औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघांसाठी मतदारांनी नाव नोंदणी करावी
प्र.भोकर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांचे आवाहन
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातील मतदारांच्या नाव नोंदणीसाठी दि.१ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून या शिक्षक मतदार संघाची मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या अनुशंगाने दि.१ ऑक्टोबर २०२२ पासून नाव नोंदणीस सुरुवात झाली आहे.तरी भोकर उपविभाग व तालुक्यातील पात्र शिक्षक मतदारांनी आपली नाव नोंदणी करुन घ्यावी,असे आवाहन प्र. उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दि. ५ सप्टेंबर २०१६ च्या पत्रान्वये पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याच्या संदर्भात सुधारित सर्वसमावेशक सूचना दिल्या असून पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करावयाच्या अनुशंगाने दि.१ नोव्हेंबर २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत नाशिक व अमरावती विभागातील पदवीधर व औरंगाबाद,नागपुर आणि कोंकण विभागातील शिक्षक मतदार संघांसाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदार नाव नोंदणीच्या संदर्भाने प्र.भोकर उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी शुक्रवार, दि.७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता तहसिल कार्यालयातील बैठक कक्षात भोकर तालुक्यातील राजकीय पक्षांचे प्रमुख,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक, महाविद्यालयांचे प्राचार्य,पत्रकार बांधव यांची बैठक घेतली.यावेळी माहिती देतांना त्यांनी सांगितले की,औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघातील मतदारांच्या नाव नोंदणीला दि.१ ऑक्टोबर २०२२ पासून सुरुवात झाली आहे.दि.१ नोव्हेंबर २०२२ पूर्वी किमान ३ वर्षे आधी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त करून शिक्षक झालेले व याच विभागातील विधानसभा मतदार संघात असलेले नागरिक मतदार नाव नोंदणीसाठी पात्र आहेत.भोकर तालुक्यातील अशा पात्र शिक्षक मतदारांनी नाव नोंदणी करतांना नमुना क्र.१९ मध्ये अचूक माहिती नोंदवावी व हे अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालयात आणि तहसिल कार्यालय भोकर येथे उपलब्ध असून दि.१ ऑक्टोबर ते दि. ७ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मतदार नोंदणी अधिकारी किंवा पदनिर्देशीत अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत.या अर्जासोबत शैक्षणिक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.तसेच दि.१ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम ३१ (३) अन्वये जाहीर सुचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.दि.१५ ऑक्टोबर रोजी मतदार नोंदणी अधिनिय १९६० चे कलम ३१ (४) अन्वये नोटिसीची प्रथम पुर्नप्रसिद्धी करण्यात येणार आहे.दि.२५ ऑक्टोबर रोजी व्दितीय पुर्नप्रसिद्धी करण्यात येणार आहे.तर दि.७ नोव्हेंबर रोजी नमुना १८ किंवा १९ व्दारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम दिवस असणार आहे.दि.१९ नोव्हेंबर रोजी हस्तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई,दि.२३ नोव्हेंबर रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी,दि.२३ नोव्हेंबर ते दि.९ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तसेच दि.२५ डिसेंबर २०२२ रोजी दावे व हरकती निकाली काढण्याचा व पुरवणी यादी तयार करणे आणि छपाई करण्यात येणार आहे.दि.३० डिसेंबर २०२२ रोजी मतदान यादींची अंतिम प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
तरी उपरोक्त नियमात पात्र असलेल्या शिक्षक मतदारांनी आपली नाव नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन प्र.उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार राजेश लांडगे यांनी केले आहे.या बैठकीस भाजपाचे शहराध्यक्ष विशाल माने,भाकपाचे कॉ.दिलीप पोतरे,काँग्रेसचे मनोज गिमेकर,रिपाई (आठवले) चे ता.अध्यक्ष जयभीम पाटील,रा.लो.ज.पा.चे तालुकाध्यक्ष मझहर शेख,बसपाचे प्रा.डॉ.कैलास कानिंदे,भोकर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संपादक उत्तम बाबळे,सचिव बालाजी नार्लेवाड,उपाध्यक्ष सिद्धार्थ जाधव,पत्रकार गंगाधर पडवळे, शुभम नर्तावार,विठ्ठल सुरलेकर,प्रशांत कानडे यांसह आदींची उपस्थिती होती.तर सदरील बैठक यशस्वीतेसाठी तहसिल कार्यालय निवडणूक विभागाचे लिपिक दिलीप कावळे यांनी परिश्रम घेतले.