चालत्या बस मधील प्रवासी महिलेचे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने चोरले

भोकर पोलीसात अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसने आपल्या पाहुण्यांकडे जात असलेल्या एका प्रवासी महिलेचे चालत्या बस मधून १ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली असून या प्रकरणी भोकर पोलीसात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनुष्का अविनाश मुसळे,रा.अंबेगाव ता.अर्धापूर ही महिला दि.३ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी ३:०० ते ४:०० वाजताच्या दरम्यान आपली आई व दोन मुलांसह पाहुण्यांकडे जाण्यासाठी बारड ता.मुदखेड येथून तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसली आणि भोकर बस स्थानकात हे सर्वजण उतरले.यानंतर भोकर बस स्थानकातून लगळूद ता.भोकर येथे जात असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये सोबतच्या त्या सर्वांसह ती बसली.यावेळी तिच्या निदर्शनास आले की,बारड ते भोकर या प्रवासा दरम्यान चालत्या बस मधील कोणीतरी इसमाने तिच्या पर्सची चैन काढून व पर्स कापून त्यात ठेवलेले तीन तोळे सोन्याचे जवळपास ७५ हजार रुपये किमतीचे गंठण आणि दोन तोळ्याचे सोन्याचे जवळपास ५० हजार रुपये किमतीचे नेकलेस असे एकूण १ लाख २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले आहेत.
या घटनेबाबत सदरील महिलेने कुटूंबियांना सांगितले व दि.६ ऑगस्ट २०२३ रोजी भोकर पोलीसात रितसर फिर्याद दिली.यावरुन जमादार बालाजी लक्षटवार यांनी गु.र.नं.२७८/२०२३ कलम ३७९ भादवि प्रमाणे अज्ञात चोरट्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पो.नि. नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील गुन्ह्याचा पुढील अधिक तपास जमादार सोनाजी कानगुले व पो.कॉ.प्रमोद जोंधळे हे करत आहेत.