, अनिल वीर,सुनील रोकडे, विष्णु धावडे,सर्पमित्र जनार्दन घाडगे,प्रकाश खटावकर,रघुनाथ बाबर,भालचंद्र माळी, शाहीर श्रीरंग रणदिवे,बळीराम भिसे,अमर गायकवाड, धनसिंग सोनावणे,संदीप जाधव,विजय लोंढे,जय टोणे, अरुण अडागळे,आदित्य लोखंडे यांसह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने या सोहळ्यास उपस्थित होते.