कामगार नेते विजय रणखांब यांना राज्य शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर
५१ जणांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार आणि एकास कामगार भुषण पुरस्कार-२०१९ ने करण्यात येणार आहे सन्मानित…
अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दिल्या जाणा-या गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार व कामगार भूषण पुरस्कार- २०१९ अंतिमनिवड यादी प्रसिध्द करण्यात आली असून नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र सामाजिक व कामगार चळवळीतील बहुआयामी व्यक्तीमत्व तथा भारतीय कामगार सेनेचे लढवय्ये नेते विजय रणखांब यांना शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार -२०१९ जाहीर झाला आहे.सदरील पुरस्काराचे लवकरच एका भव्य कार्यक्रमात वितरण होणार असून विविध क्षेत्रातून विजय रणखांब यांचे अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळाच्या संदर्भ पत्र क्र. मकाक/ २०१९/प्र.क्र.२२३ / कामगार-१० दि.०४ मार्च २०२२ उपरोक्त विषयाला अनुसरून महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणा-या कामगार व कर्मचा-यांना साहित्य,सामाजिक,शैक्षणिक,क्रीडा आदी क्षेत्रातील विशेष योगदानासाठी मंडळाकडून गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार दिला जातो.तसेच,गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील १० वर्ष साहित्य,सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा आदी क्षेत्रात योगदान देणा-या कामगारास मंडळाकडून कामगार भूषण पुरस्कार दिला जातो.सन- २०१९ करीता सदर पुरस्काराचे अर्ज विश्वकर्मा आदर्श कामगार कल्याण पुरस्कार या नावाने मागविण्यात आले होते.परंतु शासनाने संदर्भीय पत्रान्वये सदरील पुरस्काराचे नाव हे पुर्वीप्रमाणेच “गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार या नावाने प्रदान करण्यास मान्यता दिली आहे.
“गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार व कामगार भूषण पुरस्कार सन-२०१९ करीता ५२ कामगारांची निवड करण्यात आली आहे.त्यात गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार ५१ जणांना जाहीर झाला असून रोख पारितोषीक म्हणून रु.२५०००/-, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.तर कामगार भूषण परस्कारासाठी एकाची निवड करण्यात आली आहे. रु. ५००००/-, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. दोन्ही पुरस्काराची अंतिम निवड जाहीर झाली असून कामगार व विविध क्षेत्रातील चळवळींतील योगदान पाहता म.रा.वि.वि.कंपनी मर्यादित विद्युत भवन कार्यालय,जितुर जि. परभणी येथे सेवारत असलेले व कल्याण नगर नांदेड येथील रहिवासी असलेले कामगार नेते विजय रणखांब यांचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारार्थीमध्ये समावेश आहे.विजय रणखांब यांना हा पुरस्कार जाहीर झाला असल्याने त्यांचे सामाजिक,कामगार,शैक्षणिक व आदी क्षेत्रांतून अभिनंदन होत आहे.संपादक उत्तम बाबळे व अंबुज प्रहार परिवाराच्या वतीने ही त्यांचे मनापासून अभिनंदन आणि भावी सेवाकार्यासाठी शुभेच्छा !