Mon. Dec 23rd, 2024
Spread the love

क्रांतीयोद्धा फकिरा राणोजी साठे यांच्या जयंती निमित्ताने…

इंग्रजी राजवटी दरम्यान भारतीयांची होणारी होरपळ, त्याविरुद्धचा लढा,उपेक्षित समाजाची होणारी हालअपेष्टा,इंग्रजी राजवटीचा जुलूम व या सर्वांच्या विरोधात बंड करणारा मातंग वाड्यातील एक तरुण योद्धा,ज्याला ब्रिटिश फौजा कधीही पकडू शकल्या नाहीत.तर गावच्या माळावर बंदी बनवून ठेवलेले सर्व गावकरी मरतील,अशी ब्रिटिशांची धमकी मिळाल्याने गावकर्‍यांच्या जीवाचा धोका ओळखून आत्मसमर्पण करणारा व हसत फासावर जाणारा उमदा दिलदार लढवय्या म्हणजेच अण्णा भाऊ साठे यांचा समतेचा नायक ‘फकिरा’ होय…
सामाजिक एकीकरण,संस्कार,राष्ट्रधर्म, राष्ट्र,राजकीय व्यवस्था,प्रेम अशा उच्च मूल्यांची पेरणी करणारा, याचबरोबर दीनदलितांचे हीन जीवन,सहिष्णुता, लढवय्येपणा,त्याग,राष्ट्रीय कर्तव्य या मूल्यांचीही शिकवण देणारा समतेचा नायक म्हणजे ‘फकिरा’… तसेच सामाजिक व राष्ट्रीय उदात्त आणि उन्नत भावनेने ओतप्रोत भरलेला दस्तऐवज म्हणजे १ मार्च १९५९  रोजी आपल्या वास्तववादी कैफियतेतून सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी मांडलेली कादंबरी ‘फकिरा ‘ होय! अण्णा भाऊ साठे यांचा हा ‘ दस्तऐवज ‘ १९६१  सालचा महाराष्ट्र शासनाच्या ‘उत्कृष्ट कादंबरी’ पुरस्काराचा मानकरी ठरला.पुढे हा ‘दस्तऐवज’ केवळ देश पातळीवरचाच नाही तर आंतरराष्ट्रीय ठरला.साता समुद्रापार ‘फकिराची’ घोडदौड झाली व अनेक देशांच्या साहित्य जगतात विविध भाषेत अनुवादीत झाला.नव्हे तर ‘फकिरा’ ही कादंबरी मराठी साहित्यातील ‘दीपस्तंभ’ समजली जाते.म्हणूनच जेष्ठ साहित्यीक कविवर्य नारायण सुर्वे यांनी महान साहित्यिक सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या अद्वितीय राष्ट्रीय साहित्य योगदानामुळे त्यांना ‘प्रकाशाचा दीपस्तंभ’ असे संबोधले आहे.

सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे काल्पनिक नव्हे तर वास्तववादी.आपली वैचारिक साहित्यिक भूमिका अधिक स्पष्टपणे मांडताना अण्णा भाऊ साठे लिहितात,“माझा माझ्या देशावर,जनतेवर नि तिच्या संघर्षावर अटळ विश्वास आहे.
हा देश सुखी आणि समृद्ध व्हावा,इथे समानता नांदावी,या महाराष्ट्र भूमीचे नंदनवन व्हावे,अशी मला रोज स्वप्ने पडत असतात.ती मंगल स्वप्ने पाहत मी लिहीत असतो.” त्यांच्या साहित्याचे वैचारिक अधिष्ठान हे भारतीयत्व व राष्ट्रीयत्वाच्या जाणिवांना वृद्धिंगत करून अखंड भारताच्या वैभवशाली परंपरेचा चिरंतन वाहणारा झरा आहे.गावकरी,गाव,राज्य, देश व देशवासी सुखी आणि समृद्ध रहावेत.इथे समानता, समता नांदावी यासाठी त्याग व बलिदान करणारे वास्तव लढवय्ये व्यक्तीमत्व म्हणजे समतेचा नायक ‘ फकिरा राणोजी साठे ‘ होय.
आणि ‘फकिरा’ उभारतांना अण्णा भाऊ साठे आपली ” कैफियत ” व्यक्त करतांना म्हणतात….
“जशी प्रतिभेला वास्तवाची गरज भासते,तद्वतच कल्पनेलाही जीवनाचे पंख असणे आवश्यक असते.आणि अनुभूतीला सहानभूतीची जोड नसेल,तर आपण का लिहतो याचा पत्ताच लागणे शक्य नाही.
म्हणून मी लिहितांना सदैव सहानुभूतीने लिहिण्याचा प्रयत्न तरतो.कारण ज्यांच्या विषयी मी लिहितो,ती माझी माणसं असतात.त्यांची मुर्वत ठेवूनच मला लिहिणं भाग पडतं.हा ‘ फकिरा ‘ ही माझा होता.जे साकार नाही,त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठायी नाही.जे पाहिलं,अनुभवलं, ऐकलं,तेच मी लिहिलं आहे.त्यातून हा ‘फकिरा’ निर्माण झाला आहे.डोंगरात नि त्याच्या पायथ्याला विखूरलेलं फकिराचं कर्तुत्व एकत्र करुन हा इमला उभारला.एवढच…”

तो असा…
दुसर्‍या गावची जोगणी हिंमतीच्या व तलवारीच्या जोरावर आपल्या गावात पळवून आणल्यास या गावची जमीन सुपीक होईल,पाऊस पडेल,अन्नधान्य पिकेल व वाटेगावात सुबत्ता नांदेल व गावातील शंकरराव पाटील जे आपल्या गावात असा बहाद्दूर कोणी जन्माला आला नाही,असे म्हणून अत्यंत उदास आहेत. त्यांची उदासीनताही घालवता येईल,या उद्देशाने प्रेरित झालेला राणोजी जीवाची बाजी लावून जोगणी पळवून आणण्याचे अलौकिक कार्य करण्यास सज्ज होतो.‘मी मेलो तरी चालेल पण गाव जिता राहिला पाहिजे,’ या उदात्त भावनेने आपल्या पत्नी, मुलांना व आई-वडिलांना मनातल्या मनात पाहून शेवटचा नमस्कार करून गावावरून जीव ओवाळून टाकण्यास सज्ज झालेला राणोजी अत्युच्च शौर्य गाजवून तीनशे माणसांच्या घोळक्यातून शीगावची जोगणी पळवून वाटेगावच्या हद्दीत आणतो.परंतु शीगावचा बापू खोत रिवाज मोडून राणोजीचे शिर कापून नेतो.वाटेगाव व शिगावमधील संघर्षाचा मुद्दा हाच बनतो.

फकिराला धान्य लुटल्यामुळे अटक होते,परंतु अत्यंत निर्णायक क्षणी विष्णुपंत कुलकर्णी फकिराला अटकेतून सोडवतात. दारुगोळ्याचा निपुण वापर करणारा योद्धा म्हणजे फकिरा होय. अखेर फकिरा हा शीगावच्या जोगिणी पळवून आणतो.तो बापू खोताचे मुंडके उडवतो व आपल्या बापाच्या खुनाचा बदला घेतो. आणि फकिरा हा बंडाचा नायक होतो.त्याच्या कृतीने फकिरा वाटेगावचा व संपूर्ण मांग समाजाचा नायक बनतो.महार मांगाच्या असहाय्यतेला अण्णा भाऊ साठेंचा योद्धा ‘फकिरा’ वाचा फोडतो.फकिरा हा उपेक्षित दीनदलितांच्या स्वातंत्र्यलढ्याचा वाङ्मयीन वेदच मानावा लागेल.समाजाच्या अंतर्मनातील अस्मितेचे पेटते निखारे,विजेप्रमाणे कडाडणारी त्यांची हत्यारे,थरकाप उडवणारी जिद्द व शौर्य अण्णा भाऊ साठे अत्यंत रसरशीत पद्धतीने शब्दबद्ध करतात.अण्णा भाऊ साठेंची ‘फकिरा’ कादंबरी ही ‘ सामाजिक समतेचा ‘ मोठा ठेवाच आहे. कारण जातीपाती विसरून गाव म्हणून एकत्र लढण्याचा संदेष स्पृश्य आणि अस्पृश्य यांनी आचरणात आणल्याचे दिसून येते. मांग- महार समाजाच्या दु:खात गावातील सर्व सवर्ण भाग घेतात.याचे स्पष्ट चित्रीकरण या कादंबरीत आढळते.सामाजिक प्रबोधन,भारतीय खेड्यांमधील चिवट परंपरा,जातीयतेच्या पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या उतरंडी, यातून मानसिकद़ृष्ट्या विभागलेला समाज तरीही सामाजिक सलोखा राखण्यासाठी जीवाची बाजी लावणारे राणोजी मांग,फकिरा,विष्णुपंत कुलकर्णी आणि असंख्य आदर्शवत पात्र व त्याचबरोबर ब्रिटिश सरकारचे हस्तक बापू खोत, रावसाहेब पाटील यासारखे पात्रही ‘फकिरा’त आपल्याला पाहायला मिळतात.तर यात महत्वाचे असे की, ‘फकिरा’ च्या रक्तात ओतप्रोत भरलेला गुण म्हणजे माणुसकी ! रघुनाथ ब्राह्मणाच्या वाड्यावर खजिना लुटायला गेलेला ‘फकिरा’ त्याच्या परम माणुसकीचे दर्शन देतो व स्त्रियांची अब्रू व चारित्र्य स्वत:च्या जीवापेक्षा महत्तम मानतो,याची साक्ष देतो.फकिरा हा दरोडेखोर नाही तर माणुसकीची चाड असणारा स्वाभिमानी,निर्भय,निर्मळ मनाचा व अन्याया विरोधात बंड करण्याची धमक असणारा,शील जपणारा सर्वमान्य समतेचा नायक आहे.इंग्रजी सत्ता उलथून पाडण्याची ‘फकिरा’ ची आकांक्षा देशातील पारंपरिक श्रद्धा व भक्तिभाव अत्यंत स्पष्टपणाने अण्णा भाऊ साठे यांनी या कादंबरीत मांडली आहे. यातील जोगिणीचा खेळ हा अंधश्रद्धांवर आधारलेला नाही तर लोकसंस्कृतीशी नाळ जोडणारा आहे.तसेच ‘फकिरा’ या साहित्य जगतातील दुर्मीळ कलाकृतीमधून सांस्कृतिक,राष्ट्रीय रूपक,इंग्रजी पिळवणुकीच्या विरोधातील नायक,सामाजिक बलिदान, हौतात्म्य,भारतीय संस्कृतीमधील मैदानी खेळ,कसरती, प्राचीन युद्धकलेचं एक प्रतीक आहे.आणि प्रतीकाचा अर्थातच अण्णा भाऊ साठे हा ‘दीपस्तंभ’ उभारतांना आपल्या कैफियतेत पुढे म्हणतात…
“जेंव्हा ‘फकिराची’ भयंकर घोडदौड सुरु होती,तेंव्हा मी पाळण्यात आराम करीत होतो.त्या रात्री भर मध्यान्हीला तो भरधाव धावत आला.तेंव्हा त्यानं भेडसगावला इंग्रजी खजीना लुटला होता.दारात येऊन त्यानं अप्पाला हाक मारली.अप्पा घरी नव्हता,म्हणून आत्या(आक्का) दारी आली आणि तिनंच त्याला माझ्या जन्माची वार्ता सांगीतली. ती ऐकताच त्यानं ओटीतून दोन ओंजळी चांदीचे सुरती रुपये आक्काच्या ओटीत ओतले आणि ‘ बाळ बाळंतिणीची काळजी घ्या ‘ असं म्हणून घोड्याला टाच मारुन तो निघून गेला… 
किती तरी दीर्घकालानंतर आईनं सांगीतलं,की मी पहिली घुटी इंग्रजी खजीन्यातील लुटीच्या पैशाचीच खाल्ली होती. त्याच्या पैशाची मी घुटी गीळली होती.सुरती रुपयांच्या दोन ओंजळी माझ्यावर उधळून तो गेला होता.त्याला मी कसा विसरणार ? त्यानं माझ्यावर उपकार केला होता.सरकारी खजिना लुटून केलेले उपकार कसे फेडावेत,याचा मी विचार करीत होतो. अखेर ज्ञानेशाची,तुक्याची,तीन कोटी मराठी जनतेची जी मराठी भाषा,तिचं भांडार लुटून,’ फकिरा ‘ वर उधळून त्या दोन ओंजळीची फेड करण्याचा प्रयत्न मी केला आहे.हेतू एवढाच की,जो उपेक्षीत होता,अंधारात होता.तो प्रकाशात यावा,त्यानं महाराष्ट्र शारदेच्या मंदिरापुढं चिरंतन उभं रहावं.
एकूणच अण्णा भाऊ साठे यांनी १ मार्च १९५९ रोजी ‘ फकिरा’ ची लिहलेली कैफियत सांगून जाते की,वीर योद्धा समतेचा नायक फकिरा हे पात्र काल्पनिक नाही तर वास्तव व त्यांच्या परिवारातलेच आहे.पराक्रम,त्याग,बलिदानाची ऐतिहासिक वास्तव गाथा आहे.भेडसगावचा इंग्रज सरकारचा खजिना भुकेल्या समाजाच्या पोटासाठी लुटला त्याच दिवशी लुटलेल्या खजिन्यातील सुरती सुपयाची घुटी तुकाराम भाऊराव साठे उर्फ अण्णा भाऊ साठे यांनी खाल्ली होती.इंग्रजांचा खजिना लुटल्याची तारीख इतिहास सांगतो.म्हणून तो दिवस १ ऑगस्ट १९२० होता हे जगाला समजलं.परंतू वीर फकिरा यांची जन्म तारीख खुठल्याही इतिहासाच्या पानावर कोणी लिहून ठेवण्याचा प्रयत्न केला नाही.म्हणून सत्यशोधनातून सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी त्यांना तत्कालीन मिळालेल्या माहितीनुसार वीर फकिराची जन्म तारीख १ मार्च १८८५ आहे असा निष्कर्ष लाऊन १ मार्च १९५९ रोजी ‘ फकिरा’ची कैफियत लिहली. यास अण्णा भाऊ साठे यांच्या कनिष्ठ भगिणी स्व. जाईबाई भगत यांनी व अण्णा भाऊ साठे यांच्या समवयस्क सहकारी स्व.चंदाबाई फुलारी यांनी दुजोरा दिलेला आहे.नव्हे तर हिच तारीख गृहित धरुन अण्णा भाऊ साठे यांनी ‘ कैफियत ‘ लिहली आहे.तसेच साहित्यीक वि.स.खांडेकर यांनी ५ मार्च १९५९ रोजी लिहलेल्या ‘ फकिरा’ च्या प्रस्तावनेवरुन ही दिसते.तर,वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून समता,बंधूता,न्याय,हक्क,संरक्षण आम्हास दिले आहे.हे संविधानाच्या पानापानातून दिसते.त्याच प्रमाणे अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीच्या पानापानातून ‘ फकिरा ‘ हा समता,बंधूता,न्याय,हक्क,संरक्षणाचे प्रतीक दिसतो.त्यामुळेच ही साहित्याविष्कारातील अनमोल खजिना असलेली अजरामर कादंबरी ‘ फकिरा ‘ अण्णा भाऊ साठे यांनी वंदनिय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केली आहे.

