Fri. Apr 18th, 2025

आरोग्य सुविधेत कमतरता पडू देणार नाही-पालकमंत्री अशोक चव्हाण

Spread the love

भोकर तालुक्यातील विविध विकास कामांचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते झाले भुमीपूजन

अंबुज प्रहार प्रतिनिधी

नांदेड : गत दोन वर्षात कोविड-१९ सारख्या आव्हानातून सावरत आहोत.आरोग्याच्या या संकटाशी सामना करतांना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेत व सेवा-सुविधेत कोणतीही कमतरता पडणार नाही याची खबरदारी आपण घेतली आहे. विशेषत: ग्रामीण भागात आरोग्याच्या पायाभूत सुविधा चांगल्या दर्जाच्या उपलब्ध करण्यावर आम्ही अधिक भर दिला आहे. आरोग्य,पिण्याचे पाणी,सुधा प्रकल्पासह पिंपळढोह प्रकल्पाची उंची वाढवून पाण्याचे नियोजन भक्कम करणे,गाव तिथे स्मशानभूमी,पांदण रस्त्यांचा विकास एवढी महत्वाची कामे डोळ्यासमोर ठेवून यात अधिक चांगला बदल येत्या काही दिवसातच तुम्हा सर्वांच्या प्रत्ययास येईल,अशी नि:संदिग्ध ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

मोजे सावरगावमाळ येथे प्राथमिक उपकेंद्राच्या नवीन इमारतीसाठी गावात जागा उपलब्ध नव्हती.गावातील आरोग्याच्या सुविधेला अधिक नव्या स्वरुपात करता यावे, नव्या इमारतीला जागा मिळावी या उदात्त हेतूने गावातीलच बालाजी विठोबा कोल्हाटकर व त्यांच्या परिवाराने त्यांच्या मालकीची असलेली ५ गुंठे जमीन गावाच्या सेवेपोटी दवाखाण्यास विनामोबदला उपलब्ध करुन दिली.त्यांच्या या निर्णयाचे आणि सामाजिक कृतज्ञतेचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर कौतूक करून यथोचित सत्कार केला.

 भोकर तालुक्यातील सावरगाव माळ व पाळज आरोग्य उपकेंद्र नूतन इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते गावकऱ्यांशी संवाद साधतांना बोलत होते.प्रत्येकी ८० लक्ष रुपये खर्चून सावरगावमाळ व पाळज येथे परिसरातील गावकऱ्यांच्या सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नवीन उपकेंद्र इमारत बांधकाम करण्यात येत आहे.याप्रसंगी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर,भोकर पंचायत समितीच्या सभापती सौ.निता रावलोड,गोविंदराव शिंदे नागेलीकर,जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसीकर,भोकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्ह्यातील आरोग्याच्या सेवा-सुविधा या राज्य पातळीवर चांगल्या दर्जाच्या निर्माण केल्या जात आहेत.आपल्या शासकीय महाविद्यालयाच्या सेवा-सुविधांपासून जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीत,त्या ठिकाणी सिटी स्कॅन सारख्या नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधा,जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांना एक्सरेच्या मशीन्स,प्रत्येक तालुक्यात गरजू रुग्णांना तात्काळ रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने नवीन घेण्यात आलेल्या ६२ रुग्णवाहिका यातून मी जनतेला आश्वस्त करू इच्छितो. भोकर येथे १०० खाटांचे नवीन रुग्णालय आपण उभारत असून तालुक्यातील जनतेला आता भोकरमध्येच आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण होत असल्याने मोठ्या शहरांकडे जाण्याची गरज पडणार नाही.या जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याबाबत सक्षम आरोग्य यंत्रणा आपण उभी करीत असल्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

 भोकर व इतर तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजून प्रलंबित आहे याची मला कल्पना आहे.मागील चार वर्षांपासून याविषयीचा मी सातत्याने पाठपुरावा करून मागील वर्षी सुधा प्रकल्प,पिंपळढोह प्रकल्प यांची उंची वाढविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला.ही उंची वाढविल्यामुळे आता पाण्याचा साठाही अधिक प्रमाणात उपलब्ध होईल.या दोन प्रकल्पांसह इतर जलसंधारणाच्या प्रकल्पाबाबत मंत्रालय पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला आहे.याबाबत आवश्यक ते शासन निर्णयही निर्गमीत झाले असून येत्या काही दिवसात या कामाचेही भूमीपूजन करून त्यात नवा बदल तुम्हाला दिसेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

या भूमीपूजन समारंभा पाठोपाठ पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी धावरी,थेरबन,किनी,पाळज ते राज्य सिमा रस्त्याच्या रुंदीकरणासह सीसी रस्त्यासह सुधारणा करणे, सावरगावमाळ ते देवठाणा रस्त्यावरी लहान पुलांचे बांधकाम,सोमठाना-पाळज-दिवशी रस्त्याची सुधारणा,नांदा (मप) ते रावणगाव रस्त्यावरील लहान पुलाचे व रस्त्याचे बांधकाम,पाळज येथे पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम, रावणगाव येथे सभागृहाचे बांधकाम आणि तेथीलच ग्रामपंचायतीच्या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !