…अखेर आज ‘लाल परिचे’भोकर बस स्थानकात झाले आगमन
नांदेड बस स्थानकातून पोलीस संरक्षणात धावल्या काही बसेस
अंबुज प्रहार प्रतिनिधी
भोकर : एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण करावे व आदी मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटला असून काही कर्मचारी कामावर परतले असल्यामुळे नांदेड बसस्थानकातून आज दि.४ जानेवारी रोजी काही ‘लाल परि’ धावल्या. यापैकीच एका ‘लाल परिचे’ सायंकाळी भोकर बस स्थानकात आगमन झाल्याने प्रवाश्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
राज्यातील व भोकर एस.टी.आगारातील सेवारत कर्मचारी व आदींनी एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात यावी व यासह आदी मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.हिवाळी अधिवेशनात तरी किमान न्याय मिळेल अशी अपेक्षा होती.परंतु, अद्यापही न्याय मिळाला नाही.आझाद मैदान,मुंबई येथील आंदोलनास ही राज्य शासनाने जुमानले नाही.अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या व अनेकांनी स्वेच्छा मरणाची शासनाकडे परवानगी मागितली आहे आणि अनेक कर्मचारी बडतर्फ ही झाले आहेत.तसेच याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय येणे ही बाकी आहे.या दरम्यानच्या काळात सततचा आर्थिक व मानसिक त्रास कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. संघटना विरहित कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन असल्यामुळे यातील अनेक कर्मचाऱ्यांची सहनशीलता संपली असल्याने यातील काही कर्मचारी कामावर परतले आहेत.
काही कर्मचारी कामावर परतल्याने दि.४ जानेवारी २०२२ रोजी नांदेड आगाच्या काही ‘लाल परि'(बसेस) नांदेड बस स्थानकातून सोडण्यात आल्या.यावेळी संरक्षणार्थ पोलीस बंदोबस्ताची मदत ही घेण्यात आली.अखेर आज अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान एम.एच.४० एन.९७७४ क्रमांकाच्या ‘लाल परिचे’ आगमन झाले.सदरील लाल परिचे सारथ्य चालक सय्यद खाजा यांनी कले.तर वाहकाचे काम सोपान पवळे यांनी बजावले. नांदेड ते भोकर प्रवासादरम्यान प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला व त्यांच्याकडून १ हजार ४०० रुपये तिकीट रक्कम प्राप्त झाली.या प्रवासा दरम्यान विभागीय वाहतुक अधिकारी संजय वाळवे यांनी प्रवास केला.तर भोकर बस स्थानकात भोकर आगार प्रमुक सुभाष दुमसिंग पवार यांनी या ‘लाल परिस प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला.ही ‘लाल परि’ काही वेळाने भोकर बस स्थानकातून प्रवासी घेऊन नांदेडकडे रवाना झाली.भोकर पोलीसांनी आपल्या कार्यक्षेत्रात या ‘लाल परिस’ ये जा करतांना संरक्षण दिले असून ती सुरु होत असल्याने अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले व राज्य शासनाने सदरील कर्मचाऱ्यांना योग्य न्याय द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.