ताठ मानेने जीवन जगण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज-ग.वि.अ. अमित राठोड
भोकर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक नूतन शाळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : हे स्पर्धेचे युग आहे,यात शिक्षितांना सरकारी नौकरी मिळेलच असे नाही.परंतू नौकरी लागणार नाही म्हणून शिक्षण घ्यायचे नाही असे नसते.कारण समाजात ताठ मानेने व आत्मसन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची नितांत गरज आहे.म्हणून शिक्षण घेतली पाहिजे,असे मौलिक विचार भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड यांनी व्यक्त केले.ते भोकर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक नूतन शाळा आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सत्कार सोहळ्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक नुतन शाळा भोकर येथील नवोदय परिक्षा उत्तीर्ण व पुर्व माध्यमिक स्कॉलरशिप परिक्षेत पात्र ठरलेले २१ गुणवंत विद्यार्थी, त्यांचे शिक्षक व पालक यांच्या गुणगौरव सत्कार सोहळ्याचे दि.१८ नोव्हेंबर २०२२ रोजी शाळेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन चोथे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड, गटशिक्षणाधिकारी एम.जी.वाघमारे,प्रा.डॉ.व्यंकट माने, मुख्याध्यापक एम.एल.पटेवाड,मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,सचिव बालाजी नार्लेवाड,मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष बि. आर.पांचाळ,कमलाकर बरकमकर यांसह आदींची उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून गुणगौरव सत्कार सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला.यावेळी यशस्वी गुणवंत विद्यार्थी, त्यांना हे यश मिळवून देण्यासाठी परिश्रम घेणारे त्यांचे शिक्षक व त्या विद्यार्थ्यांचे पालक या सर्वांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य असा यथोचित सत्कार करण्यात आला.शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख शिक्षक संजय वाघमारे यांनी प्रास्ताविकातून सदरील गुणगौरव सोहळ्याची पार्श्वभूमी विषद केली.तर गटशिक्षणाधिकारी एम.जी. वाघमारे,पत्रकार बाबुराव पाटील,संपादक उत्तम बाबळे,प्रा.डॉ.व्यंकट माने,मुख्याध्यापक एम.एल. पटेवाड यांसह आदींनी सोहळ्यास अनुसरुन मनोगत व्यक्त केले व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सर्व शिक्षकांनी सामूहिकपणे घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.
तर प्रमुख पाहुणे म्हणून पुढे बोलताना गटविकास अधिकारी अमित राठोड पुढे म्हणाले की,मी सुद्धा जिल्हा परिषद शाळेतूनच घडलेला एक विद्यार्थी आहे. त्यामुळे पालकांनी जिल्हा परिषद शाळेकडे सकारात्मक दृष्टीने पहावे.कारण देशातील अनेक मान्यवर व विचारवंत हे देखील जिल्हा परिषद शाळेतूनच घडलेले आहेत.परंतु आज पालक वर्गाचा जि.प.शाळेतील शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून आपली मुले केवळ डॉक्टर,इंजिनिअर किंवा उच्च पदस्थ अधिकारी झाले पाहिजेत यासाठी अमाप पैसा खर्च करून पाल्यांना महागड्या खासगी शिक्षण संस्थेत ते शिक्षण देत आहेत.परंतु शिक्षणाचा मूळ पाया हा माणूस म्हणून घडण्यासाठी आहे. शिक्षणातून संस्कार घडणे अपेक्षित असते.याच संस्कारांतून पुढे सुजाण समाज घडत असतो. त्यासाठी शिक्षण व संस्काराने प्रत्येक विद्यार्थ्यांचा पाया पक्का झाला पाहिजे.तरच तो पुढे समाजात टिकू शकतो. शिक्षणाने माणसाला उज्वल जीवन जगण्याचा मार्ग मिळतो.नव्हे तर समाजात मान,सन्मान,प्रतिष्ठा मिळते व स्वाभिमान ही प्राप्त करता येऊ शकतो आणि यशस्वी माणूस होता येते. आणि हे सारं जि.प.च्या शाळांतून ही शिक्षक देऊ शकतात. हे या गुणगौरव सोहळ्यातील यशवंत,गुणवंत विद्यार्थ्याकडे पाहून सिद्ध होत आहे,असे ही ते म्हणाले.
सदरील गुणगौरव सत्कार सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन शिक्षिका सौ.नंदा सुळकेकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार राठोड यांनी मानले.या सोहळ्यास शिक्षण विस्तार अधिकारी शेख जकियोद्दीन बरबडेकर, सोनटक्के,रत्नपारखी,पत्रकार जयभीम पाटील, शिवाजी गायकवाड,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक मंडळी, शाळेतील सर्व शिक्षक वृंद,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य,विद्यार्थी व पालकांची बहुसंख्येने उपस्थिती होती.