‘आनंदाचा शिधा’ पुरवठा अभावी भोकर तालुक्यातील गरिबांच्या आनंदावर विरझन?
‘दिवाळी आनंदाची’…शासनाची घोषणा,परंतू शिधाजिन्नस संच उपलब्धतेच्या अनियमिततेमुळे प्रशासन व रास्त भाव धान्य दुकानदार झाले हतबल
तर…’सर्वर डाऊन’मुळे नियमित मासिक धान्य ही पडले नाही गरिबांच्या पदरात
‘आनंदाचा शिधा’ लाभार्थीना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत-तहसिलदार राजेश लांडगे
उत्तम बाबळे,संपादक
भोकर : आस्मानी व सुलतानी संकटात सापडलेल्या गरिब व सर्वसामान्य जनतेची दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून राज्य शासनाने १०० रुपयात १ किलो साखर,१ किलो रवा,१ किलो चणाडाळ व १ लिटर पामतेल अशा ४ सिधाजिन्नसांचा १ संच देण्याची घोषणा केली.हे ४ सिधाजिन्नस वेगवेगळ्या ठिकाणांवरुन शासकीय गोदामात व तेथून रास्त भाव धान्य दुकानांवर पोहचविल्यानंतर शिधापत्रिका धारकांना त्यांचे एकत्रितपणे एका पिशवितून वितरण करण्याचे ठरले.वास्तविक पाहता ‘आनंदाचा शिधा’ दिवाळीपुर्वीच लाभार्थींना मिळायला पाहिजे होता.परंतू लक्ष्मीपुजन दिनाच्या पुर्वसंध्येपर्यंतही भोकर तालुक्याच्या शासकीय गोदामापर्यंत ‘ते’ ४ शिधाजिन्नस पुर्णतः पोहचू शकले नसल्याने सदरील ‘आनंदाचा शिधा’ पुरवठा अभावी गरिबांच्या आनंदावर विरझन पडले आहे ? तर दि.२३ ऑक्टोबर पासून त्या ४ शिधा जिन्नसांपैकी जे उपलब्ध झाले असतील ते प्रति जिन्नस २५ रुपये प्रमाणे वाटप करण्यात यावेत असे आदेश पारित झाले आहेत.परंतू यामुळे शासनाच्या घोषणेचा ‘फुसका बार’ तर होणार नाही ना ? असा प्रश्न अनेकांतून उपस्थित होत आहे.

राज्यातील गरिब व सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी म्हणून राज्य शासनाने दिवाळी सणानिमित्त रास्त भाव धान्य वितरण दुकानाद्वारे केवळ १०० रुपयात १ किलो साखर,१ किलो रवा,१ किलो चणाडाळ व १ लिटर पामतेल अशा एकूण ४ शिधाजिन्नसांचा संच भेट म्हणून देण्याची घोषणा केली. राज्यातील अंत्योदय अन्न योजनेतील २५ लक्ष, प्राधान्य कुटुंबातील १.३७ कोटी,औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या १४ जिल्ह्यांतील ९ लक्ष एपीएल (केशरी) पत्रिकाधारकांना प्रति शिधापत्रिका १ शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार आहे.एकूण १ कोटी ७१ लक्ष एवढ्या शिधापत्रिका धारकांना सदर शिधाजिन्नस संच वितरित करण्यात येणार असून भोकर तालुक्यातील ३ हजार २४९ अंतोदय,१८ हजार ०१८ प्राधान्य,६ हजार ६९४ शेतकरी अशा एकूण २७ हजार ९६१ शिधापत्रिका धारकांना याचा लाभ मिळणार आहे.

‘दिवाळी आनंदाची’…शासनाची घोषणा,परंतू शिधाजिन्नस संच उपलब्धतेच्या अनियमिततेमुळे प्रशासन व रास्त भाव धान्य दुकानदार झाले हतबल
साखर,रवा,चणाडाळ व पामतेलाची शासनाने वेगवेगळ्या ४ विक्रेत्यांकडून खरेदी केली.परंतू ते एकत्रित पोहचविणारी यंत्रणा थोडी कमकुवत व असमर्थ ठरली.त्यामुळे तालुका पातळीपर्यंत हे ४ शिधाजिन्नस दिवाळी सुरु झाली अतांनाही वेळेवर पोहचू शकले नाहीत. म्हणून शासनाने त्या ४ शिधाजिन्नसांचा एकत्रित संच वितरित करण्याऐवजी जे जे पोहचले असतील ते ते प्रतिजिन्नस २५ रुपये दराने तात्काळ वितरित करण्यात यावेत असे आदेश दि.२३ ऑक्टोबर २०२२ रोजी पारित केले आहेत.शासनाच्या आदेशाची अमलबजावणी करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.त्यामुळे प्रशासनाने रास्त भाव धान्य वितरक दुकानदारांना जे शिधाजिन्नस उपलब्ध असतील ते सदर शिधाजिन्नस पात्र शिधापत्रिका धारकांना ई-पॉस प्रणालीद्वारे ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन नोंद घेऊन वितरित करावेत असे आदेश दिले आहेत.या आदेशाची अमलबजावणी रास्त भाव धान्य वितरक दुकानदारांनी करायची आहे.परंतू हे करतांना ४ शिधाजिन्नसांचा एकत्रित संच लाभार्थींना देता येऊ न शकल्याने रास्त भाव धान्य वितरक दुकानदारांना अनेक प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत आहेत.तर शासनाच्या ‘त्या’ घोषणेविषयी संभ्रम निर्माण झाल्याने जनतेतून अनेक प्रश्न उपस्थित होत असून त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रशासकीय अधिका-यांना देखील सामोरे जावे लागत आहे.दिवाळी आनंदाची’… अशी शासनाची घोषणा झाली,परंतू शिधाजिन्नस संच उपलब्धतेच्या या अनियमिततेमुळे प्रशासन व रास्त भाव धान्य वितरक दुकानदारांची हतबलता आणि तारांबळ उडाल्याचे निदर्शनास येत आहे.
तर… ‘सर्वर डाऊन’मुळे नियमित मासिक धान्य ही पडले नाही गरिबांच्या पदरात
शेतकरी शिधापत्रिका धारकांना गहू देणे बंद झाले असून केवळ प्रतिव्यक्ती २ किलो तांदुळ देणे सुरु आहे.त्यातच शासकीय धान्य वाहतूकदार कंत्राटदारांने भोकर तालुक्याचे धान्य वेळेवर आणून न दिल्याने जुलै व ऑगस्ट २०२२ या दोन महिन्यांचे नियमित मासिक धान्य तालुक्यातील पात्र शिधापत्रिका धारकांना वितरित होऊ शकले नाही.’आनंदाचा शिधा’ ऑफलाईन वितरित करण्याचे आदेश असल्याने ते मिळणार आहे.परंतू नियमित मासिक धान्य ऑनलाईन ई-पॉस नोंदीनेच वितरित करण्याचे आदेश असल्याने ऑक्टोबर २०२२ चे नियमित मासिक धान्य उपलब्ध झालेले असतांनाही ऐन दिवाळीत भोकर तालुक्यातील ‘सर्वर डाऊन’ झाल्याने हे धान्य रास्त भाव धान्य दुकानदारांना वितरित करता आले नसून ते धान्य दुकानातच अडकून पडले आहे.त्यामुळे या दिवाळी सणात शिधापत्रिका धारक गरिबांच्या पदरात ते रास्त भाव धान्य पडलेच नाही.तर शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असल्यामुळे ते धान्य ऑफलाईन नोंदीने वितरित करता येत नसल्याने रास्त भाव धान्य दुकानदारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.ना ‘आनंदाचा शिधा’ पुर्णसंच मिळाला ना नियमित मासिक धान्य.यामुळे भोकर तालुक्यातील गरिबांची दिवाळी ‘गोड’ होण्याऐवजी ‘कडू’च झाली म्हणण्याची वेळ आली आहे.

‘आनंदाचा शिधा’ लाभार्थीना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत-तहसिलदार राजेश लांडगे
तालुक्यातील काही रास्त भाव धान्य दुकानदारांना ‘आनंदाचा शिधा’ संचातील ४ पैकी कुठे २ तर कुठे ३ शिधाजिन्नस प्राप्त झाले आहेत.तर दि.२३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत पामतेल उपलब्ध झालेच नसल्याची माहिती समोर आल्याने तहसिलदार राजेश लांडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की,शासन व वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे उपलब्ध असलेले शिधाजिन्नस तात्काळ वाटप करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत आणि आमच्या पुरवठा विभागाच्या नायब तहसिलदार रेखा चामनर यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणा परिश्रम घेत आहे.तसेच पामतेल ही उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत व ते लवकरच उपलब्ध करुन देऊ,असे ही त्यांनी म्हटले आहे.
