Sat. Dec 21st, 2024
Spread the love

सत्यशोधक बात्यांचा वार…अंबुज प्रहार…!

संपादकीय… सत्यशोधक बातम्यांचा वार…अंबुज प्रहार…!

हल्ली धावपळीच्या जीवनात समाज माध्यम हे माणसाच्या गरजेतील एक अविभाज्य अंग झालेले आहे.त्यामुळे आज त्याचा जनमाणसावर प्रचंड मोठा पगडा आहे.ही जबाबदारी प्रत्येक प्रसिद्धी माध्यमांनी बदलत्या काळानुरुप मोठ्या नेटाने पार पाडली आहे यात शंका नाही. बदलत्या काळानुसार समाज माध्यमांनी त्यांची काही अंशी जागा घेतली असली तरी पत्रकरीतेतील विश्वासार्हता व पावित्र्य समाज माध्यमांवरील माध्यम प्रमुख आणि पत्रकारांनी राखलं पाहिजे.याचे भान ठेऊन पत्रकारीता करणे अपेक्षित असते.माध्यमांकडून केली जाणारी कोंडी संपादकीयामधून.वृत्तवाहिन्यांवरील चर्चामधून व समाज माध्यमांवरील आरोप प्रत्यारोपीय संभाषणांतून प्रतिबिंबित होत असते. विविध प्रकरणांवर चर्चा घडवून आणणे,लोकप्रबोधन करणे हे माध्यमांचे काम आहेच,पण एखाद्या प्रकरणाचा उहापोह करतांना कोणाची निंदा-नालस्ती होणार नाही याचे भान माध्यमांनी ठेवलेच पाहिजे.समाज माध्यमे आज घावत्या जीवन शैलीतील अत्यावश्यक बाब झाली असल्याने त्यांचा वापर होतांना सामाजिक जबाबदारीचे भान असणे ही काळाची गरज आहे.पत्रकारांची व माध्यम व्यावसायिकांची बांधीलकी केवळ वाचकांशी आणि दर्शकाशी असते असे नव्हे,तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आर्थिक सहकार्य करणा-यांशी देखील असते याचे भान ही ठेवलेच पाहिजे.माध्यमे ही समाजातील क्रांतिकारक बदल घडवून आणणारे विचारपीठ आहेत.त्यामुळे ती समाजाचे प्रतिबिंब असायला हवीत.आणि ही प्रतिबिंब साकारतांना सत्यशोधन केलेच पाहिजे.सत्य शोधकीय लिखान मांडलच पाहिजे… तरच हे माध्यम जनसामान्यांना न्याय देऊ शकते.

माध्यमांनी अंगिकारलेल्या सादरीकरणाच्या पद्धतीतून ठराविक समुदाय,सामान्य,असामान्य माणसे,राजकीय नेते,पक्ष,सामाजिक संघटना तसेच राजकीय मूल्ये याविषयी अपरिवर्तनीय आवडीनिवडी वरुन बातम्या तयार केल्या जातात,केल्या जात आहेत.एखादी गोष्ट का आवडते आणि का आवडत नाही यामागे बुद्धीला पटेल अशी कोणतीही बाब असण्याची गरज नसते. शिवाय अशा आवडीनिवडी जपणे हा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा भाग असतो.सोयीचा सत्याचा अंश कवटाळून व्यापक सत्याचा खून करत आहोत याची खंत वाटू न देता असत्य उपासनेचे जागरण अशाप्रकारे साळसूदपणे चालू ठेवण्यात येतांना आपणास पहावयास ही मिळत आहे.काही माध्यमांतून बिनदिक्कतपणे खोट्यानाट्या बातम्या,स्तुतीवाहक लेख दिले जातांना ही पहावयास मिळत आहेत.तसेच काही माध्यमांतून नावडत्या व्यक्तींच्या चारित्र्य हननासाठी सभ्यतेच्या सर्व मर्यादा विनासंकोच
ओलांडल्या जातांना ही पहावयास मिळत आहेत.तसेच काही जण तर केवळ आणि केवळ एखाद्याचे नामोहरण करणारे लिखान करण्यातच धन्यता मानत आहेत.आणि अनेकांना यात काही गैर आहे असे वाटेनासे ही झाले आहे,असे दिसत आहे.न आवडणाऱ्या व्यक्ती,विचार, नेता,समुदाय,कार्यकर्ते यांची यातून कशी जिरली ? हे पाहून काहींना आनंदाच्या उकळ्या ही फुटू लागतात.आपणच एकमेव सत्याचे मक्तेदार आहोत असे त्यांच्यात भिनलेले असते व इतर खोटारड्या लोकांना त्याच्या कर्माची फळं मिळाली,असा समज झाल्याने यातून ‘दैवी न्याय’ मिळाला आहे असे ही त्यांना वाटू लागते.

त्यातच सामाज माध्यमातील ट्रोलिंग,ट्रेंड्स आणि प्रसार माध्यमातील डिबेट्स हे निव्वळ आहे.मतमतांतरांचे निदर्शक नाहीत,तसेच माध्यमातून घडवून आणलेले संघर्ष म्हणजे मतभेद व्यक्त करणे किंवा तीव्र शब्दांत टीका करणे ही नव्हे.लोकांत वैचारिक मतभेद असतात व त्यावरून वादही होतात.अगदी कडाक्याची भांडणेही होतात.परंतु, प्रगल्भ वैचारिकतेतून झालेले वादविवाद हे सत्याच्या अधिक परिपूर्ण अशा आकलनाकडे जाण्याचा प्रवास मार्ग आहे म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते.पाहिले जावेत अशी अपेक्षा ही असते.संवादासाठी म्हणून उदयाला आलेल्या समाज माध्यमांच्या वापरात ती दृष्टी कमी होतांनाही दिसत आहे.सामाज माध्यमावर असत्य उपासनेची तंत्रे ही अधिक आक्रस्ताळी,हिंसक आणि उघडीनागडी होत आहेत. विशिष्ट विषयांवर सुनियोजितपणे ट्रेंड्स सुरु करून जनमताच्या कौलाविषयी आभास निर्माण करणे,प्रसिद्ध व्यक्तींचे ट्रोलिंग करणे,त्याच्या खाजगी जीवनाविषयी अचकट विचकट कॉमेंट करणे,त्याच्याविषयी अर्वाच्य, अश्लिल लिहिणे,फोटोशॉप वापरून तयार केलेले त्यांचे विकृत फोटो टाकणे,त्याच्या नावाने नेक विचारांशी विसंगत अशी भाष्ये करणे,हे डिजिटल युगात समाज माध्यमात अगदी सामान्य बाब झाली आहे. यातून सत्य व न्याय ही भूमिका बाजूला सारली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

सध्याची पत्रकारिता खूप सवंग आणि सनसनाटी झाली आहे.अशी तक्रार होतांना पुष्कळदा पहावयास येत आहे.पूर्वीची पत्रकारिता कशी होती याविषयीचे किस्सेही अनेकांकडून सांगितले जातात.परंतू ब-याचदा ते वरवरचे आणि स्मरणरंजनात इतके ओथंबलेले असतात,की आताच्या होतकरू पत्रकारांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होण्यासारखे नसते.एखाद्या सवंग आणि सनसनाटी वाटणाऱ्या ‘कहाणी’च्या गाभ्याकडे पोहचण्यासाठी नक्की काय करावं लागतं? ह्याचा पुरेसा तपशिलवार जर कुणी आढावा घेतला,आणि आताच्या वातावरणातही गांभीर्यानं तशी बातमी किंवा लेख लिहता येवू शकते ह्याचे प्रात्यक्षिक जर दाखविले तर ते आजच्या पत्रकारांना खरंच उपयोगी पडेल. उथळपणालाच पत्रकारिता मानून काहीजण नुकसान ही करून घेत आहोत,हे माध्यमांचा ‘कन्झ्युमर’ झालेल्या आजच्या सामान्य माणसाच्याही लक्षात येईल असे वाटते.म्हणून शोध पत्रकारितेच्या माध्यमातून एखाद्या गंभीर विषयावर प्रकाश टाकतांना सत्याचा शोध व न्यायाचा वेध घेत सत्यशोधकीय बातम्यांचा वार केलेले लिखाण जनसामान्यांना उपयुक्तच ठरेल,असा विश्वास अनेक पत्रकारांना आहे.

सद्या माध्यमांवर जे पहावयास व वाचण्यात येत आहे,त्या पत्रकारितेत विरोधक विरोधक खेळूया,कळलावी,वादरायण,सारांशात बोळा फिरवणे,मी तटस्थ होणारच,आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट, दृष्टीदोषनिर्मिती प्रकल्पपूरक मोडतोड,कथित अनुपस्थिती भांडवलसंचयन,क्रयविक्रय आरोपण,शिवीगाळधिष्टीत उपमर्द मार्गे खच्चीकरण,शारीरिक हिंसाकेंद्री धमकी पद्धतींचा वापर होतांना पहावयास मिळत आहे.जसे की, जे प्रश्न विरोधात उपस्थित होत आहेत,त्यांचा धांडोळा घेऊन त्या प्रश्नांना अतिशयोक्त विपर्यस्त किंवा त्रोटकपणे प्रस्थापितांना विचारून त्या प्रश्नांतली हवा काढून टाकण्यात येत आहे.ती ‘आपण विरोधक विरोधक खेळूया पद्धत घटनेचे वेगवेगळे सदर मांडताना तिच्याकडे वास्तवातील गुंतागुंत म्हणून न बघता विसंगती किंवा परस्परविरोधी बाब म्हणून सादर करण्यात येत आहे.ती ‘कळलावी पद्धत’,दोन घटना,व्यक्ती,धोरणे,सरकारे यांची तुलना करताना दोन्हीच्या संदर्भातील वेगळेपणाचा उल्लेख आवर्जून टाळण्यात येत आहे.ती ‘वादरायण पद्धत व्यक्तीने काहीही वक्तव्य केले असले तरी समारोप करताना त्याचा अर्थ आपल्या सोयीनुसार काढण्यात येत आहे ती ‘सारांशात बोळा फिरवणे पद्धत’ तटस्थ दिसण्यातून अधिमान्यता वाढते याचे भान ठेवत,विरोधी मतांवर अधूनमधून फुटकळ पणे वादग्रस्त चर्चा आयोजित करून नंतर त्याविषयी दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे ती मी तटस्थ होणारच पद्धत’.तुमचे ते कलुषित आमचे ते संतुलित हे वारंवार उसवून सांगण्यात येत आहे ती ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्ट पद्धत फक्त आपल्या सोयीचेच आणि अर्धवट असे उद्धृत करण्यात येत आहे ती ‘दृष्टीदोषनिर्मिती प्रकल्पपूरक मोडतोड पद्धत’ तेव्हा तुम्ही कुठे होता’ किंवा ‘आता कुठे गेले तुमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ असा जाब विचारणा केली जात आहे ती ‘कथित अनुपस्थिती भांडवलसंचयन पद्धत’ तुमच्या भूमिकेसाठी तुम्हाला किती पैसे मिळाले ही विचारणा केली जात आहे ती क्रयविक्रय आरोपण पद्धत पुरुषांसाठी ‘तू… आहेस’ असे सुनावणारे आणि स्त्रियांसाठी ‘तुझा.. काय अशी विचारणा करणारी ती ‘शिवीगाळीधिष्टीत उपमर्द मार्गे खच्चीकरण पद्धत मी बाँब फोडणार,तु फटाका फोडणार.. तुझ्या आई-बहिण बायको मुलीला कुटूंबाला त्या प्रकरणात ओढून तुरुंगात पाठवितो म्हणणारी ‘शारीरिक हिसाकेंद्री धमकी पद्धत, अशा पद्धतींचा सर्रास पणे वापर होत आहे.परंतु या पद्धतींचा वापर होत असतांना मात्र यात शोध सत्याचा व बेघ न्यायाचा या पद्धतीचा अभाव दिसत आहे.तसे पाहिले तर सत्य शोधनातून हाती लागलेली पुरावे न्यायीक प्रक्रियेत दाखल केली पाहिजेत,तरच न्याय मिळेल.अशा पद्धतीची पत्रकारिता करणे ही गरजेचे आहे.आणि आम्ही ते यथाशक्ती करण्याचा प्रयत्न सदैव करतोतच.

