Mon. Dec 23rd, 2024

भगिणींचा आशिर्वाद देश रक्षणासाठी आम्हास उर्जादायी-लीलाधर महाराणीया(कमांडंट)

Spread the love

कें.रि.पो.बल प्रशिक्षण महाविद्यालय मुदखेड येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात साजरा

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर ने येथील ४ शाळांनी वीर जवानांसाठी दिलेल्या २ हजार ५०० राख्या व संदेश पत्र केले सुपूर्द

अंबुज प्रहार प्रतिनिधी

मुदखेड : माता,मातृभूमी अर्थातच देश रक्षणासाठी आम्ही सदैव कर्तव्यतत्पर असतोत.हे कर्तव्य पार पाडतांना आम्हास शुभेच्छा व आशिर्वादाची नक्कीच अपेक्षा असते.देशातील माता भगिणींच्या शुभेच्छा व आशिर्वाद आमच्या पाठीशी आहेच आणि आज रक्षा बंधनातून हजारो भगिणींनी आम्हास शुभेच्छारुपी आशिर्वाद दिला आहे तो आशिर्वाद देश रक्षणासाठी आम्हास उर्जादायी ठरणार आहे.असे प्रतिपादन केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालय मुदखेड चे मुख्य कमांडंट लीलाधर महाराणीया यांनी व्यक्त केले.केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात दि.५ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या ‘रक्षाबंधन’ कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.

लॉयन्स क्लब नांदेड,ब्रम्हकुमारी विश्व विद्यालय शाखा मुदखेड व राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर यांच्या सहभागातून केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालय,मुदखेड येथे दि.५ सप्टेंबर २०२३ रोजी वीर जवानांना राखी बांधण्याच्या निमित्ताने ‘रक्षाबंधन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयाच्या भव्य सभागृहात संपन्न झालेल्या ‘रक्षाबंधन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कमांडंट लीलाधर महाराणीया हे होते.तर डिप्टी कमांडंट अमित कुमार शर्मा,असिस्टंट कमांडंट जाकी कुमार, असिस्टंट कमांडंट वासुदेव,असिस्टंट कमांडंट हरी प्रसाद,एस.एम.दिनेश कुमार,असिस्टंट डॉ. निलेश यांसह लॉयन्स क्लब चे पदाधिकारी, ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या बहेणजी,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी यांसह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर च्या पदाधिकारी पत्रकार बांधवांनी वीर जवानांना ‘एक राखी व शुभेच्छा संदेश पत्र’ देण्याचे आवाहन शालेय विद्यार्थी भगिणींना केले होते.या आवाहनास भोकर येथील श्री शाहू महाराज विद्यालय भोकर,कै.लक्ष्मणराव घिसेवाड विद्यालय भोकर,कै.मंजुळाबाई किन्हाळकर मुलींचे विद्यालय भोकर,जि.प.कें. प्रा.नुतन शाळा भोकर च्या विद्यार्थी भगिनींनी उदंड प्रतिसाद दिला होता.या ४ शाळांच्या माध्यमातून जवळपास २ हजार ५०० राख्या व शुभेच्छा संदेश पत्र जमा झाली होती.त्या राख्या व शुभेच्छा संदेश पत्र एकत्र करुन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे पदाधिकारी मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड, कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,सचिव प्रा.आर.के. कदम,उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार, कमलाकर बरकमकर,कोषाध्यक्ष बालाजी कदम पाटील,सहसचिव विठ्ठल सुरलेकर, समन्वयक सुधांशू कांबळे,संघटक विशाल जाधव, पदाधिकारी सारंग शेठ मुंदडा,गजानन गाडेकर,संभाजी कदम,रमाकांत जोशी यांसह आदींनी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालय मुदखेड येथे नेले होते.संपन्न झालेल्या ‘रक्षाबंधन’ कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या उपरोक्त सर्व पदाधिकारी बांधवांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्य कमांडंट लीलाधर महाराणीया यांचा शॉल,पुष्पहार व मिठाई देऊन यथोचित सन्मान केला.तर पत्रकार संघाच्या वतीने सौ.रिता बाबळे,कु.भाग्यश्री बाबळे,कु.गायत्री कदम,कु. श्रुती सुरलेकर,कु.गौरी सुरलेकर,कु.द्रविडी कांबळे,कु.दीक्षा पडवळे,कु.मनस्वी पडवळे,कु. गौरी पडवळे,कु.रक्षा पडवळे,कु.अनुष्का गाडेकर,कु.सांची कदम यांनी त्या राख्या व शुभेच्छा संदेश पत्र केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले व उपस्थित अधिकारी,प्रशिक्षक आणि वीर जवानांचे औक्षण करुन राख्या बांधून,मिठाई भरवून शुभेच्छा दिल्या.तसेच लॉयन्स क्लबच्या पदाधिकारी भगिनी,ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या बहेणजींनी ही राखी बांधून शुभेच्छा दिल्या.

यावेळी लॉयन्स क्लब चे पदाधिकारी, ब्रम्हकुमारी विश्व विद्यालयाच्या बहेणजी यांनी आयोजित ‘रक्षाबंधन’ कार्यक्रमास अनुसरुन मनोगत व्यक्त केले.तर राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड यांनी ‘ वीर जवानांसाठी एक राखी व एक शुभेच्छा संदेश पत्र’ उपक्रमाविषयीची पार्श्वभूमी विषद केली.याचबरोबर उपस्थित वीर जवानांना शुभेच्छा दिल्या व सदरील राष्ट्रीय उपक्रमात सहभागी करून घेतल्यामुळे केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रमुखांचे आणि एक राखी एक संदेश पत्र देणाऱ्या शालेय विद्यार्थी भगिणींचे आभार मानले.तर अध्यक्षीय समारोप करताना मुख्य कमांडंट लीलाधर महाराणीया पुढे म्हणाले की,आई ही प्रत्येकांची पहिली गुरु व तद्नंतर शिक्षक, प्राध्यापक आणि जीवनपथावर भेटणारे अनेकजण गुरु असतात.पहिल्या गुरुस सर्वश्रेष्ठ स्थान असून त्या गुरुंसह आपल्या आपल्या माता,भगिणी यांचा शुभाशिर्वाद व पत्नींचे पाठबळ आम्हास घर संसार सोडून देश रक्षणासाठी उन,वारा,पाऊस यांसह शत्रूंशी सामना करण्याची शक्ती देते.त्यामुळे शिक्षक दिन व रक्षाबंधन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्ही स्त्री शक्तीस वंदन करतोत आणि सर्वांना शुभेच्छा देतोत,असे ही ते म्हणाले. सदरील कार्यक्रम प्रसंगी केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्रशिक्षणार्थी वीर जवानांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक,सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस.एम.दिनेश कुमार यांनी केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर सर्वांनी अल्पोपहाराचा स्वानंद घेतला व शस्त्र प्रदर्शिनीतून शस्त्रांची माहिती जवानांकडून घेतली.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !