कर्मयोगी ‘भास्करराव बिंदु’ यांचा भोकर येथे १३ ऑगस्ट रोजी होत आहे जन्मशताब्दी सोहळा
भोकर भुषण ‘बिंदु’ घराण्यातील ‘कर्मयोगी भास्करराव बिंदु’ यांची आज ११ ऑगस्ट रोजी शताब्दीय जयंती आहे,त्या औचित्याने…
उत्तम बाबळे,संपादक
देश स्वातंत्र्य,हैद्राबाद तथा मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्याचे अग्रणी लढवय्ये स्वातंत्र्य सेनानी,हैद्राबाद राज्याचे पहिले गृहमंत्री भोकरचे भुमिपुत्र स्व. दिगंबरराव बिंदु यांच्या घराण्यातील उच्च विद्या विभुषित,स्वातंत्र्य सेनानी सहकर्मी,सेवानिवृत्त अधिकारी,समाजसेवी व्यक्तिमत्त्व, भोकर येथील दिगंबरराव बिंदु स्मारक समिती तथा महाविद्यालयाचे संस्थापक सदस्य ‘कर्मयोगी भास्करराव आनंदराव बिंदु’ यांची दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी शताब्दीय जयंती आहे.त्यांच्या कार्यकर्तुत्वाच्या गौरवार्थ दि.१३ ऑगस्ट २०२३ रोजी भोकर येथे ‘जन्मशताब्दी सोहळा’ साजरा होत असल्याच्या औचित्याने…
तेलगू,कानडी व मराठी भाषिकांच्या हैद्राबाद संस्थानातून मराठी भाषिक मराठवाडा मुक्त करुन तो संयुक्त महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी ‘जालीम विषवल्ली’ विरुद्ध हैद्राबाद तथा मराठवाडा मुक्ती संग्राम लढा ‘स्वामी रामानंद तीर्थ’ यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी लढला त्या लढ्यातील अग्रणी स्वातंत्र्य सेनानी दिगंबरराव बिंदु हे भोकर जि.नांदेडचे भुमिपुत्र.भोकर व तालुक्यातील नागरिकांसाठी अभिमानाची बाब म्हणजे हैद्राबाद राज्य सरकारमध्ये मराठी भाषिक पहिले शिक्षणमंत्री केशवराव कोरटकर,पहिले विधानसभा अध्यक्ष काशीनाथराव वैद्य,देवीसिंह चौहान,फुलचंद गांधी यांच्या सोबत पहिले गृहमंत्री म्हणून ज्यांनी लोकसेवा केली ते म्हणजे भोकरचे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी ‘दिगंबरराव बिंदु’ हे होत.’बिंदु’ घराणं हे भोकर चे पोलीस पाटीलकी व वतनदार घराणं…
‘बिंदु’ घराण्यातील तथा स्वातंत्र्य सेनानी दिगंबरराव बिंदु यांचे बंधू आनंदराव बिंदु यांचे पुत्र भास्करराव बिंदु यांचा जन्म दि.११ ऑगस्ट १९२३ रोजी भोकर येथे झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण भोकर व नांदेड येथे झाले आणि माध्यमिक शिक्षण गुलबर्गा नुतन विद्यालय,गुलबर्गा येथे झाले.तर उस्मानिया विद्यापीठ,हैद्राबाद येथे त्यांचे पदवी पर्यंतचे शिक्षण झाले.देश स्वातंत्र्य लढा सुरु असतांना जनजागृती करण्यासाठी पत्रके छापली जायची.त्यांच्या मित्राचे वडील बळवंतराव सराफ यांचा होळी,नांदेड येथे एक छापखाना होता.तेथे छापण्यात आलेली पत्रके स्वातंत्र्य सेनानींना पुरविण्याचे महत्त्वपुर्ण कार्य त्यांनी अगदी बालवयात केले.त्यामुळे ते स्वातंत्र्य सेनानींचे सहयोगी व सहकर्मी ठरले.पदवी शिक्षण घेत असतांना शैक्षणिक खर्चाचे आर्थिक ओझे कुटूंबियांवर पडू नये व हातभार ही लागावा म्हणून ते होतकरू विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घ्यायचे. त्यांच्या शिकवणीतून घडलेले अनेक विद्यार्थी पुढे मोठे अधिकारी व निष्णात वकील झाले.
भास्करराव बिंदु हे तत्कालीन उच्च विद्या विभुषित असल्याने सन १९४५ – ४६ च्या दरम्यान त्यांना तत्कालीन हैदराबाद राज्याच्या शासकीय सेवेत नौकरी मिळाली.सचिवालयातील अर्थ विभागात (Finance Dept.) मध्ये त्यांच्या शासकीय सेवेस प्रारंभ झाला. तर देश स्वातंत्र्यानंतर सन १९५६ मध्ये ते गटविकास अधिकारी झाले व वैजापुर जिल्हा औरंगाबाद(आताचे छत्रपती संभाजी नगर) येथे गट विकास अधिकारी म्हणून सर्वप्रथम लोकसेवा केली.देश सेवा,समाजसेवा व राजकीय वारसा असलेल्या ‘बिंदु’ घराण्यातील भास्करराव बिंदु यांची ही नियुक्ती ख-या अर्थाने त्यांना त्यांच्या कर्तुत्वाला वाव देणारी व लोकसेवेचे काम करण्याची संधी देणारीच ठरली.गट विकास अधिकारी म्हणून त्यांनी वैजापूर,सिलोड,अंबाजोगाई,उदगिर,औरंगाबाद,पैठण, कन्नड या ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला.ही लोकसेवा बजावताना सन १९७२-७३ च्या दुष्काळी परिस्थिती मध्ये त्यांनी विशेष परिश्रम घेतले.शासनाच्या कुठल्याही योजना असोत त्याची अंमलबजावणी करण्यात ते नेहमीच अग्रेसर होते.त्यांच्या या कार्यकर्तुत्वाचा गौरव म्हणून सन १९७३ मध्ये महाराष्ट्र शासनाने ‘सुवर्ण पदक’ देवुन त्यांचा यथोचित सन्मान केला.नासिक जिल्ह्यातील सुरगाणा व इगतपुरी या आदिवासी तालुक्याच्या ठिकाणी विशेष प्रकल्प अधिकारी म्हणून ही त्यांनी सेवा बजावली.तसेच नांदेड,अकोला,परभणी,बीड येथे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावली. परभणी व बीड जिल्हा परिषदेचे बर्याच वेळा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही त्यांनी पदभार सांभाळला होता.दरम्यानच्या सेवा कार्यकाळात सामाजिक,शैक्षणिक,राजकिय क्षेत्रात त्यांनी निस्वार्थ कार्य कर्तुत्वाचा ठसा कायम ठेवला.यामुळेच आयुक्त, जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी,पोलीस अधीक्षक यांसह आदी ज्येष्ठ सनदी अधिकारी यांना ते प्रिय होते.कटू वेळ प्रसंगी त्या अधिकाऱ्यांना त्यांच्या अनुभवाचा सल्ला मोलाचा वाटायचा.त्यांच्या एकूण प्रशासकीय कार्य कुशल प्रणाली साठी वरीष्ठ नेहमीच त्यांना मान देत असत,म्हणूनच सेवा निवृत्तीनंतर ही त्यांना महाराष्ट्र शासनाच्या परभणी येथिल “Maharashtra Oil Seeds Corporation Ltd.” या शासन अंगीकृत महामंडळाच्या प्रशासकीय अधिकारी या पदी दोन वर्षे पुनःनियुक्ती देण्यात आली होती.
भास्करराव बिंदु यांनी शैक्षणिक क्षेत्रात ही भरीव तथा मोलाचे योगदान दिले आहे.भोकरचे भुमिपुत्र असल्यामुळे येथील शैक्षणिक क्षेत्रातील पिछेहाट व दयनीय अवस्था त्यांना पहावत नव्हती.कै.आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर यांनी लालबहादूर शास्त्री शिक्षणसंस्थे अंतर्गत श्री शाहू महाराज विद्यालयाच्या माध्यमातून भोकर येथे तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता १२ पर्यंतचे शिक्षण उपलब्ध करून दिले.परंतू पुढील महाविद्यालयीन शिक्षणाची भोकर येथे सोय नव्हती.यामुळे असंख्य विद्यार्थ्यांची हेळसांड व्हायची.त्यामुळे भोकर येथे एक महाविद्यालय व्हायला पाहिजे असे त्यांना वाटायचे.त्यामुळे त्यांनी दिगंबरराव बिंदु यांचे सहकारी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भुजंगराव पाटील किन्हाळकर,स्वातंत्र्य सेनानी डॉ.दासराव साखळकर, स्वातंत्र्य सेनानी हणमंतराव देशपांडे,सामाजिक कार्यकर्ते मुरादमीया मांजरंमकर,बालाजी चिंतावार,माजी सभापती आप्पाराव देशमुख सोमठाणकर यांसह आदी प्रतिष्ठित व्यक्तींपुढे कै.दिगंबरराव बिंदु यांचे स्मारक आणि महाविद्यालय भोकर येथे व्हायला पाहिजे असे तळमळीने आपले विचार व्यक्त केले. भास्करराव बिंदु व त्यांचे जेष्ठ बंधू दिनकरराव बिंदु यांच्या उपस्थितीत उपरोक्तांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली आणि त्यात “दिगंबरराव बिंदु स्मारक समिती” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.