Mon. Dec 23rd, 2024

खबरदार…”अण्णा भाऊ साठेंच्या ‘माझी मैना गावावर राहिली’ या अजरामर छक्कडेचे विडंबन कराल तर आम्ही खपवून घेणार नाही!

Spread the love

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनी अर्थातच १८ जुलै पासून “जिवाची होतिया काहिली” ही टी.व्ही.मालीका सुरु करण्या मागिल हेतू काय ?

१ मे १९६० रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन संयुक्त महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये अस्तित्वात आली व तमाम मराठी भाषीक जनतेचे संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन करण्याचे स्वप्न अखेरीस साकार झाले.परंतु कर्नाटकातील मराठी भाषीक बेळगाव,कारवर, निपाणी हे गावे अद्यापही महाराष्ट्रात सामविष्ठ झाली नाहीत ही सल अजूनही मराठी माणसाच्या मनात कायम आहे.महाराष्ट्र आणि कर्नाटक यामधील न सुटलेला सीमाप्रश्न अजूनही कायम आहे.

बेळगाव,कारवार,निपाणी हा सुंदर मराठी भाषीक भाग आपल्याला मिळाला नसल्याने महाराष्ट्राची आणि या भागाची ताटातूट झाली आहे,असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना वाटल्याने त्यांनी दोन जिवांची ताटातूट झाल्यावर मनावर काय वेदना होतात याचं समर्पक वर्णन मांडण्यासाठी ” माझी मैना गावावर राहिली,माझ्या जिवाची होतिया काहिली” या अजरामर छक्कडीचा जन्म  घातला.तत्कालीन मुंबईचं वर्णन त्यात येते,कामगारांचं जीवन कसं,गरिबी कशी असते याची झलक देखील त्यातून पाहायला मिळते.तर संयुक्त महाराष्ट्रासाठी ज्यांनी रक्त सांडलं आहे त्यांचा यथोचित गौरव ही यात केलेला दिसतो.
हेच नव्हे तर संयुक्त महाराष्ट्र विरोधी नेत्यांना ” रावणाचं देखील गर्वहरण झालं होतं तशीच तुमची अवस्था होईल असे त्यांनी सुनावले असून हा मराठी माणूस अद्दल घडविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा ही यातून दिला आहे.

“माझी मैना गावावर राहिली
माझ्या जिवाची होतीया काहिली”

अण्णा भाऊ साठे यांची ही अजरामर साहित्य कलाकृती वरवर पाहिली तर एक प्रेमगीत वाटते,पण त्यातला अर्थ आणि संदर्भ पाहिले तर एक भाषीक दोन अतुट जीव दोन ठिकाणी अडकून पडली असल्याने त्यांच्या जीवाची होणारी “काहिली” यातून प्रकट होते. “काहिली” म्हणजे वेदना,परंतु ती कोणत्याही मोजपट्टीत व मापात न मोजता येणारी.त्यामुळेच संयुक्त महाराष्ट्र प्रेमी,लढवय्ये व तत्कालीन तमाम मराठी भाषीकांच्या ह्रदयावर ही छक्कड कोरली गेली आणि उर्जास्त्रोत ठरली आहे.अद्यापही बेळगाव,कारवार, निपाणी हे भाग संयुक्त महाराष्ट्रात आले नाहीत.अण्णा भाऊ साठे यांनी याच मराठी माणसाच्या दुखत्या शिरेवर बोट ठेवून “माझी मैना गावावर राहिली” ही अजरामर छक्कड लिहिली आहे आणि जोपर्यंत बेळगाव,कारवर,निपाणी हे महाराष्ट्रात सामील होणार नाहीत तो पर्यंत मराठी भाषीकांच्या लढ्यासाठीचे ‘प्रेरणा गित’ गातच राहिले जाणार आहे.संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे शिल्पकार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे हे प्रेरणा गित सेवा,समर्पण,त्याग, बलिदान, संस्कृती,परंपरा,राजकारण,समाजकारण, दंतकथा,कृषिजीवन,अलंकार,कला अविष्कार, इतिहास,देश प्रेम,मानवता, समतेचं दर्शन अनंत काळ देतच राहणार आहे.म्हणून या प्रेरणा गितातील अर्थातच छक्कडेतील सुवर्णाक्षरी काही ओळी चोरुन छेडछाड,विडंबन करुन एखादा चित्रपट,टी.व्ही. मालीका काढून काही गैर प्रकार दर्शविणे योग्य नव्हे असे वाटते…

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनी अर्थातच १८ जुलै पासून “जिवाची होतिया काहिली” ही टी.व्ही.मालीका सुरु करण्या मागिल हेतू काय ?

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनी अर्थातच १८ जुलै पासून सोनी मराठी टी.व्ही.वर  “जिवाची होतिया काहिली” ही मालीका सुरु होणार आहे. यातून मराठी मुलगा व कानडी मुलगी यांच्यातील भाषेपलीकडचे प्रेम दाखविले जाणार आहे म्हणे? तर त्या दोघांच्या प्रेमात भाषा,जात व प्रांतवाद आडवा येणार नाही असं ही दर्शविल्या जाणार आहे म्हणे…?
या मालिके विषयीचा “ट्रेझर” टी.व्ही.आणि समाज माध्यमांवरुन दाखविला जात आहे.

