Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

उदगीर येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष कै.प्रा.विजयकुमार पाटील शिरोळकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा प्रा.सौ सरोज संजय पाटील शेळगावकर.(नांदेड) यांचा हा लेख खास आमच्या वाचकांसाठी देत आहोत.- संपादक

अंबुज प्रहार विशेष-प्रासंगिक

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा ।। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः।।

माझ्यासाठी वंदनीय असलेले…मातृत्व,पितृत्व,दातृत्व आणि नेतृत्वाची भूमिका वठविणारे ‘गुरुवर्य’ म्हणजे आम्हा सर्वांचे लाडके,प्रेमळ,शांत, संयमी,निगर्वी,प्रांजळ स्वभावाचे, “शिक्षणमहर्षी आदरणीय मामा अर्थात सर्वांचे नाना!!!”
आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त शतशः प्रणाम!!

आज होळीचा दिवस! मागच्या वर्षी  २०२१ च्या होळीच्या आठ दिवस आगोदर मामा Covid पॉझिटिव्ह आले होते.मला आजही आठवत त्यांच्याशी बोललेलं….
मी मामांना फोन लावला आणि नेहमीप्रमाणे मामांनी लगेच उचलला….. मग मी विचारलं मामा कसे आहात तुम्ही? काही त्रास वाटतो का? लगेच मामा म्हणाले “काहीच त्रास नाही फक्त विराज पॉझिटिव आल्यामुळे घरी सगळ्यांची टेस्ट केली आणि मी पॉझिटिव आलो.मला काहीच त्रास नाही.घाबरण्याचे काही कारण नाही.आम्ही आता पुण्याला निघालो, विशाल सोबत आहे, काही काळजी करू नका.”
मामाच बोलणे ऐकून खूप बरं वाटलं.विशालकडून समजले की मामांना पुण्यातील नामांकित,सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या डी. वाय.पाटील हॉस्पिटल मध्ये रविवारी ॲडमिट केलं होतं.माझ आणि मामांच दररोज बोलणं होत असे मामा छान बोलायचे तब्येतही खूप छान होती.संजय पाटील आणि बाबांच बोलणं करून दिल,दोघांनी पण मामांना खूप धीर दिला आणि आम्ही त्या आजारातून गेलोत नाना काहीच काळजी करू नका म्हणून मामांना हिम्मत दिली.मामांना पण छान वाटलं होतं.
पण…
गुरुवारी रात्री मी फोन केला तेव्हा मामा थोडेसे चिडक्या आवाजातच बोलले म्हणाले,मला खूप विकनेस आलाय,काही खावंसं वाटत नाही, मला आज कसंतरी वेगळेच होत आहे.(शेवटचं बोलणं).
मामांचा आवाज आणि बोलणे ऐकून माझी बेचैनी वाढली. शुक्रवारी थोडा त्रास होता,आता विराजही मामाकडे आला होता, सोनी आणि मामी टेन्शन घेतात म्हणून त्यांना विशाल नि जास्त झालेल् सांगितलं नव्हतं…शनिवारी पुन्हा मामा चांगले झाले. रविवारी(होळीच्या दिवशी) पण तब्बेत सुधारली होती म्हणे पण अचानक  सायंकाळी मामांना कार्डियाक अटॅक आला…आणि मामा आम्हा सगळ्यांना पोरकं करून निघून गेले.

निशब्द:!!
Corona च्या महामारीमुळे आम्हाला शेवटचं दर्शन सुध्दा घेता आल नाही…मामांनी शेवट पर्यंत कुणाला त्रास दिला नाही, (अंत्यविधीला येण्याचा आणि जाण्याचाही.) आयुष्यभर स्वतः सगळ्यांच करत राहिले पण दुसऱ्याकडून काहीच करून घेतले नाहीत,हे “कटुसत्य” आहे.
साधी राहणी उच्च विचारसरणी…. मूर्ती लहान कीर्ती महान…. असलेले आमचे मामा म्हणजे दि.२० एप्रिल १९५१ मध्ये कै.श्रीमती काशीबाई बाबाराव पाटील यांच्या पोटी जन्मलेले पाचवे अपत्य होते. ज्यांचं नाव विजयकुमार बाबाराव पाटील शिरोळकर (नाना).त्यांचे शिक्षण उदगीर,औरंगाबाद,नागपूर या ठिकाणी झाले.मामा उदगीरच्या हावगीस्वामी कॉलेजमध्ये लोक प्रशासन या विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक होते.

त्यांना शिक्षणाची आवड होती.नात्यामध्ये ज्यांना शिकायचं आहे त्यांना आपल्या घरी ठेवून घ्यायचे,शिक्षणा साठी सहकार्य करायचे.माझं अकरावी आणि बारावी तिथेच झालं. मला पहाटे ५:०० वाजता ट्युशन साठी उठवून स्वतः फिरायला जायचे. त्यांना साथ होती मामींची.कारण येणारे जाणारे सगळे मामाकडे जायचे आणि त्यांचा पाहुणचार मामींना करावा लागत असे.२००९ साली मामा रिटायर झाले होते.