कागद पत्रांची पूर्तता करून ही समिती गठण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला व समिती स्थापन झाली.या स्मारक समिती अंतर्गत ‘दिगंबरराव बिंदु महाविद्यालयाची निर्मिती झाली.या समितीचे व महाविद्यालयाचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भुजंगराव पाटील किन्हाळकर यांना जबाबदारी देण्यात आली.या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी अध्यक्ष जेष्ठ स्वा.से.भुजंगराव पाटील किन्हाळकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केले.निधी उभारणे,मंजुरी मिळवणे,नेमणुका देणे,जागा विकत घेणे यासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले. भोकर ही जन्मभूमी व कर्मभूमी मानुन लोकसेवा करण्याचा त्यांनी संकल्प केला होता.देशाचे तत्कालीन पंतप्रधान स्व.पी.व्ही. नरसिंहराव यांच्या सोबत संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घडवून आणली होती.तसेच त्या संबंधी माहिती दिली व या महाविद्यालयास त्यांनी भेट द्यावी अशी विनंती केली होती. उपरोक्तांनी दिगंबरराव बिंदु महाविद्यालयाच्या शिक्षणाची लावलेल्या इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे.मला देखील अभिमानाने सांगावेसे वाटते की,वरील लढवय्या व त्यागी लोकांनी स्थापन केलेल्या या महाविद्यालयाचा मी उत्तम बाबळे एक विद्यार्थी आहे.माझे मित्र रामकृष्ण उर्फ बाळा साकळकर यांचे वडील तथा संस्थेचे संस्थापक सदस्य जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी डॉ.दासराव साकळकर यांनी या महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात माझा पहिला मुहूर्तीय प्रवेश करुन घेतला.या महाविद्यालयाने भोकर तालुक्यातील होतकरू,गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षणाचे द्वार उघडले व अनेक गुणवंत,यशवंत विद्यार्थी,अधिकारी,राजकीय व्यक्तीमत्वे घडविले आहेत.ते सर्वजण आज विविध क्षेत्रात आपले व महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करत आहेत.
देश स्वातंत्र्य,मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी सहकर्मी,ग्रामीण विकासासाठी तळमळीने लोकसेवा करणारे लोकप्रिय प्रशासकीय अधिकारी व मोठा जनसंपर्क असलेले भास्करराव बिंदु हे सर्वांना आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व होते. लोकसेवेसाठी आयुष्यभर झिजलेल्या या मोठ्या व बहुआयामी व्यक्तीतत्वाने दि.४ नोव्हेंबर १९९१ रोजी अंतिम श्वास घेतला. अख्खी हयात लोकसेवा हेच माझे ‘कर्तव्य’ म्हणून जगलेल्या या मोठ्या व्यक्तीमत्वास नासिक येथील त्यांचे कुटूंबिय स्नेही तथा विविध क्षेत्रात मोठे नाव असलेले डॉ.शुक्ल यांनी त्यांना ‘कर्मयोगी’ ही उपाधी दिली.मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे हे ७५ वे ‘अमृतमहोत्सवी’ वर्षं आहे.दि.१ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवा निमित्त विविध लोकोपयोगी,गौरवार्थ उपक्रम व कार्यक्रम राबविल्या जाणार आहेत.तर मराठवाडा मुक्तीसंग्रामात अमुल्य योगदान देणाऱ्या ‘बिंदु’ कुटूंबातील कर्मयोगी भास्करराव आनंदराव बिंदु यांची दि.११ ऑगस्ट २०२३ रोजी शताब्दीय जयंती आहे.त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करुन यथोचित गौरव करणे गरजेचे आहे.म्हणून ‘बिंदु’ कुटूंबिय व स्नेहिजणांनी दि.१३ ऑगस्ट २०२३ रोजी ओम लॉन्स,भोकर येथे जन्मशताब्दी सोहळ्याचे आयोजन केले आहे.या सोहळ्यास माजी मंत्री तथा दिगंबरराव बिंदु महाविद्यालयाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर,सचिव मुरादमिया मांजरेकर,प्राचार्य डॉ.पंजाबराव चव्हाण,विविध क्षेत्रातील मान्यवर व बिंदु कुटूंबिय सदस्यांची उपस्थिती राहणार आहे.कर्मयोगी भास्करराव बिंदु यांची आज शताब्दीय जयंती आहे.त्या औचित्याने त्यांच्या पावन स्मृतीस माझी व परिवाराची विनम्र आदरांजली!
🌹🙏🌹
✍️🌹
माहिती – सुभाषराव बिंदु
शब्दांकन- उत्तम बाबळे,संपादक