भगव्या शिवमयी आनंदोत्सवात भोकरमध्ये शिवजन्मोत्सव साजरा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : दोन वर्षाच्या प्रतिबंध मुक्तीनंतर यावर्षी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची मुभा राज्य शासनाने दिली असल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.यामुळे अख्खे भोकर शहर भगव्या पताक्यांनी सजले व दुचाकी,चारचाकीच्या शहर प्रदक्षिणेसह भव्य मिरवणूकीने दि.१९ फेब्रुवारी रोजी भगव्या शिवमयी आनंदोत्सवात भोकरमध्ये विविध उपक्रमांनी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे शिवजयंतीसह सर्व धार्मिक सण उत्सवावर प्रतिबंध लावण्यात आले होते.परंतु यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने बऱ्याच प्रमाणात प्रशासनाने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमावरील प्रतिबंध हटवले. यामुळे आता दोन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर शिवजयंती सार्वजनिकपणे उत्साहात साजरी करण्याचा योग आल्याने शिवप्रेमी व भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण ओसंडून वाहताना दिसून आले.
सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती भोकरच्या वतीने अख्खे भोकर शहर भगव्या पताका व ध्वजांनी शिवमय करण्यात आले.मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त भव्यदीव्य असे अनेक शिवभक्तांनी शुभेच्छा फलके लाऊन अनेकांचे लक्ष वेधून घेतले.दि.१९ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता दुचाकी, चारचाकी वाहनांना भगवे ध्वज लाऊन व भगवे फेटे बांधून शिवप्रेमींनी माँसाहेब जिजाऊ चौक,तामसा रोड टी पॉईंट भोकर येथून मुख्य रस्त्याने भव्य रॅली काढली आणि या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी करण्यात आला.
यानंतर सकाळी ठिक १०:०० वाजता भोकर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा सौ.संगिता विनोद पाटील चिंचाळकर यांच्या हस्ते रयतेचे राजे आराध्र दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुळ्याचे पुजन करून ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी नांदेड जि.प.चे सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,भोकर उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे,बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोसीकर, जेष्ठ सामाजिक नेते शिवाजी पाटील किन्हाळकर,माजी सभापती नागनाथ घिसेवाड,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे,पो.नि. विकास पाटील,सुभाष पाटील किन्हाळकर,प्रा.डॉ.व्यंकट माने,माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर,माजी नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड, माजी उपसभापती सुर्यकांत बिल्लेवाड,डॉ.बी.आर.जाधव पारवेकर,सामाजिक कार्यकर्ते शेख युसूफ भाई,संपादक उत्तम बाबळे,जेष्ठ पत्रकार एल.ए.हिरे,बी.आर.पांचाळ, राजेश वाघमारे,माजी नगरसेवक मनोज गिमेकर,आनंदराव पाटील बोरगावकर,संचालक गणेश पाटील कापसे,इंजि. विश्वंभर पवार,शिवाजी कदम नागापूरकर,शंकर पाटील बोरगावकर,प्रशांत पोपशेटवार,गजानन अडकिणे पाटील, निळकंठ वर्षेवार,गंगाधर पडवळे,गणपत पिट्टेवाड,सुनिल शहा,नंदू -याकावार,गोविंद मेटकर यांसह असंख्य मान्यवर व शिवभक्तांनी अभिवादनासाठी उपस्थिती लावली.
आपल्या वंदनिय राजाला अभिवादन करण्यासाठी आतूर असलेल्या मावळ्यांत सकाळपासूनच उत्साह ओसंडून वाहतांना पहावयास मिळत होता.अनेक मावळ्यांनी शिवकालीन पोशाख परिधान केला,भगवे फेटे बांधली, हातात भगवे ध्वज घेतली, प्रतिकात्मक माँसाहेब जिजाऊ, राजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांचे मावळे अश्वारुढ झाले आणि लेझीम,ढोल ताशा पथके,भजनी मंडळी,लाठी काठी असे शिवकालीन युद्ध कला शोर्य खेळ दर्शविणारे क्रीडा पट्टू यांसह असंख्य शिवप्रेमी सहभागी झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या भव्य मिरवणूकीचा प्रारंभ दुपारी १२:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक भोकर येथून झाला.जय जिजाऊ-जय शिवराय च्या जयघोषाने आसमंत दणाणून शहरातील मुख्य रस्त्याने निघालेल्या या भव्य मिरवणूकीची सांगता सायंकाळी ६:३० वाजता करण्यात आली.मिरवणूकी दरम्यान भोकर सराफा असोशिएशनच्या वतीने महाप्रसाद तर प्रकाश मामा कोंडलवार मित्रमंडळाच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले.
आनंदोत्सवात संपन्न झालेल्या या शिवजन्मोत्सवाच्या यशस्वीतेसाठी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष माधव जाधव पाटील वडगावकर,कपिल पाटील किन्हाळकर, आनंदराव पाटील शिंधीकर,गजानन पाटील अडकिणे, आकाश गेंटेवार यांसह आदींनी अथक परिश्रम घेतले. तर कायदा,सुव्यवस्था व शांततेसाठी उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर, पो.नि. विकास पाटील, सहा.पो.नि.रसूल तांबोळी,पो.उप.नि. अनिल कांबळे,पो.उप.नि.दिगांबर पाटील,पो.उप.नि.राणी भोंडवे यांसह आदी महसूल आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच या शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने दि.२ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ठिक ६:०० वाजता नवा मोंढा मैदान,भोकर येथे प्रख्यात शिव व्याख्याते शिवश्री नितिन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान होणार असून या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.