तलवारीचा धाक दाखवून फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांंस भरदिवसा लुटले
डोरली ता.भोकर शिवारातील रस्त्यावर दुचाकी अडवून १ लाख २७ हजार रुपयाचा मुद्देमाल लुटून चोरटे झाले पसार
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारत फायनान्स कंपनीच्या कर्ज गटांची वसूली रक्कम घेऊन दि.९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:०० वाजताच्या दरम्यान भोकर- मुदखेड रस्त्याने मुदखेडकडे जात असलेल्या फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांची दुचाकी डोरली ता.भोकर शिवारातील रस्त्यावर ३ अज्ञात इसमांनी अडविली व तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या जवळील १ लाख २७ हजार ७७३ रुपयाचा मुद्देमाल लुटून दुचाकीवरून ते पसार झाले.भरदिवसा हा ‘रोड रॉबरीचा’ गुन्हा घडला असून या प्रकरणी भोकर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक असे की,भारत फायनान्स या खासगी फायनान्स कंपनीच्या कर्ज गटाची वसूली करण्यासाठी दि.९ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी कंपनीचे संगम मॅनेजर सुशांत लिंबाजीराव गुंसाळी(२५) रा.वसमत जि.हिंगोली व त्यांचे सहकारी सुनील राठोड हे मुदखेड तालुक्यातील वरदडा तांडा आणि वाई येथे गेले होते.या गावांतील वसूली करुन हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून भोकर-मुदखेड रस्त्याने मुदखेडकडे जात असतांना दुपारी १२:०० वाजताच्या दरम्यान त्यांची दुचाकी ३ अज्ञात इसमांनी डोरली ता.भोकर शिवारातील रस्त्यावर अडविली.तसेच तलवारीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्या जवळील वसूलीची रोख रक्कम ८६ हजार ७७३ रुपये,जवळपास ४१ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल संच व २ टैब असा एकूण १ लाख २७ हजार ७७३ रुपयाचा मुद्देमाल लुटून ते चोरटे एका दुचाकीवरून पसार झाले.
सदरील घटनेची माहिती या कर्मचाऱ्यांनी एका जेसीबी चालकाच्या मोबाईलवरुन आपल्या वरीष्ठांना कळविली. तसेच उमरी व मुदखेड पोलीस ठाण्यात जाऊन भरदिवसा झालेल्या या ‘रोड रॉबरी’ बाबद माहिती दिली.परंतु घटनास्थळ हे भोकर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने नंतर त्यांनी भोकर पोलीस ठाणे गाठले व शुशांत गुंसाळी यांनी वरील माहिती प्रमाणे रितसर फिर्याद दिली. सदरील फिर्यादीवरून ३ अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुरनं ४३/ २०२२ कलम ३९२,३४ भादवि आणि सहकलम ४,२५ भा.ह.कायदा प्रमाणे भोकर पोलीसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रसूल बी.तांबोळी हे करत आहेत