जमिनीतील येणाऱ्या गुढ आवाजांस नागरिकांनी घाबरू नये-जि.अ.अभिजित राऊत
▪️तर माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण यांनी याविषयी अधिकारी व पांडुरणा येथील गावकऱ्यांशी साधला संवाद आणि परिस्थितीचा घेतला आढावा
▪️गुढ आवाजाबाबत सखोल अभ्यासासाठी जिल्हा प्रशासन भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण,नागपूर,राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थान हैद्राबाद व नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी कोलकत्ता या केंद्रीय संस्थेचे सहकार्य घेणार-जिल्हाधिकारी
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : भोकर तालुक्यातील पांडुरणा,बोरगडवाडी, समंदरवाडी या परिसरात जमिनीतून गुढ आवाज सातत्याने येत आहेत.दि.३ ऑक्टोबर रोजी देखील पांडुरणा परिसरात जमीनीतून बरेच वेळा गुढ आवाज आले.सदरील आवाजांसदर्भात ग्रामस्थ व तालुका प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनास विचारणा केली असता जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या तज्ञ प्राध्यापकांशी चर्चा केली.यावेळी भूकंप मापक यंत्रावर तशी कोणतीही नोंद नसल्याचे विद्यापिठातील तज्ञांनी त्यांना सांगितले आहे.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये,असे आवाहन त्यांनी केले असून गुढ आवाजाबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासन भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण, नागपूर, राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थान हैद्राबाद व नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी कोलकत्ता या केंद्रीय संस्थेचे सहकार्य घेणार असल्याचे ही म्हटले आहे.तर माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण यांनी देखील जिल्हाधिकारी व तहसिलदार राजेश लांडगे यांच्याशी संपर्क साधून आणि भयभित झालेल्या पांडुरणा गावच्या नागरिकांना बोलून धीर दिला आहे व परिस्थितीचा आढावा ही घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भोकर तालुक्यातील पांडुरणा,बोरवाडी, समंदरवाडी व परिसरात जमीनीतून सातत्याने गुढ आवाज येत आहेत. तसेच किन्हाळा,बटाळा व भोकर शहरातील हनुमान नगर,शेख फरीद नगर,सोनटक्के कॉलनी परिसरात ही गुढ आवाज आले आहेत.तर दि.३ ऑक्टोबर २०२२ रोजी पांडुरणा येथे सकाळ पासून रात्री उशिरापर्यंत अनेक वेळा गुढ आवाज आल्याने भयभित झालेल्या गावक-यांनी घराबाहेरच झोपने पसंद केले.सायंकाळी प्र.भोकर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे व महसूल विभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पांडुरणा गावास भेट दिली.यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधला.तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनास याबाबत माहिती दिली.गेल्या काही दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासना मार्फत भूजल शास्त्रीय पाहणीच्या अनुषंगाने भूजल व कंपन निगडीत बाबीसाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांना वरील बाबीचा अभ्यास करण्यासाठी आदेशीत करण्यात आले होते.त्या अभ्यासास अनुसरून प्राथमिक अहवालानुसार अशा पद्धतीची कंपन हे भूजल पातळीत होणाऱ्या पुनर्भरण अथवा उपसा यामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रोस्टाटिक दबावामुळे होत असल्याचे त्या तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.ही सामान्य बाब असून प्रतिवर्षी बऱ्याच भागात असे जाणवते.गूढ आवाज येणे ही स्थानिक स्वरुपातील बाब असल्याचे यापूर्वी देखील निर्दशनास आले आहे.
परंतू सातत्याने अशा प्रकारचे गुढ आवाज येत असल्याने हे आवाज नेमके कशाचे आहेत ? याचा सखोल अभ्यास होणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे तज्ञ भुवैज्ञानिकांना भोकर तालुक्यात पाचारण करावे अशी मागणी संबंधित गावकरी व माजी मुख्यमंत्री तथा भोकर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. याच अनुशंगाने नुतन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्या गुढ आवाजासंदर्भात सखोल अभ्यास करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण,नागपूर,राष्ट्रीय भूभौतिकीय अनुसंधान संस्थान हैद्राबाद व नॅशनल सेंटर फॉर सेस्मॉलॉजी कोलकत्ता या केंद्रीय संस्थेचे सहकार्य घेण्यासाठी संपर्क साधला असून या संस्थेमार्फत सूक्ष्म पद्धतीने सर्व घटनांचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्यात येईल,असे म्हटले आहे.
माजी मुख्यमंत्री आ.अशोक चव्हाण यांनी याविषयी अधिकारी व गावकऱ्यांशी साधला संवाद
तहसिलदार राजेश लांडगे हे सायंकाळी पांडुरणा गावी गेले असता आ.अशोक चव्हाण यांनी त्यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीचा आढावा घेतला.तसेच त्यांनी तहसिलदार राजेश लांडगे यांच्या मोबाईलवरुन पांडुरणा गावचे उपसरपंच व गावकऱ्यांशी संवाद साधून नागरिकांनी घाबरु नये,तर काळजी घ्यावी असे आवाहन करत धीर दिला आहे.तसेच मी जिल्हा प्रशासनामार्फत लवकरच याबाबदचा अभ्यास करण्यासाठी तज्ञ भुवैज्ञानिकांना येथे बोलावणार असल्याचेही यावेळी त्यांनी म्हटले आहे.तर भोकर दौऱ्या दरम्यान उपरोक्त गावास आ.अशोक चव्हाण हे भेट देणार असल्याचे ही बोलल्या जात आहे.