पुन्हा एकदा भोकर बाजार समितीच्या सभापतीपदी जगदीश पाटील
तर उपसभापतीपदी बालाजी श्यानमवाड यांची निवड
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदार संघातील तथा तेलंगणा राज्य व महाराष्ट्राच्या सिमेवरील मराठवाड्यातील नामांकित असलेल्या भोकर कृषि उत्पन्न बाजार समितीची अर्थातच नव्याने नामकरण झालेल्या डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून यात काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता मिळवली आहे.दि.१७ मे रोजी नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभापती व उपसभापती पदांची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली असून सभापतीपदी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर यांची तर उपसभापतीपदी बालाजी श्यानमवाड यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे.
१८ संचालक संख्या असलेल्या भोकर कृषि उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूक पार पडली. माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी करुन निवडणूक लढविली.तर भाजपा व बीआरएस ने ही या निवडणुकीत कंबर कसली.परंतू विद्यमान आमदारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदारांनी काँग्रेसचे १३ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे २ संचालक निवडणूक दिले.तर भाजपाचे ३ संचालक विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी झाले.परंतू बीआरएस पक्षाच्या संचालकांना आपले खाते उघडता आले नाही.नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या सभापती व उपसभापती पदासाठी दि.१७ मे २०२३ रोजी बाजार समितीच्या सभागृहात निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी आ.अशोक चव्हाण यांच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष तथा माजी सभापती व नवनिर्वाचित संचालक जगदीश पाटील भोसीकर यांचा सभापती पदासाठी व उपसभापती पदासाठी बालाजी श्यानमवाड यांचा अर्ज दाखल करण्यात आला.तर त्यांच्या विरोधात सभापती पदासाठी भाजपाचे नवनिर्वाचित संचालक गणेश पाटील कापसे बटाळकर यांचा व उपसभापती पदासाठी किशोर पाटील लगळूदकर यांचा अर्ज दाखल करण्यात आला.यामुळे ही निवड बिनविरोध होऊ शकली नाही व मतदान प्रक्रिया घेण्यात आली असता १५ विरुद्ध ३ असे आवाजी मतदान झाले.यात काँग्रेसचे जगदीश पाटील भोसीकर हे सभापती पदासाठी आणि बालाजी श्यानमवाड हे उपसभापती पदासाठी विजयी झाले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासन अधिकारी सुनिल गणलेवार यांनी घोषित केले.
एकूण १८ संचालकांत नवनिर्वाचित ९ संचालक मराठा समाजाचे आहेत.यात ४ संचालक काँग्रेसचे,२ संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे,तर भाजपच्या ३ संचालकांचा समावेश आहे.त्यामुळे संभापतीपदी मराठा समाजाच्या संचालकांची वर्णी लागणार हे निश्चित होते.तसेच आ.अशोक चव्हाण यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगदीश पाटील भोसीकर यांच्या गळ्यात पुन्हा एकदा तिसऱ्यांदा सभापती पदाची माळ पडली आहे.तर उपसभापती पदासाठी अनेकांची नावे समोर आली व काहींनी मोठ्या प्रमाणात ‘लॉबिंग’ केली. परंतू आ.अशोक चव्हाण यांनी बालाजी श्यानमवाड या नवख्या ओबीसी चेहऱ्यास पसंती दिल्याने उपसभापतीपदी त्यांची वर्णी लागली व ते अपेक्षित उपेक्षित राहिले.
सभापती व उपसभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस संचालक जगदीश पाटील भोसीकर,बालाजी श्यानमवाड,उज्वल केसराळे,रामचंद्र मुसळे,गणेश राठोड,राजेश्वर अंगरवार,केशव पाटील पोमनाळकर, व्यंकटराव जाधव,किशन वागतकर,सारंग मुंदडा,पंकज पोकलवार,सय्यद खालेद,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इंजि. विश्वंभर पवार,सौ.ज्योती शिवाजी कदम व भाजपाचे गणेश पाटील कापसे,किशोर पाटील लगळूदकर आणि सुभाष पाटील किन्हाळकर यांनी सहभाग घेतला. यावेळी निरीक्षक म्हणून काँग्रेस कमिटीची जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर,नांदेड महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती किशोर स्वामी,माधव पाटील कदम यांसह जिल्हा उपाध्यक्ष भगवान दंडवे, ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड, माजी सभापती गोविंद बाबागौड पाटील,ओबीसी जिल्हा सरचिटणीस बी.आर.पांचाळ,माजी नगराध्यक्ष साहेबराव सोमेवाड, माजी उपनगराध्यक्षा प्रतिनिधी शेख युसूफ भाई, शहराध्यक्ष रमिजोद्दीन उर्फ खाजू इनामदार,राजू पाटील दिवशीकर, मनोज गीमेकर,खन्ना पाटील चिंचाळकर,बाबुराव सायाळकर,बाबूराव पाटील आंदबोरीकर,मिर्झा ताहेर बेग,आदिनाथ चिंताकुटे, फारुख शेख आदींची उपस्थिती होती.पद निवडी नंतर आतिषबाजी करुन, ढोल ताशा वाजवून,गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.तर ही निवड प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पीठासन अधिकारी सुनील गणलेवार, बाजार समितीचे सचिव पी.जी.पुंजेकर यांसह आदींनी परिश्रम घेतले. निवडीनंतर सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करुन पुढील सेवाकार्यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे, तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड,तालुका कार्याध्यक्ष गंगाधर पडवळे,उपाध्यक्ष विजयकुमार चिंतावार, उपाध्यक्ष कमलाकर बरकमकर व कोषाध्यक्ष बालाजी पाटील कदम यांनीही अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.