पोलीस पाटील संघटनेच्या भोकर तालुकाध्यक्ष पदी व्यंकट कापसे
तर उपाध्यक्षपदी शिलानंद गायकवाड आणि सचिवपदी संदिप राठोड यांची निवड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : पोलिस प्रशासन व जनता यांच्यामधील दुवा म्हणून मानधनावर काम करणाऱ्या पोलीस पाटील यांचे प्रश्न आणि समस्या सोडविण्यासाठी भोकर तालुका पोलीस पाटील संघटनेची नूतन कार्यकारणी गठीत करण्यात आली असून या कार्यकारिणीच्या तालुकाध्यक्षपदी व्यंकट पाटील कापसे बटाळकर(बटाळा) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील एकूण ६८ गावांपैकी ३८ गावात पोलीस पाटील पद कार्यरत असून यात दोन महिलांचा पोलीस पाटील म्हणून समावेश आहे.तर उर्वरित गावांचे पोलीस पाटील पदे रिक्त आहेत.पोलीस प्रशासन व जनतेचा दुवा म्हणून तुटपुंज्या मानधनावर पोलीस पाटील हे सेवाकार्य करत असतात.त्यांच्या समोर विविध प्रश्न व समस्या आहेत.त्यांचे ते प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी पोलीस पाटील संघटना सेवारत आहे. याच अनुषंगाने भोकर तालुका पोलीस पाटील संघटनेची नुतन कार्यकारणी निवडण्यासाठी दि.१५ डिसेंबर २०२२ रोजी पोलीस ठाणे,भोकर च्या प्रांगणात पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सेवारत पोलीस पाटलांची एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.यावेळी सर्वानुमते भोकर तालुका पोलीस पाटील संघटनेची नुतन कार्यकारिणी निवडण्यात आली.त्या निवडण्यात आलेल्या नुतन कार्यकारिणीचे उर्वरित पदाधिकारी पुढील प्रमाणे आहेत.उपाध्यक्ष- शिलानंद गायकवाड( पिंपळगाव),सचिव -संदीप राठोड(जांभळी),सहसचिव – सौ.सुलोचना प्रकाश खांडरे (धानोरा),कोषाध्यक्ष- बालाजी शानमवाड(नागापूर) यासह आदींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे पो.नि.विकास पाटील, सहा.पो. नि.रसूल तांबोळी,पो.उप.नि.दिगांबर पाटील,पो.उप. नि.अनिल कांबळे,पो.उप.नि.सुर्यकांत कांबळे,पो.उप. नि.राणी भोंडवे यांसह उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस पाटील यांनी अभिनंदन केले असून पुढील सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.