चळवळीतील नेत्यांना सामाजिक विषमतेचा इतिहास बदलण्याची सुवर्णसंधी!-मधुकरराव कांबळे
मातंग समाजोन्नतीसाठी महाराष्ट्रातील सामाजिक नेत्यांनी एकत्रित पणे लढा उभारण्याची आवश्यकता ! पुणे येथील बैठकीतून व्यक्त झाले हे मत…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
पुणे : पारतंत्र्य व स्वातंत्र्यानंतर आजतागत ही मातंग व तत्सम जाती समुह समाजोन्नती व विकासाभीमूख बाबींपासून सातत्याने उपेक्षित आणि वंचित राहिला आहे.अनुसूचित जाती समुहातील एका विशिष्ट जाती समुहानेच विशेतः लाभ घेतला असल्याने अनुसूचित जातींमध्ये सामाजिक व विकासात्मक विषमता निर्माण झाली आहे.विषमतेची ही दरी मिटवण्यासाठी मातंग समाजातील सामाजिक नेत्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे व त्यासाठी आमचा हा प्रयत्न असून यातून चळवळीतील नेत्यांना सामाजिक विषमतेचा इतिहास बदलण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे,असे मनोगत माजी राज्यमंत्री मधूकरराव कांबळे यांनी पुणे येथे दि.९ मार्च रोजी संपन्न झालेल्या सामाजिक बैठकीत व्यक्त केले.
महाराष्ट्रातील मातंग व तत्सम वंचित जातींची सर्व स्तरांवर निरंतर होत असलेली उपेक्षा,सामाजिक समते संदर्भात राज्य सरकारची पक्षपाती भूमिका ही या जाती समुह बांधवांना सातत्याने दारिद्र्याच्या खाईत ढकलत आहे. सातत्याने होत असलेल्या अन्याय अत्याचार व सामाजिक न्यायाच्या योजनांचे वितरण करताना कोणत्याही समतावादी धोरणांची अंमलबजावणी होत नसल्याने अनुसूचित जातींमध्ये विकासात्मक विषमता निर्माण झाली आहे.याच बरोबर अनुसूचित जातीतील लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा लाभ मिळणे ही गरजेचे असल्याने आरक्षण वर्गीकरण अ,ब,क,ड व्हायला पाहिजे.उपरोक्त न्यायीक बाबींसाठी लोकशाही मार्गाने तीव्र लढा उभारण्याची आज नितांत आवश्यकता आहे.यासाठी मातंग व तत्सम जाती सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे.याच अनुशंगाने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव( राज्यमंत्री दर्जा ) मधुकररावजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दि.२० फेब्रुवारी २०२२ रोजी औरंगाबाद येथे “मातंग अस्मिता परिषद” संपन्न झाली. तसेच राज्यातील अनेक जिल्हास्थानी विविध सामाजिक संघटना व सामाजिक चळवळीत नेत्यांच्या एकत्रीकरणांतून बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.याच अनुशंगाने दि.९ मार्च २०२२ रोजी शासकीय विश्रामगृह,पुणे येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य सचिव(राज्यमंत्री दर्जा) माजी राज्यमंत्री मधूकरराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक महत्वपुर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीस समाजातील जेष्ठ नेते शंकरभाऊ तडाखे,जेष्ठ साहित्यीक अण्णा धगाटे,युवा नेते लहु पारवे,अशोकभाऊ जगताप,रामभाऊ आव्हाड,युवा नेते रमेश तात्या गालफाडे, धनंजयभाऊ डावारे (बार्शी ),समाज अभ्यासक डॉ.धनंजय भिसे (पिंपरी चिंचवड),संतोषभाऊ कांबळे (बार्शी), दिपकभाऊ पाटील,शशिकांतदादा शिंदे (सोलापूर),बडूं आबाजी ताटे (उस्मानाबाद),सैनाझजी भिसे,सतीशजी तुपसुदंर,विपुलजी साठे,प्रा.बबन गायकवाड,जगन्नाथजी जाधव,दिलीपजी कांबळे, संतोष सुभाष कांबळे,आशिष दोडके,डॉ.जिरोणेकर व विवीध जिल्हातील प्रमुख कार्यकर्त्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी जेष्ठ नेते शंकरभाऊ तडाखे,जेष्ठ साहित्यिक अण्णा धगाटे,डॉ.धनंजय भिसे यांसह आदींनी विकासापासून कोसो दूर राहिलेल्या मातंग समाजास उन्नतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्रातील सामाजिक नेत्यांनी एकत्रित पणे लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
तर पुढे बोलतांना मधूकरराव कांबळे म्हणाले की,भारतीय राज्यघटनेने बहाल केलेले पायाभुत,मुलभुत अधिकार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अद्यापही पोहचले नाहीत.परिणामतः अनुसूचित जाती मध्ये विकासात्मक विषमता निर्माण झाली आहे.सर्वच शासकीय योजनांचा लाभ व निधी हा केवळ एकाच समाजाला मिळाल्याने सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित होऊ शकलेली नाही.समाजाच्या अस्मितेवर व समाज बांधवावर होणा-या अन्याय अत्याचारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सर्व राजकिय पक्ष व सत्ताधारी हे आम्हाला गृहीत धरून आमच्या सामाजिक प्रश्नांना बगल देत आहेत.यावर मात करण्यासाठी समाजाचे एकिकरण व समाज परिवर्तनाचा लढा उभारणे गरजेचे आहे.म्हणूनच मी एकत्रीकरणांतून हा लढा उभारत असून यात सर्वांनी समाज हित लक्षात घेऊन सहभागी व्हायला पाहिजे,असे ही ते म्हणाले.
माजी राज्यमंत्री मधूकरराव कांबळे यांच्या आवाहनास उपस्थितांनी उत्तम व सकारात्मक प्रतिसाद दिला व त्यांच्या नेतृत्वाखाली उभारल्या जात असलेल्या या सामाजिक न्यायीक लढ्यात मतभेद विसरुन सहभागी व्हायला पाहिजे अशा भावना अनेकांतून व्यक्त झाल्या.तसेच राज्यातील विविध सामाजिक संघटना व सर्व नेते,कार्यकर्ते यांना या लढ्यात सहभागी होण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात व विभागात अशा प्रकारे बैठका पुढे ही घेण्यात येणार असल्याची माहिती मधूकरराव कांबळे यांनी यावेळी दिली आहे.