गुणवाड केल्याच्या गुन्ह्यातील ३ शिक्षकांची भोकर न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता
इयत्ता १० वी च्या काही विद्यार्थ्यांची गुणवाड केल्या प्रकरणी लातूर शिक्षण मंडळ (बोर्ड) समितीने सन २०१० मध्ये भोकर पोलीसात दाखल केला होता हा गुन्हा
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तालुक्यातील इयत्ता १० वी च्या काही विद्यार्थ्यांची गुणवाड केल्याचा ठपका ठेऊन लातूर शिक्षण मंडळ(बोर्ड) समितीने सन २०१० मध्ये ३ शिक्षकांविरुद्ध भोकर पोलीसात गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी सबळ पुरावे न मिळाल्याने भोकर न्यायालयाचे मुख्य नायदंडाधिकारी तथा वरीष्ठ स्तरीय दिवाणी न्यायाधीश मंदार पांडे यांनी या ३ शिक्षकांची दि.४ फेब्रुवारी रोजी निर्दोष मुक्तता केली आहे.
सरस्वती विद्यालय भोकर येथील शिक्षक पिराजी वाठोरे, शिवम शिवशंकर विद्यालय,दिवशी ता.भोकर येथील शिक्षक दिपक वाठोरे व काशीनाथ दहीफळे यांनी सन २०१० मध्ये इयत्ता १० वी परिक्षेचे पेपर तपासणीसाठी आले असता काही विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेतून वेगवेगळ्या विषयात गुणवाड केली व शिक्षण मंडळ(बोर्ड)समितीची फसवणूक केली.असा ठपका ठेऊन लातूर शिक्षण मंडळ(बोर्ड) समितीने दिलेल्या फिर्यादीवरून उपरोक्त ३ शिक्षकांविरुद्ध कलम ४६८,४६७, ४२०भा.द.वि.प्रमाणे भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.सदरील गुन्हे प्रकरणी वरीष्ठ स्तरीय दिवाणी न्यायालय,भोकर येथे नियमित फौजदारी खटला क्र.१८५/ २०२० सुरु होता. दरम्यानच्या काळात लातूर शिक्षण मंडळ(बोर्ड)समितीचे संचालक,अध्यक्ष व इतर आणि पोलीसांसह एकूण १० साक्षीदार मा. न्यायालयाने तपासले.यात पोलीस तपासात आढळुन आलेल्या त्रुटी व लातूर बोर्डाने दिलेल्या साक्षिदारांतील जबाबात तफावती आढळून आल्या.तसेच सरकारी वकील व आरोपींची बाजू मांडणारे वकील अॅड.एस.एस.कुंटे यांच्यातील युक्तिवादा अंती कागदोपत्री पुरावे त्या शिक्षकांच्या विरुद्ध गेले नाहीत.त्यामुळे सबळ पुराव्यां अभावी ते शिक्षक दोषी न ठरल्याने मुख्य न्याय दंडाधिकारी तथा वरीष्ठ स्तरीय दिवाणी न्यायाधीश मंदार पांडे यांनी दि.४ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या निकालात उपरोक्त ३ शिक्षकांची निर्दोष मुक्तता केली.तर सदर गुन्हे प्रकरणी सक्षमपणे बाजू मांडून न्याय मिळवून दिला म्हणून भोकर न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ अॅड.एस.एस.कुंटे यांचे पुष्पगुच्छ देऊन त्या शिक्षकांनी आभार मानले आहेत.