त्यांनी किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर चे संचालक,सचिव व अध्यक्ष पद भूषविले होते.
आमचे मामा मितभाषी,प्रेमळ,स्मितहास्य करणारे,नियमित व्यायाम करणारे,प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होणारे,चांगले श्रोता आणि एक गोड व्यक्तिमत्त्व होते.त्यांच्या सर्व बहिणी,भाऊ,भावजया,भाची, भाचे,पुतणी,पुतने,मेहुणे या सर्वांसाठी मामा म्हणजे “आधारवड” होते. आमच्या आई आणि मावशी साठी तर जास्तच!!
आम्हा सर्वांना मामांची आदरयुक्त भीती होती. आम्ही त्यांच्या शितल छायेत होतो.कुणाचाही चांगला अथवा वाईट प्रसंग असो मामा प्रत्येकाचा प्रश्न सोडवणार याची खात्री होती.

मामांनी प्रत्येकाला प्रेम दिलं. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची काळजी घेतली.आम्हाला जीवन जगण्याची कला शिकवली.
मी येत आहे म्हटलं की मामा वाट बघत खुर्चीत पायावर पाय टाकून बसलेले असायचे.प्रत्येकाने त्यांना भेटावं,बोलावं असं त्यांना वाटायच. मी त्यांना भेटल्याशिवाय कधीच पुढे गेले नाही. मामा नांदेडला आले आणि न भेटता गेले असं कधीच झालं नाही, गडबड असेल तर कमीत कमी फोन तरी करायचे.जेवणामध्ये त्यांना भाकरी,लोणी,ठेसा, दही,ताक,भाजी जास्त आवडायचं….जे असेल ते वाढ म्हणायचे…..

प्रत्येकाचं तोंडभरून कौतुक करण्याचा मामांचा स्वभाव!!
माझी भाची सभापती होती,भारत सरकार कडून परदेशात जाऊन आली,म्हणून तोंड भरून सांगायचे. त्यांना खूप अभिमान वाटायचा. आमच्या हर्षु चा मेडिकल ला नंबर लागला आणि मामांना खूप आनंद झाला म्हणाले आमच्या म्हातारपणा साठी डॉक्टर तयार झाला.ऋतु कसा आहे असं आवर्जून विचारायचे.

नात्यांमध्ये कुणाच्याही मुलाचे-मुलीचे शिक्षण असो,लग्न असो, प्रत्येक जण मामाला विचारून निर्णय घेत असे.मामा प्रत्येकाच्या बारसे,लग्न, साखरपुडा,वाटन्या,भांडणे सोडवायचे असतील,दवाखाने,अंत्यविधी अशा सर्व ठिकाणी हजर असायचे कुठलाही कार्यक्रम मामा शिवाय “अपूर्ण” वाटत असे.
हॉस्पिटल चे काम असेल तर आम्ही मामाकडेच जात असू.

मामांनी,मामींचे पण सगळे हट्ट पुरवले खूप लाड केला आस त्या स्वतः सांगतात.मामांनी विशाल,विराज,सोनीवर खुप चांगले संस्कार केले. त्यांची विराज च्या लग्नाचीआणि सोनीच्या बाळाला बघण्याची इच्छा राहून गेली.मोठ्या सुनबाई दुर्गा आणि दोन्ही नातींना खुप लाड करायचे.

मामा अनेक संकटांना सामोरे गेले आणि यशस्वी ही झाले…या आजारातून ही बरे होतील असं वाटलं होतं पण नियतीला दुसरेच मान्य होते….
मामांच्या जाण्यामुळे जणू आमचा आधारवडच कोसळला.मामा, तुमच्या जाण्याचे दुःख शब्दात व्यक्त करता येत नाही,पण तुम्ही दिलेली शिकवण माझ्या आयुष्यात नक्की कामाला येईल.

“मना मानसी दुःख आणू नको रे।। मना सर्वथा शोक चिंता नको रे।।” या स्वामी रामदासांच्या श्लोका प्रमाणे मामांच्या कुटुंबियांना शोक,चिंता न करण्याची शक्ती आई तुळजाभवानी देवो.

शेवटी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करते की,आमच्या मामांना, जिथे कुठे असतील तिथे त्यांच्या योग्यतेच आणि दर्जेदार असं स्थान द्यावे.

बाप छत्री असतो,जो आपल्याला जगाचा उन्हाळा जाणवू देत नाही. बाप रेनकोट असतो,जो स्वतः भिजून आपल्याला कोरडे ठेवतो.बाप शॉल असतो,कितीतरी हिवाळे तो आपल्याला उब देतो….
अशा पितृतुल्य मामांना भावपूर्ण श्रद्धांजली!!!!

प्रा.सौ सरोज संजय पाटील शेळगावकर.(नांदेड).
9422147243.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !