केवळ पाट्या बदलून मराठीचे संवर्धन होणार नाही-डॉ.जगदीश कदम
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : केवळ दुकानाच्या पाट्या बदलून मराठी भाषेचे संवर्धन होणार नाही.त्यासाठी मराठी माणसाची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.मराठीतून बोललो म्हणजे आपण अप्रगत ठरतो,हा न्यूनगंड मनातून काढून टाकला पाहिजे.वेगवेगळ्या राजवटीत मराठी भाषेवर आक्रमणे झाली,परंतु ती परतवून लावण्याचे सामर्थ्य या भाषेने दाखवले.परभाषा ही पाहुण्यासारखी असावी तिच्या हातात घराच्या चाव्या देऊ नये.’असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.जगदीश कदम यांनी भोकर येथे केले.
दिगंबरराव बिंदू महाविद्यालयातील मराठी भाषा विभाग आणि उच्च शिक्षण विभाग भाषा संचालनालय,महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उदघाटन करताना डॉ.कदम बोलत होते.दि.१६ जानेवारी २०२२ रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंजाबराव चव्हाण होते.याप्रसंगी मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच समीक्षक प्रा.डॉ.बाबुराव खंदारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आरंभी मराठी विभाग प्रमुख डॉ.जे.टी.जाधव यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला.या वेळी बोलताना डॉ.खंदारे म्हणाले की,मराठी भाषेत इतर भाषेतील अनेक शब्द आलेले आहेत.त्यामुळे ही भाषा भ्रष्ट होताना दिसते.मराठी भाषेला वैभवाचे दिवस आणायचे असतील तर व्यवहारात मराठीचा जाणीवपूर्वक वापर केला पाहिजे.तर अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ.चव्हाण यांनी मराठी भाषा ही ग्रामीण भागातील सामान्य माणसांनी जोपासली आहे,असे सांगितले.या आभासी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा.राजेंद्र चौधरी यांनी केले. या कार्यक्रमात विद्यार्थी,प्राध्यापक आणि भाषाप्रेमी सहभागी झाले होते.