१ मार्च १९५९ रोजी अण्णा भाऊ साठे यांनी ‘ कैफियतेतून ‘ मांडलेला फकिरा अर्थातच फकिरा कादंबरी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या घटनेस १ मार्च २०१८ रोजी ५९ वर्ष पुर्ण झाले.त्या महत्वपुर्ण ऐतिहासिक दिनाच्या औचित्याने १ मार्च २०१८ रोजी माझ्या संकल्पनेतून व पुढाकारातून सकल मातंग समाज बांधवांच्या वतीने भोकर जि.नांदेड येथे ‘ फकिरा अर्पण कैफियत दिन ‘ सोहळा घेण्यात आला.यावेळी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे यांची या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती होती.या सोहळ्यातून ‘क्रांतीयोद्धा फकिरा राणोजी साठे’ यांच्या अजरामर कर्तुत्वाचे स्मरण करण्यात आले व सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या ‘ कैफियत’ आधारे हा दिवसच समतेचा नायक फकिरा राणोजी साठे यांचा जयंती दिन आहे म्हणून अभिवादनाने साजरा करण्यात आला.या एतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलन, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक जेष्ठ सामाजिक नेते सतिश कावडे,उद्योजक माधव डोंपले,परमेश्वर बंडेवार,बालाजी गऊळकर,व भोकर येथील नामदेव वाघमारे,राजन्ना माहूरकर,पांडूरंग सुर्यवंशी,सखाराम वाघमारे यांसह असंख्य सामाजिक कार्यकर्ते,विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत नागरीक व बहुसंख्य समाज बांधव आहेत…

अण्णा भाऊ साफठे यांच्या ‘ फकिरा ‘ या ऐतिहासिक दस्तऐवजाला राज्य शासनाने सन १९६१ मध्ये उत्कृष्ठ कादंबरीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले.या ऐतिहासिक घटनेस २०२० ला ६१ वर्ष पुर्ण झाले आहेत.सन २०१८ पासून आम्ही ‘ फकिरा अर्पण कैफियत दिनाने ‘ क्रांतीयोद्धा समतेचा नायक फकिरा राणोजी साठे यांची जयंती साजरी करत आहोत.यावर्षी देखील साजरी करत आहोत.तर या वर्षी दि.१ मार्च २०२२ रोजी सत्यशोधक अण्णा भाऊ साठे व वीर फकिरा राणोजी साठे यांच्या पावन जन्मभूमी वाटेगाव व नेरले येथील फकिरागड ता.वाळवा जि.सांगली येथे क्रांतीयोद्धा फकिरा यांचा जयंती सोहळा होत आहे.या सोहळ्यास उपरोक्त दोन्ही परिवारातील वारसदारांचा सहभाग व उपस्थिती राहणार आहे.ही आनंदाची बाब आहे. तसेच या औचित्याने संबंध महाराष्ट्रात ही ‘फकिरा’ जयंती साजरी होत आहे.

सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांचे अजरामर साहित्य हे सामाजिक एकीकरण,संस्कार,राष्ट्रधर्म,राष्ट्र,राजकीय व्यवस्था,प्रेम अशा उच्च मूल्यांची पेरणी करताना दिसते व याचबरोबर दीनदलितांचे हीन जीवन,सहिष्णुता, लढवय्येपणा,राष्ट्रीय कर्तव्य या मूल्यांचीही शिकवण देते. नव्हे तर येथील वंचित,उपेक्षीत,शोषित,पीडितांना अंधारातून प्रकाशात नेण्याचे कर्तव्य पार पाडते.म्हणूच अण्णा भाऊ साठे हे एक सत्याचा ‘ प्रकाश ‘ आहेत.आणि या प्रकाशाचा दीपस्तंभ ‘ फकिरा आहे. प्रकीश आणि दीपस्तंभ हे एकमेकांशिवाय अपुर्ण आहेत. यामुळे प्रकाश आणि दीपस्तंभाचे हे नाते अतुट आहे.त्यामुळे या ‘प्रकाशाच्या दीपस्तभांचा ‘ जयघोष होणे ही आनंदाची बाब असणार आहे.परंतू हे होत असतांनाच प्रतिदिन या महामानवांच्या असंख्य लेकरांवर अन्याय अत्याचार होत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे क्रांतीयोद्धा फकिरा यांनी आत्मसमर्पण का केले व हे करतांना त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेचे स्मरण होणे ही गरजेचे आहे.संपूर्ण गावाला वेठीस धरून ‘फकिरा’ने समर्पण केले नाही,तर गावच्या माळावर बंदी बनवून ठेवलेले सर्व गावकरी मरतील,अशी ब्रिटिशांची धमकी मिळाल्याने गावकर्‍यांच्या जीवाला असलेला धोका ओळखून या उमदा दिलदार लढवय्या क्रांतीयोद्ध्याने समर्पण केले व हसत हसत फास गळ्यावर घेतला आहे.तर यावेळी हातातली धारदार तलवार टेबलावर ठेवून फकिरा म्हणाला…
” ही तलवार माझ्या पुर्वजाला शिवाजी राजाने दिली.ही घेऊन माझा बाप खोतासंग लढला नि मी हिला घेऊन तुमच्याशी लढलो!” त्यामुळे ती तलवार माझ्या परिवारास परत करावी.हे ऐकून इंग्रज अधिकारी जॉनसाहेब यांनी दावणीला बांधून ठेवलेली फकिराच्या माणसं मुक्त केली व फकिरा आणि त्याच्या साथीदारांना कैद करण्याचे आदेश दिले.यावेळी जॉनसाहेब आणि बाबरखान यांच्या चेहर्‍यावर विजयी मुद्रा झळकल्या.परंतु जॉनसाहेब म्हणाला “या फकिराला आपण वेळीच कैद केलं. नाहीतर या फकिराच्या रूपानं दुसरा शिवाजीराजा या महाराष्ट्रात जन्मास आला असता आणि त्याने आपली सत्ता नेस्तनाबुत केली असती..! जॉनसाहेबांच्या त्या वक्तव्यात पुढे तसे तथ्य ही दिसून आले. ते म्हणजे इंग्रजी सत्ता उलटून टाकण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे बंड उदयास आले,ती प्रेरणा क्रांतीयोद्धा फकिरा यांचीच होती.

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्पृश्य समाजातील शूर लढवय्या मावळ्याचा इतिहास म्हणावा तसा क्वचितच लिहला गेला आहे.आद्य क्रातिगुरु लहुजी साळवे यांच्या घराण्यातील पराक्रमी पहिले लहुजी साळवे, राघोजी साळवे अशा अनेकांबाबद लिहायला पाहिजे होते. या घराण्यास महाराजांनी ‘राऊत’ ही पदवी बहाल केली. त्याच प्रमाणे ‘फकिरा राणोजी साठे” यांच्या पुर्वजांचे शौर्य, पराक्रम,स्वराज्यासाठीचे योगदान पाहून स्वराज्य रक्षणासाठी त्यांना ‘ती तलवार’ दिली होती.अर्थातच ‘साठे’ घराणे ही स्वराज्याचे रक्षक आहेत.हे अण्णा भाऊ साठे यांनी ‘फकिरा’ जगासमोर मांडला नसता तर कदापिही समजले नसते व कादंबरीच्या माध्यमातून हा ऐतिहासिक दस्तऐवज जगासमोर आला नसता.एकूनच असे की,फकिरा नंतर ‘ती तलवार’ अन्याया विरुद्ध बंड करणा-या माझ्या लढवय्या माणसांना प्रेरणादायी बळ देईल,असे वीर फकिरास व फकिराच्या माध्यमातून अण्णा भाऊ साठे यांना ही सांगायचे आहे.

शतकानुशतके अन्याय,अत्याचार व अंधारात राहिलेले मातंग आणि तत्सम जातीतल्या लोकांसाठी सामर्थ्य आणि धाडसाचे प्रतीक म्हणजे ‘क्रांतीयोद्धा फकिरा साठे’ होय. हातात तलवार घेऊन भीक मागणे पसंत नाही,तर संघर्ष करुन हक्क मिळविणे पसंत आहे.म्हणून फकिरा राणोजी साठे हा स्वाभीमानी,पराक्रमी व निर्भय समतेचा नायक अण्णा भाऊ साठेंच्या सिद्धहस्त झुंजार लेखणीतून प्रकटला आहे.त्यामुळे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा’ ही कादंबरी केवळ कादंबरी नसून एक ऐतिहासिक संघर्ष संग्रामगाथा असून तिचा नायक वीर योद्धा फकिरा आहे.तर माणुसकी धर्मास महत्व देऊन माणुसकीसाठी स्व आणि परकीयसत्तेशी देशभक्तीने प्राणपणाने लढणा-या या स्वातंत्र्य सेनानी फकिराचा जाज्वल्य इतिहास सत्यशोधक अण्णा भाऊ साठे या ‘ सत्यप्रकाशाने ‘ फकिरा’ या संघर्ष संग्रामगाथेतून सुवर्णाक्षरांनी लिहला आहे.या सत्यप्रकाशाने ‘ फकिरा ‘ च्या माध्यमातून मानवी मुल्याचा आणि कठोर देशभक्तीचा हा सर्वोच्च ‘ दीपस्तंभ ‘ निर्माण केला आहे.

आज घडीला समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी या ‘ प्रकाशाचा दीपस्तभांच्या ‘ झुंजार लेखणीची व धारदार तलवारीची अत्यंत आवश्यकता आहे.तर मग चला…’ प्रकाशाचा दीपस्तंभांना ‘ स्मरुया व जयंती सोहळा साजरा करुयात.
सत्यशोधक अण्णा भाऊ साठे आणि समतेचा नायक क्रांतीयोद्धा फकिरा राणोजी साठे या ” प्रकाशाचा दीपस्तभांना ” कोटी कोटी त्रिवार वंदन !!

🌹🙏🙏🙏🌹
उत्तम बाबळे,संपादक
साहित्यरत्न जन्मभूमी सन्मान भुषण


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !