देवपुजा करताय ? तर महादेव कोळी जात वैधता प्रमाणपत्र मिळणार नाही!
देवपुजा करता म्हणून जात वैधता प्रमाणपत्र नाकारले ; जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयाचा अजब निष्कर्ष,नांदेड जिल्ह्यातील महादेव कोळी समाज बांधव उद्या घरातील देवी देवतांना करणार जिल्हाधाका-यांकडे सुपूर्द
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : देवपुजा करता म्हणून जातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारल्याची खेदजनक घटना नांदेड जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयातून उघडकीस आली असल्याने घरातील देव्हाऱ्यासह सगळे देवी देवता सरकारच्या हवाली करण्याची भूमिका महादेव कोळी समाजाने घेतली असून त्यासाठी महादेव कोळी समाज बांधव उद्या दि.५ जानेवारी रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घरातले ते सर्व देवी देवता जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करणार आहेत.
देवपूजा करता म्हणून जातीचे वैधता प्रमाणपत्र नाकारल्याची खेदजनक घटना नांदेडमध्ये उघडकीस आली आहे.त्यामुळे आता आमच्या घरातील देव्हाऱ्यासह सर्व देवी देवता सरकारच्या हवाली करणार असल्याची भुमिका महादेव कोळी समाजाने घेतली आहे.याच अनुषंगाने महादेव कोळी समाज उद्या नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून घरातले सर्व देवी देवता जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्त करणार आहेत.याचे कारण असे की,नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील खरटवाडी या गावातून या अनोख्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे.या गावची रहिवासी मयुरी श्रीकृष्ण पुंजरवाड ही तरुणी एम.बी.बी.एस.चा वैद्यकीय अभ्यासक्रम पुर्ण करुन एम.डी.चा अभ्यासक्रम करत आहे.विशेष म्हणजे शासकीय सेवेत असणाऱ्या मयुरीच्या वडिलांना जात वैधता प्रमाणपत्र मिळाले आहे,मात्र मयुरीला महादेव कोळी जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास समितीने नकार दिला आहे.त्यामुळे तिचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे.आणि जात वैधता प्रमाणपत्र नाकारण्याचे कारण काय ? तर समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की,तुम्ही हिंदू देवी देवतांचे पूजन करता म्हणून तुम्ही महादेव कोळी नाहीत.असा अजब निष्कर्ष दिल्याने हिंदू धर्मातील देवपूजा करणाऱ्या या समाज बांधवांत संतापाची लाट पसरली आहे.
देवी देवतांची पुजा करता म्हणून जर आम्हाला जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यास नकार देण्यात येत असेल तर आम्ही या देवाचा त्याग करतो,अशी भुमिका या समाजाने घेतली आहे.ही बाब अतिशय निषेधार्य आहे. त्यामुळे उद्या दि.५ जानेवारी २०२२ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर महादेव कोळी समाज बांधव भव्य मोर्चा काढून घरातल्या देवी देवतांच्या मुर्त्या,देव्हारे आणि प्रतिमा प्रशासनाच्या हवाली करणार आहेत.अशी माहिती महादेव कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोणारे यांनी दिली आहे.तर महादेव कोळी समाजाच्या या आक्रमक भुमिकेमुळे सध्या नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून त्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासन काय कारवाई करणार ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.