हेच ते त्या मालिकेचा प्रमो ट्रेझर …VDO

दोन भाषा आणि संस्कृती एकत्र आल्या की काही प्रमाणात भांड्याला भांडं लागतचं व मराठी आणि कानडी भाषेतलं हे गोड भांडण या मालिकेच्या ट्रेंझर मधून दाखविल्या जात आहे.कर्नाटकात राहून आमच्यावरच दादागिरी करता असं वाक्य या प्रोमोमध्ये ऐकू येत असल्याने महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर हे कथानक असावं असे वाटते.तसेच प्रोमोच्या शेवटी एकमेकांच्या मतभेदांमुळे दोन्हीही कुटुंबातील पुरुष एकाच घरात बॉर्डर आखायला सांगतात.एकाच घरात भाषा, संस्कृती यावरून होणारे मतभेद आणि त्यात रंगणारी ही प्रेमकथा बघायला मिळणार आहे असे ही दर्शविले जात आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रसिद्धीस आलेला राज हंचनाळे हा मराठी मुलाच्या भूमिकेत दिसत आहे. तर प्रतीक्षा शिवणकर ही कानडी मुलीच्या भूमिकेत दिसत आहे.याशिवाय दोन्ही कुटुंबातील पात्र साकारतांना अतुल काळे,सीमा देशमुख,विद्याधर जोशी,भारती पाटील असे आदी कलाकार यात दिसत आहेत.या प्रोमोच्या शेवटी घरचे दोन हिस्से करताना एक खास संवाद मुलामुलींमध्ये होतो.त्यातून त्यांचं गहिरं प्रेम आणि एकमेकांशी लग्न करायची इच्छा सुद्धा समजते.कानडी मुलगी आणि मराठी मुलगा यांचं हे भाषेपलीकडचं प्रेम नेमकं कोणास पसंत पडणार आहे ? हे पाहणं महत्त्वाचं असेल.सध्या तरी प्रेक्षकांना या मालिकेबद्दल बरीच उत्सुकता निर्माण होताना दिसत असली तरी माझ्या सारख्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विचार प्रेमी अनुयायी समोर काही प्रश्न उभी राहत आहेत.ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र निर्मिती ते आजतागत मराठी व कानडी भाषा वाद जीवंत असतांना विश्व साहित्यभुषण अण्णा भाऊ साठे यांच्या ” माझी मैना गावावर राहिली,माझ्या जिवाची होतिया काहिली” या छक्कडेतील “जिवाची होतिया काहिली” ही ओळ या मालिकेच्या निर्माता,दिग्दर्शकाने का चोरली असावी? तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनी ही मालिका सुरु करण्या मागचा त्यांचा हेतू काय ?

कर्नाटकातील मराठी भाषीक बेळगाव,कारवर,निपाणी हे गावे अद्यापही महाराष्ट्रात सामविष्ठ झाली नाहीत ही सल अजूनही मराठी माणसाच्या मनात कायम असल्याने त्यांच्या “जिवाची काहिली” होतांना आपण पाहतो आहोच.त्याच अनुशंगाने या मालिकेतून त्यांच्या पवित्र भावना कथानकातून मांडल्या गेल्या व दर्शविल्या गेल्या तर उत्तमच आणि अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी पाहिलेल्या तथा राहिलेल्या अधु-या स्वप्नांची उजळणी होईल.परंतु असे न करता प्रेम कथेच्या नावाखाली नको ती भंकसगिरी,
चिल्लरपणा,अश्लीलता,स्त्री चारित्र्य हनन,हिंचारार, अत्याचार दर्शविल्या जाऊ नये अशी प्रांजळ अपेक्षा आम्ही करतोत.कारण कानडी व मराठी या द्वीभाषीकांतील मराठी भाषीक हे महाराष्ट्रात येऊ इच्छित असतील तर त्यांच्या “जिवाच्या काहिलीचा” मुळ विषय भरकटू नये असे वाटते.तो विषय जर भरकटला गेला तर नक्कीच विश्व साहित्यभुषण अण्णा भाऊ साठे यांच्या ” माझी मैना गावावर राहिली,माझ्या जिवाची होतिया काहिली” या ऐतिहासिक अजरामर छक्कडेचे विडंबन केल्यागत होईल ? आणि असे झाले तर अण्णा भाऊ साठे विचार प्रेमी,अनुयायी कदापिही हे मान्य करणार नाहीत,सहन ही करणार नाहीत.म्हणून सदरील मालिकेच्या निर्माता,दिग्दर्शकाने “अण्णा भाऊ साठेंच्या “माझी मैना गावावर राहिली” या अजरामर छक्कडेतील ” जिवाची होतिया काहिली” ही ओळ मालिकेच्या शिर्षकासाठी का निवडली ? आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या पुण्यतिथी दिनी अर्थातच १८ जुलै पासून “जिवाची होतिया काहिली” ही टी.व्ही.मालीका सुरु करण्या मागिल त्यांचा हेतू काय ? हे स्पष्ट करणे ही गरजेचे आहे.विश्व वंदनिय अण्णा भाऊ साठे यांना या दिवशी आदरांजली अर्पण करण्याणा यामाध्यमातून स्वच्छ हेतू असेल तर त्यांचे स्वागतच,हेतू स्वच्छ असेल अशी अपेक्षा आम्ही ठेवतोत.अन्यथा…
खबरदार…”अण्णा भाऊ साठेंच्या “माझी मैना गावावर राहिली” या अजरामर छक्कडेचे विडंबन कराल तर आम्ही कदापिही खपवून घेणार नाही…! तसेच लोकशाही मार्गाने या मालिकेच्या संबंधितांविरुद्ध आंदोलन करु…!
सदरील मालिकेला हे शिर्षक देण्यामागचा आणि १८ जुलै पासून ही मालिका सुरु करण्याचा त्यांचा काय हेतू आहे ? याबाबत साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विचार प्रेमी,साहित्य प्रेमी व अनुयायींनी जाब विचारला पाहिजे अशी विनंती करतो आणि या महान साहित्यीकास विनम्र अभिवादन करुन थांबतो.

🌹🙏🌹
उत्तम बाबळे,संपादक
साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !