नापिकीच्या नैराश्यातून कांडलीच्या तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : अतिवृष्टीमुळे सततचे नुकसान व नापिकीमुळे डोक्यावरील कर्जाचे ओझे हटत नसल्याच्या नैराश्यातून मौ.कांडली ता.भोकर येथील राजेश विठ्ठल तोटावाड (३५) या तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सततची नापिकी व त्यात अधिकची भर म्हणजे अतिवृष्टीमुळे होणारे पिकांचे नुकसान यातून शेती उत्पन्नावर झालेली घट पाहता डोक्यावरील कर्जाच्या बोजाचे ओझे हटत नसल्याने यास कंटाळलेल्या आणि नैराश्यातून दि.४ नोव्हेंबर २०२२ रोजी या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात विष प्राशन केले.ही माहिती कुटुंबीयांना कळताच त्यांनी पुढील उपचारासाठी तातडीने नांदेड येथील एका खासगी दवाखान्यात त्यांना नेले.परंतू तेथे त्यांच्यावरील उपचारास यश येत नसल्याने त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.याठिकाणी डॉक्टरांनी त्यांच्यावरील उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले.परंतू त्यांना ही यात यश आले नाही व अखेर सोमवार,दि.१४ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ७:०० वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मौ.कांडली ता.भोकर येथे दि.१५ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी व दोन लहान मुली असून या तरुण शेतकऱ्याच्या अशा प्रकारे अचानक जाण्याने संपूर्ण गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.