एका शिक्षकाकडून विवाहित विद्यार्थीनीचा विनयभंग
‘शिक्षकी’ पवित्र नात्याला काळीमा फासणा-या घटनेचा जागतिक महिला दिनी भोकर पोलीसात गुन्हा दाखल
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : तुला १० वीच्या परिक्षेत पास करुन देतो म्हणून शरीर सुखाची मागणी करत हात धरुन एका शिक्षकाने विवाहित विद्यार्थीनीचा विनयभंग केल्याची घटना भोकर तालुक्यात घडली असून शिक्षकी पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेचा गुन्हा ‘त्या’ शिक्षकाविरुद्ध जागतिक महिला दिनी भोकर पोलीसात दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील एका खेडेगावातील २० विवाहित महिलेला ती आजारी पडल्यामुळे इयत्ता १० वीची परिक्षा देता आली नव्हती. विवाहानंतर तिचे शिक्षण थांबले होते.परंतू या विवाहित महिलेला पुढील शिक्षण घेण्याची परवानगी तिचे पती व सासरच्यांनी दिल्याने तिने भोकर शहरातील एका शाळेत इयत्ता १० वीत प्रवेश घेतला होता व परिक्षेची तयारी सुरु केली होती.तालुक्यातील एका आश्रम शाळेवर शिक्षक असलेल्या बालाजी कांबळे,रा. प्रफुल्लनगर भोकर यांची तिचे पती,भाऊ व इतरांशी जुनी ओळख होती.यामुळे तिच्या पतीने ती १० वीची परिक्षा देणार असल्याचे या शिक्षकास सांगितले होते.तिचा भाऊ शाळेत जात नसल्याचे सांगण्याच्या व परिक्षेच्या पुर्वतयारी बाबत बोलण्याच्या बहाण्याने या शिक्षकाने तिच्या घरी ये जा सुरु केली होती.
याच दरम्यान दि.६ मार्च २०२२ रोजी दुपारी २:०० वाजताच्या सुमारास सदरील शिक्षक हा तिच्या घरी गेला व विना परवानगी घरात जाऊन तिला म्हणाला की,तु मला खुप आवडतेस,माझे तुझ्यावर प्रेम आहे.तू मला शरीर सुख दे मी तुला १० वीत पास करुन देतो.असे म्हणत तिचा उजवा हात धरुन या शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली व तिला लज्जा वाटेल असे वर्तन केले.यावेळी तिने त्या शिक्षकास घराबाहेर काढले व पती घरी आल्यानंतर घडलेल्या घटनेबाबाद सांगितले. बदनामी होईल म्हणून याबाबत इतर कोणासही काहीही तिने सांगितले नाही. परंतू पतीने तिला धीर दिल्यामुळे दि.८ मार्च २०२२ रोजी भोकर पोलीसात तिने धाव घेतली व वरील आशयाप्रमाणे घडलेल्या प्रकाराबाबत त्या शिक्षकाविरुद्ध रितसर फिर्याद दिली.या फिर्यादीवरून त्या शिक्षकाविरुद्ध गुरनं ००७९/२०२२ कलम ३५४,३५४ अ,४५२ भादवि प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जागतिक महिला दिनानिमित्त जगभरात नारी सन्मानार्थ विविध कार्यक्रम,उपक्रम राबविले जात असतांना भोकर तालुक्यात मात्र शिक्षक व विद्यार्थी या पवित्र नात्याला काळीमा फासली जाईल अशा प्रकारच्या घटनेचा गुन्हा जागतिक महिला दिनी भोकर पोलीसात दाखल करण्यात आला.सदरील घटना ही निषेधार्य असून पो.नि.विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पो.उप.नि. दिगंबर पाटील हे करत आहेत.