डॉ.अनंत चव्हाण आज घेणार भोकर ग्रामीण रुग्णालय अधीक्षकांचा पदभार
रुग्णालयाची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यात व रुग्णांची होत असलेली हेळसांड थांबविण्यात डॉ.अनंत चव्हाण यशस्वी होतील का ?
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : शासकीय ग्रामीण रुग्णालय भोकर चे अधीक्षक डॉ.अशोक मुंडे यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली.त्यांच्या रिक्त पदाचा पदभार याच रुग्णालयात सेवारत असलेले डॉ.अनंत चव्हाण हे आज दि.४ जानेवारी रोजी स्विकारणार आहेत. रिक्त पदाच्या दरम्यानच्या काळात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर आले व रुग्णालयाचा आढावा घेऊन काही सुचना देऊन गेले.त्यांच्या सुचनांची अंमलबजावणी होईल अथवा नाही,हे पुढे पहावयास मिळेलच.परंतू रुग्णालयाची विस्कटलेली घडी व रुग्णांची होत असलेली हेळसांड पाहता नुतन अधीक्षकांपुढे एक आव्हान उभे असून विस्कटलेली ती घडी सुरळीत करण्यात आणि गरिब,गरजू रुग्णांची होत असलेली हेळसांड थांबविण्यात डॉ.अनंत चव्हाण यशस्वी होतील का ? यावर मात्र प्रश्न चिन्ह उभे असल्याची चर्चा होत आहे.
नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुका हा तेलंगणा राज्य सिमेवरील असल्यामुळे या तालुक्यातून दोन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ जातो.सदरील महामार्गावर होणाऱ्या अपघातांची मोठी संख्या पाहता जखमींना तात्काळ उपचार मिळावेत या उद्देशाने भोकर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयास ‘ट्रामा केअर सेंटर’ अपघात विभाग कक्ष जोडण्यात आला व या विभागात जवळपास ८ तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली.यांसह ग्रामीण रुग्णालयातील जवळपास अन्य वैद्यकीय अधिकारी मोजता डझनभराच्या वरील डॉक्टरांचा येथे भरणा असल्याचे हजेरी पट दर्शविते.यात दोन भूलतज्ज्ञ,एक बालरोग तज्ज्ञ,एक अस्थी रोग तज्ज्ञ,एक स्त्रीरोग तज्ज्ञ,एक सर्जन यांसह आदींची मोठी टिम येथे सेवारत असली तरी या तज्ञ डॉक्टरांचा उपयोग रुग्णांना क्वचितच होतो. अपघातात जखमी झालेल्या गंभीर रुग्णांवर अपघात विभागात केवळ प्राथमिक उपचार करून नांदेडला पाठविण्यात येते.कारण भूलतज्ञ असले तर अस्थिरोग तज्ज्ञ नसतो.अस्थिरोग तज्ञ असले तर सर्जन नसतो,भूलतज्ञ असले तर अस्तीरोग तज्ञ व सर्जन नसतो. ज्या दिवशी स्त्रीरोग तज्ज्ञ असतो त्या दिवशी भूलतज्ञ, सर्जन राहत नाही. ज्या दिवशी भूलतज्ञ,सर्जन राहतो त्या दिवशी स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ रहात नाही.कोणाचा ताळमेळ कोणासही मिळत नाही.त्यामुळे कोणत्याच गंभीर रुग्णांवर या अपघात विभागात परिपुर्ण उपचार होत नाहीत व बाळंतपण कक्षाचे हाल ही तसेच आहेत. केवळ थातूरमातूर प्रथमोपचार करुन त्यांची रवानगी थेट नांदेडला केली जाते.गरोदर महिला बाळंतपणासाठी येथे आल्याच तर त्यांचे बाळंतपण सुखरुपपणे होईलच ? याची अजिबात शास्वती नाही. सिझरींगचे कारण दाखवून कित्येक महिलांना नांदेडला पाठविले जाते.तर नांदेडला जा म्हणून ‘रेफर’ केलेल्या त्या महिलांचे मग भोकर हो अथवा नांदेड येथे अगदी नैसर्गिकपणे बाळंतपण होते.असा अनुभव अनेक मातांना आला आहे.आणि रात्रपाळीच्या उपचारांचा तर विचारच न केलेला बरे? कारण रात्रपाळी सेवेत केवळ एखादाच डॉक्टर व परिचारीका भगिणी असते आणि ती सेवा म्हणजे असून काय अन् नसून काय ? अशिच असते.
भोकरचे ग्रामीण रुग्णालय म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशीच अवस्था झाली आहे.नियुक्त तज्ञ डॉक्टरांची संख्या पाहता गरिब व होतकरू रुग्णांना योग्य उपचार मिळायलाच पाहिजेत.परंतू ‘ते’ सारे तज्ञ डॉक्टर कदापिही एकत्र हजर राहतच नसल्याने या रुग्णांना योग्य उपचार कधीच मिळतच नाहीत.त्यामुळे थातूर माथूर उपचार करुन अन्यत्र भटकंती त्यांच्या नशिबी आहे.नुकतेच सेवानिवृत्त झालेले वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक मुंडे यांचा शांत,मितभाषी, कोणाचेही मन न दुखविणारा स्वभाव होता.त्यामुळे नियुक्त वैद्यकीय अधिकारी हे त्याचा गैर फायदा घेत होते असे चर्चील्या जात आहे.नव्हे तर ते त्यांच्यावर ‘मेहेरबान’ होते व त्यांच्या मेहरबानीतूनच हा अलबेल कारभार सुरु झाला आहे,असे ही बोलल्या जाते.कारण अत्यल्प उपस्थितीने ‘सेवा कमी व महिन्याच्या पगाराची पुर्ण हमी’ म्हणत सेवा बजावताना येथील वैद्यकीय अधिकारी दिसतात.परिनामी सर्वच काही आलबेल व या रुग्णालयाची घडी विस्कटलेली पहावयास मिळते ? आणि ही विस्कटलेली घडी सुरळीत करणे हे एक आव्हान नुतन वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनंत चव्हाण यांच्या पुढे उभे आहे.तसे पाहता डॉ.अनंत चव्हाण हे या रुग्णालयात काही नव्याने आलेले नाहीत,तर ते याच रुग्णालयात भुलयज्ञ म्हणून सेवारत आहेत व या अलबेल कारभारात त्यांचा ही हात’भार’ आहेच.त्यामुळे वैद्यकीय पदाचा ‘भार’ स्विकारल्या नंतर सर्वप्रथम त्यांनीच येथे पुर्णवेळ उपस्थित राहणे गरजेचे आहे.तरच ते गरिब व होतकरु रुग्णांना आरोग्य सेवेचा योग्य लाभ देऊन विस्कटलेली घडी सुरळीत करु शकतील आणि रुग्णांची होत असलेली हेळसांड थांबविण्यात यशस्वी होतील ? नाही तर ‘जैसे थे’ च राहिल अशी चर्चा होत आहे.हे आव्हान पेलण्यासाठी व त्यांच्या हातून रुग्णांचे भले होण्यासाठी त्यांना आमच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा!