Sun. Dec 22nd, 2024

जि.प.प्रा.शाळेत आत्मसंरक्षणासाठी विद्यार्थ्यांना देताहेत कराटे प्रशिक्षण

Spread the love

लामकाणी ता.भोकर येथील जि.प.प्रा.शाळा ठरली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे औपचारिक प्रशिक्षण देणारी पहिली शाळा…

अंबुज प्रहार प्रतिनिधी

भोकर : शारीरिक तंदुरुस्ती व आत्मसंरक्षणासाठी कराटे सारख्या खेळाच्या प्रशिक्षणाची प्रत्येकास आवश्यकता आहे.परंतू ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण उपलब्ध होत नसल्याचे लक्षात घेऊन जि.प.प्रा.शाळा लामकाणी ता.भोकर येथे ‘तेंग सु डो'(कोरियन मार्शल आर्ट) कराटे खेळाच्या प्रशिक्षण वर्गाची दि.१ ऑगस्ट पासून सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भोकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमित राठोड यांच्या हस्ते करण्यात आले असून अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारी जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील ही पहिली शाळा ठरली आहे.

वर्ल्ड व्हिजन इंडिया व जि.प.प्रा.शाळा लामकानी ता.भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा व परिसरातील विद्यार्थ्यांना  आत्मसंरक्षणाचे धडे देण्यासाठी दि.१ ऑगस्ट २०२२ रोजी ‘तेंग सु डो'(कोरियन मार्शल आर्ट) कराटे खेळाच्या प्रशिक्षण वर्गाची प्रशिक्षण वर्गाची सुरूवात करण्यात आली आहे.या कराटे प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन गटविकास अधिकारी अमित राठोड यांच्या हस्ते झाले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मण पालेपवाड हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून  पो.उप.नि.दिगंबर पाटील,वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेचे शाखा व्यवस्थापक श्याम बाबू पट्टापू,क्रीडा प्रेमी युवा खेळाडू संदीप पाटील गौड,शिक्षण विस्तार अधिकारी किशन सोनटक्के,केंद्रप्रमुख प्रल्हाद जोंधळे,केंद्रीय मुख्याध्यापक इबितदार यांसह आदींची उपस्थिती होती.

जिल्हा परिषद शाळेतील ग्रामीण विद्यार्थ्यांना आत्मसंरक्षणाचे औपचारिक प्रशिक्षण देणारा तालुक्यातील हा पहिला उपक्रम असून शाळा देखील पहिलीच आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या सनियंत्रणाखाली व वर्ल्ड व्हिजन इंडिया या सामाजिक संस्थेने या प्रशिक्षण वर्गाचे प्रायोजकत्व स्विकारले आहे.’तेंग सु डो कराटेचे सदरील प्रशिक्षण मुख्य प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिने चालणार असून विद्यार्थ्यांत विशेषतः मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देऊन बाल संरक्षणाचे ध्येय साध्य करावयाचे आहे.तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी भागाप्रमाणे खेळाच्या समान संधी आणि सुविधा देऊन क्रीडा संस्कृती रुजवणे हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांनी म्हटले आहे.

सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लामकाणी येथील ग्रामपंचायत,शालेय व्यवस्थापन समिती,पोलीस पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष,शाळेचे मुख्याध्यापक श्रीरामवार यांसह शिक्षक विपीन पवनकर,वाघाळकर,माने,कैरमकोंडा यांनी परिश्रम घेतले आहेत.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !