डॉ.हनुमंत धर्मकारे यांच्या निर्घृण हत्येची एस.आय. टी.मार्फत चौकशी व्हावी
नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले निवेदन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : वैद्यकीय अधिकारी डॉ.हनुमंत धर्मकारे यांची गोळ्या घालून केलेल्या निर्घृण हत्येची घटना अतिशय वेदनादाई व गंभीर असल्याने शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन या प्रकरणासाठी शासन व गृहविभागामार्फत एस.आय.टी.ची स्थापना करून उच्चस्तरीय चौकशी करावी,अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने देण्यात आले.
आपल्या सोज्वळ व नम्र स्वभावाने अत्यंत अल्पावधीत सुपरिचित झालेले आणि आपल्या कर्तव्याने नाव गरूडाच्या भरारीप्रमाणे उंचीवर नेणारे तथा आरोग्य सेवेला पूर्णपणे समर्पित होऊ हजारो रूग्णांना जीवदान देणारे गरिबांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर म्हणून उमरखेड तालुक्यात जीव ओतून वैद्यकीय सेवा देणारे नांदेड जिल्ह्याचे भूमिपूत्र डॉ.हनुमंत धर्मकारे (वैद्यकीय अधिकारी,उत्तरवार शासकीय रूग्णालय, उमरखेड) या शासकीय वैधकिय अधिकारी असलेल्या बालरोग तज्ज्ञांची भरदिवसा,भररस्त्यात गोळ्या झाडून निर्घृण हत्त्या दि.११ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान उमरखेड शहरातील गोरखनाथ हॉटेलच्या समोर घडली.सदरील निंदनीय घटनेची बातमी महाराष्ट्रभर वार्यासारखी पसरली.त्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

पुरोगामी महाराष्ट्राला बिहारचे स्वरूप देण्या प्रयत्न करत चांगल्या वैद्यकीय सेवेला मोडून काढून आरोग्यसेवा देणा-या व्यक्तीस व सेवेस कलंकित करणार्या या निंदणीय,अमानवी घटनेचा दि.१३ जानेवारी २०२२ रोजी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.तसेच मुख्यमंत्री व गृहविभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन सदरील प्रकरणासाठी एस.आय.टी.ची स्थापना करून उच्चस्तरीय चौकशी करावी.याच बरोबर घटनेतील सर्व आरोपी व या घटनेमागील मास्टरमाईंड कोण आहेत यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी,त्यांच्याविरूद्ध खुनाच्या गुन्ह्या बरोबरच मोक्का कायद्यांतर्गतही गुन्हा नोंदवून कठोरातील कठोर शिक्षा करावी,यांसह आदी मागण्यांचे निवेदन अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलन व विविध सामाजिक संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे नांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्यामार्फत पाठविले आहे.सदरील निवेदनावर अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सतीश कावडे,चंपतराव हातागळे, प्रा.विठ्ठल भंडारे,अॅड.एल.बी.इंगळे, राहुल तेलंग,भारत खडसे,उत्तम गवाले,गोपाळ वाघमारे,आनंद वंजारे, माधव गोरखवाड,मॅनेजर गायकवाड,भीमराव बल्लूरकर,संतोष गडंबे,संजय देवकांबळे,गंगाधर कावडे,शंकरराव गायकवाड,नामदेव कार्लेकर,डॉ. जिरोणेकर,विश्वनाथ गाडेकर,प्रा.जी.एल.सूर्यवंशी, गणपत चिवळीकर,संभाजी सोमवारे,लोकेश कांबळे, डॉ.प्रदीप घाटे यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.