डॉ.अण्णा भाऊ साठे यांची अमृततुल्य साहित्य संपदा स्वाभिमानाने जगण्यासाठीचे वरदान – उत्तम बाबळे
गोरठा येथे साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांचा जयंती सोहळा आनंदोत्सवात साजरा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : ‘मला लढा मान्य आहे,रडगाणे नाही’,असा मौलिक संदेश देणाऱ्या साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या अनुभवाने प्राप्त केलेल्या प्रतिभेतून समता,बंधूता,न्याय,त्याग,शिस्त, प्रामाणिकता,निष्ठा,करुणा,शील,देशभक्ती जपत ‘स्वाभिमानाने जगण्यासाठी लढा देत मरणाऱ्यांचे’ संघर्षमयी दिशादर्शक साहित्य निर्माण केले आहे.म्हणूनच डॉ. अण्णा भाऊ साठे यांची ती अमृततुल्य साहित्य संपदा स्वाभिमानाने जगण्यासाठीचे वरदान ठरली आहे.असे प्रतिपादन अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष संपादक उत्तम बाबळे यांनी व्यक्त केले.ते गोरठा ता.उमरी येथे दि.३० ऑगस्ट रोजी साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती सोहळ्या प्रसंगी आयोजित जाहीर सभेत बोलत होते.
गोरठा ता.उमरी येथे दि.३० ऑगस्ट २०२३ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११:०० वाजता माजी सभापती तथा युवानेते शिरिश भाऊ देशमुख यांच्या हस्ते नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी तळ हातावर पृथ्वी असलेल्या विज्ञानवादी लाल ध्वजाचे रोहण करण्यात आले.यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन,महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष,राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे हे होते.तर उद्घाटक तथा प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती शिरिश भाऊ देशमुख गोरठेकर,उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे,संभाजी सावंत,ओंकार सावंत,नामदेव बड्डेवाड, धोतरे,दत्ताजी हैबतराव,एन.एम.कांबळे सर,एस.एच.कांबळे,जे.डी.हातोडे,डी.जे. सोनकांबळे,पचलिंग,मानवहित लोकशाही पक्षाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष गजानन गाडेकर,सर्व ग्राम पंचायत सदस्य यांसह आदींची उपस्थिती होती.
यावेळी जयंती सोहळ्यास अनुसरून शिरिश भाऊ देशमुख गोरठेकर,पो.नि.झुंजारे,शाळकरी विद्यार्थी, बार्टीच्या समतादुत सौ.जयश्री गायकवाड हैबतकर,जे.डी.हातोडे,डी.जे. सोनकांबळे यांसह आदीं मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.तर अध्यक्षीय समारोप करताना संपादक उत्तम बाबळे पुढे म्हणाले की,रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी क्रांतियोद्धा वीर फकिरा राणोजी साठे यांच्या पुर्वजांना दिलेल्या ऐतिहासिक तलवारीची आणि भारताला पवित्र संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची द्वीधार साहित्यरत्न डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या ‘झुंजार लेखणीला’ होती.त्यामुळेच त्यांचे अजरामर साहित्य अभ्यासकांच्या अनेक पिढ्यांसाठी जागतिक पातळीवर व विद्यापीठांतून ‘आव्हान’ म्हणून उभे राहिले आहे.असे ही ते म्हणाले.
याप्रसंगी मनोगत व्यक्त केलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांना पो.नि.विश्वनाथ झुंजारे,संपादक उत्तम बाबळे,गजानन गाडेकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वही,पेन शालेय साहित्याचे वाटप करुन स्तुत्य उपक्रम राबविला.तर गावातील या विद्यार्थ्यांनी साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य वाचनासाठी उपलब्ध व्हावे म्हणून सामाजिक जाण असलेले उपक्रमशिल व्यक्तिमत्त्व डी.जे. सोनकांबळे यांनी ५ हजार रुपयांच्या कादंबऱ्या व आदी साहित्य देण्याचे घोषित केले असून ते लवकरच घेऊन देणार आहेत. त्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.सदरील सभेचे प्रास्ताविक व सुरेख असे सुत्रसंचालन अशोक हैबतकर यांनी केले.तर उपस्थितांचे आभार एन.एम.कांबळे यांनी मानले.तसेच जाहीर सभेच्या समारोपानंतर गावातील मुख्य रस्त्याने डॉ.अण्णा भाऊ साठे यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात आली.आनंदोत्सवात संपन्न झालेल्या या जयंती सोहळ्या निमित्तच्या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष साहेबराव हैबतकर,उपाध्यक्ष गौतम सोनकांबळे,उमेश हैबतकर,अरविंद हैबतकर (मु.पोलीस),शिवाजी हैबतकर,बळीराम हैबतकर,माधव हैबतकर,पंढरी हैबतकर, शिवराम,विजय,नागन कांबळे,मनोहर वाघमारे, समस्त हैबतकर परीवार,कांबळे,सोनकांबळे परिवार व आदींनी परिश्रम घेतले.