दलित हत्याकांडातील आरोपींविरूद्ध मोक्का लावा..
अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारकडे केली मागणी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : बोंढार ता.जि.नांदेड येथील बौद्ध तरूण अक्षय भालेराव यांनी भीमजयंती साजरी केल्याचा राग मनात धरून त्यांच्यावर सामुहिक हल्ला करून निर्घुण खून करण्यात आला,लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथील गिरीरत्न तबकाले यांचा केवळ ३ हजार रूपयांसाठी सावकाराकडून अमानुष हत्त्या करण्यात आली.केज जि. बीड येथे एका गरीब मातंग मुलीवर बलात्कार करून तिची हत्त्या करण्यात आली व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने तिचे प्रेत विहिरीत फेकून देण्यात आले,तसेच मौ. वाळकी ता.हदगाव येथेही मातंग समाजाने गावात भीम जयंती साजरी केल्याच्या कारणावरून जातीय द्वेषातून मातंग तरूणावर व वस्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला व खोटे गुन्हे दाखल करण्यात आले.यांसह आदी अत्याचाराच्या घटना एका आठवड्यात मराठवाड्यात झाल्या.एकूणच अशा प्रकारे अत्त्याचार करणारे आरोपी मोकाट फिरत असून त्यांच्यावर कायद्याची वचक राहिलेली नाही असे दिसते.म्हणून सदरील आरोपींचा अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन च्या वतीने दि.१३ जून रोजी जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला व त्या आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
उपरोक्त घटना पाहता महाराष्ट्रातील दलित समाजात प्रचंड दहशत व भीतीचे वातवरण पसरले असून पुरोगामी महाराष्ट्रातील जातीयद्वेषी,अत्याचारी मंडळींकडून राज्यातील दलित सुरक्षित नसल्याचे निदर्शनास येत आहे.अशा प्रकारच्या अतिशय क्रूर घटना एकामागून एक महाराष्ट्रात घडत आहेत. राज्यातील सरकार व त्यांची पोलीस यंत्रणा दलितांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहे, त्यामुळे हे सरकार सुरक्षिततेची हमी देणार की नाही ? दलितांचे होणारे हत्याकांड गंभीरपणे घेणार की नाही? दलितांच्या हत्यांची मालिका कधी थांबवणार ? असे प्रश्न समाजास व समाजसेवींना पडले असल्याने उपरोक्त सर्व निंदणीय,अमानवीय क्रूर घटनांचा अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,विविध सामाजिक संघटना,पक्ष, कार्यकर्ते आणि सकळ शोषित अत्याचारग्रस्त समाजाच्या वतीने दि.१३ जून २०२३ रोजी तीव्र जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.तसेच वरील सर्व घटनांतील आरोपींविरूद्ध मोक्का कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी,वरील सर्व घटनांचा निःपक्ष व जलदगतीने तपास पूर्ण होण्यासाठी स्वतंत्र एसआयटी ची स्थापना करावी किंवा सीआयडीमार्फतच सखोल चौकशी करण्यात यावी.मयत अक्षय भालेराव,गिरीरत्न तबकाले व केज येथील बलात्कार पिडित मयत मुलीच्या कुटुंबांना राज्य शासनामार्फत तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करावी,याच बरोबर जमीन,नौकरी,पेन्शन देऊन सर्व पिडित कुटूंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे.मयत अक्षय भालेराव,गिरीरत्न तबकाले व केज येथील बलात्कार पिडित मयतेच्या खून प्रकरणाचे खटले अनुभवी सरकारी विशेष तज्ञ वकीलांची शासनामार्फत नियुक्ती करण्यात येऊन ते खटले चालवावेत,अशा विविध मागण्या उपरोक्तांनी केल्या असून त्या मागण्यांचे निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिष्टमंडळाने दिले आहे.
यावेळी सदरील शिष्टमंडळात अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे,राज्य उपाध्यक्ष परमेश्वर बंडेवार,गुरू रविदास समता परिषदेचे अध्यक्ष इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर,साहित्यिक डॉ.विठ्ठल भंडारे,कॉ.गंगाधर गायकवाड,राज्य सचिव शिवाजीराव नुरूंदे,मास संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूर्यकांत तादलापूरकर, निलेश तादलापूरकर,अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे नागराज आईलवार,आनंद वंजारे, नागेश तादलापूरकर,देवराव तलवारे,गोपीनाथ सूर्यवंशी,भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंद थोटवे,सचिन कुमार यांसह आदींचा समावेश होता.