ग्रंथ पंढरीचे वारकरी स्वातंत्र्य सेनानी सूर्यभानजी पवार
६ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अधिवेशन स्वातंत्र्य सेनानी सूर्यभानजी पवार यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त परभणी जिल्ह्यातील वझूर ता.पूर्णा येथे संपन्न होत असून त्यानिमित्त प्रा.डॉ.संजय कसाब यांनी लिहिलेला हा लेख खास वाचकांसाठी देत आहोत – संपादक
अंबुज प्रहार विशेष…प्रासंगिक लेख
ग्रंथ पंढरीचे वारकरी स्वातंत्र्य सेनानी सूर्यभानजी पवार…
“ग्रंथ हेच गुरु । ग्रंथ कल्पतरू ।।” असा संतांनी ग्रंथांचा महिमा गायला आहे. ग्रंथ वाचनाने माणूस सम्रृद्ध होतो, त्याच्या मनातील इच्छित साध्य होते, असा एक लोकसमज आहे.प्राचीन काळापासून ग्रंथांचे महात्म्य अनेकांनी जाणले आहे.मराठी साहित्यामध्ये महानुभवांनी आणि वारकऱ्यांनी प्रचंड साहित्य लिहून महान ग्रंथ परंपरा निर्माण केली. जगद्गुरु संत तुकारामांनी तर शब्दांचे मोठेपण सांगताना म्हटले आहे-
“आम्हा घरी धन शब्द हेच रत्न शब्द हेच शस्त्र यत्ने करू । शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन शब्दे धन वाटू जनलोका ।। “
संत तुकारामांनी शब्दांना थेट देवाची उपमा दिलेली आहे. अशा शब्दांची भेट आपल्याला ग्रंथरूपाने होत असते.ग्रंथ म्हणजे मानवी जीवनातील महत्त्वाचा ठेवा असतो.
आधुनिक काळात महात्मा जोतिराव फुले,सावित्रीबाई फुले, लोकहितवादी,गोपाळ गणेश आगरकर,न्यायमूर्ती रानडे,संत गाडगेबाबा,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,अण्णा भाऊ साठे अशा अनेक समाजसुधारकांनी ग्रंथांचे महत्त्व जाणले होते. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी ग्रंथांचे महत्त्व जन लोकांना सांगितले,अशा ग्रंथ मित्रांपैकीच एक म्हणजे स्वातंत्र्य सेनानी सूर्यभानजी पवार होत.त्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील गोदावरी नदी तीरावरील शेती समृद्धीने नटलेल्या वझूर या ऐतिहासिक गावी झाला.वझूर या गावी होयसळ शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे ऐतिहासिक रामेश्वर मंदिर आहे.लहानपणापासूनच बंडखोर स्वभाव असलेल्या सूर्यभानजी अण्णांनी हैदराबादच्या निजामाच्या राज्यातील जुल्मी रजाकारांविरुद्ध परभणी जिल्ह्यामध्ये मोठी आघाडी उघडली होती.स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली परभणी जिल्ह्यात तेव्हा विनायकराव चारठाणकर,सूर्यभानजी पवार आदी तरुणांनी रझाकारांच्याविरुद्ध एल्गार पुकारला होता. ऐन तारुण्यामध्ये सूर्यभानजी अण्णांनी रझाकारांच्या अन्याय अत्याचाराविरोधात बहुजन समाजातील युवकांची सशस्त्र फळी उभारून अनेकदा रजाकारांचा सामना केला होता.अनेकदा भूमिगत राहून अण्णांनी निजामाच्या अनेक कारवाया नाकाम केल्या होत्या.अखेर त्यांच्या लढ्याला यश आले आणि १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने भारत सरकार पुढे शरणागती पत्करली,मराठवाड्यावरील निजामाची निरंकुश सत्ता अखेर सूर्यभानजी अण्णांसारख्या धाडसी तरुणांमुळे संपुष्टात आली.
मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त केल्यानंतर स्वातंत्र्य सेनानी सूर्यभानजी अण्णा यांनी आपला मोर्चा सामाजिक सुधारणांकडे वळविला.त्यांच्यावर मुळामध्ये वारकरी परंपरेचे समतावादी संस्कार पडलेले होते.त्याचबरोबर अण्णांनी लहानपणी राष्ट्र संत गाडगेबाबांची कीर्तने अनेकदा ऐकली होती. त्यामुळे गाडगेबाबा हे त्यांचे आदर्श होते.गाडगेबाबा म्हणतात, ” बाबांनो,घरातील ताटं विका.भाकरी हातावर घेऊन खा.पण लेकरं शिकवा.बायकोला कमी किमतीचे लुगडे घ्या; पण लेकरं शिकवा. विद्या मोठे धन आहे.भावांनो विद्या मोठे धन आहे. ” गाडगेबाबांचा हा संदेश सूर्यभानजी अण्णा यांनी तंतोतंत पाळला. त्यांनी आपली सर्व मुले तर शिकवलीच;परंतु आपल्या नातेवाईकांना आणि गावातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले.एवढेच नव्हे तर परिसरातील मुले आणि मुली शिकल्या पाहिजेत,उच्चशिक्षित झाल्या पाहिजेत, यासाठी जिवाचे रान केले.ज्या ज्या ठिकाणी अण्णा जात त्या त्या ठिकाणी शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करीत.
भारतासारख्या प्रचंड विषमता असलेल्या देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही उपाय सर्वसामान्य माणसा जवळ नाही.म्हणून सर्वांनी शिकलं पाहिजे असा अण्णांचा आग्रह असे.त्यांनी आपल्या गावात अनुसया सार्वजनिक वाचनालय काढले.व्यायाम शाळा निर्माण केली. स्वातंत्र्य सेनानी सूर्यभानजी अण्णांचे चिरंजीव प्रा.डॉ.रामेश्वर पवार यांनी अण्णांचा ग्रंथप्रेमी वारसा सर्वदूर पोहोचविण्याचे ऐतिहासिक कार्य अण्णांच्या पावलावर पाऊल टाकून केले आहे. घरातील लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून अण्णा अनेक ठिकाणाहून पुस्तके घेऊन येत.अण्णा स्वतः जरी वारकरी असले तरी त्यांनी नामदेव गाथा,तुकाराम गाथा,ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत,संत भजनावली,सकल संत गाथा या आध्यात्मिक साहित्याबरोबरच आपल्या घरी अनेक महामानवांची चरित्रे आणि इतर वैचारिक ग्रंथ आणलेली होती. अण्णांनी पूर्णा परिसरात अनेक ग्रंथालयं सुरू करून दिली. ग्रंथांची गोडी सर्व सामान्य माणसाला लागावी म्हणून त्यांनी ग्रंथालय चळवळीच्या माध्यमातून अधिवेशने,कार्यशाळा, चर्चासत्रे असे अनेक उपक्रम घेतले.म्हणूनच महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची योग्य दखल घेत सूर्यभानजी अण्णा यांनी स्थापन केलेल्या अनुसया सार्वजनिक ग्रंथालयास सन २०१७-१८ या वर्षीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार,रोख पन्नास हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन तत्कालीन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दि.६ फेब्रुवारी २०२२ रोजी अण्णांचा पहिला स्मृतिदिन. यानिमित्त ग्रंथालय संघाचे अधिवेशन पूर्णा (जं.) तालुक्यातील वझूर येथील अनुसया सार्वजनिक ग्रंथालयात संपन्न होत असून ग्रंथालय चळवळीत कार्य करणार्या कार्यकर्त्यांस स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार यांच्या नावाने ग्रंथालय चळवळीतील योगदानाबद्दल सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व रोख पाच हजार रुपये असलेला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.स्वातंत्र्यासाठी लढलेले अण्णा अखेरपर्यंत ग्रंथालय चळवळीतही कार्य करत राहिले.म्हणून मला ते ग्रंथ पंढरीचे वारकरी वाटतात.अण्णांचा हा वारसा त्यांचे सुपूत्र रामेश्वर पवार उत्तमरीत्या चालवत आहेत.त्यांच्या कार्यात असेच उत्तरोत्तर यश लाभो आणि अण्णांचा हा वारसा पुढे सरकत राहो.ग्रंथ पंढरीचे वारकरी स्वातंत्र्य सेनानी सूर्यभानजी अण्णा यांच्या पहिल्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
प्रा.डॉ.संजय कसाब,
स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय,
पूर्णा जि.परभणी.