सत्याला असत्य आणि असत्याला सत्य म्हणून सादर करण्याची पद्धती ही व्यवस्थेच्या हेतूविषयी समाजमनात साशंकता निर्माण करते.सद्या काही राजकीय नेतृत्वाची भाषा आणि माध्यमांतील व्यवहार यांच्यात ताळमेळ दिसत नाही.काही राजकीय नेतृत्वे उन्नत गोष्टी सांगत राहतात आणि काही माध्यमवीर त्यांच्याबरोबर विरोधी वक्तव्ये करतात,असभ्य भाषा वापरतात.ठामपणे आणि सातत्याने सार्वजनिकरित्या होत असलेल्या अशिष्ट भाषेच्या वापराने आणि खोटेपणाने सभ्य माणूस अवाक होत आहे.खासगीत जे बोलले जात आहे.ते कोणी सार्वजनिकरीत्या बोलत किंवा लिहत असेल,तर त्याचे काय करायचे हे सभ्य माणसाला कळेनासे झाले आहे.अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली व्यवस्था अशा असभ्य आणि खोटे बोलणाऱ्या लोकांवर काहीच कारवाई करत नाही याची जाणीव होत आहे.कसेही बोलले लिहिले तरी संबंधितावर काहीच कारवाई होत नाही असे दिसत असल्याने सामान्य पत्रकार ‘सुजाणपणा दाखवत गप्प बसायला शिकतो आहे.’यातूनच मानवी समाज आज आपल्या भयग्रस्ततेला सुज्ञपणाचे नाव देत सत्याविषयी अनास्था बाळगायला ही शिकत आहे. ही बाब चिंतनिय आहे.त्यातच जे पत्रकार उदासीनही होत नाहीत आणि गप्पही बसू इच्छित नाहीत.तर काहीजण या सर्व बाबींचा सामना करत ‘शोध सत्याचा वेध न्यायाचा’ घेतच असतात व सत्यशोक बातम्यांचा वार करुन न्याय मिळवून देत असतात.हे करतांना त्यांना ख-या अर्थाने’ लाभ होईलच असे ही नाही,परंतु यातून जे पत्रकार कोणास न्याय मिळवून देऊ शकले तर त्यांना आत्मिक समाधान मात्र प्राप्त होऊ शकते.

समाज माध्यमाचा वापर आज प्रत्येकाच्या दैनंदिनीचा अविभाज्य अंग झालेला आहे.बदलत्या काळाची ही गरज आहे.याचा विचार करुनच आम्ही देखील अंबुज प्रहार न्युज लाईव्ह व मानवहित मराठी बातमी लाईव्ह या ऑनलाईन समाज माध्यम मराठी वृत्तवाहिन्या गेल्या ७ वर्षापुर्वी सेवारत केल्या आहेत. अंबुज प्रहार न्युज लाईव्ह ही भोकर येथून सुरु झालेली पहिली वाचक समाज माध्यम वृत्तवाहिनी असून आज घडीला प्रतिदिन हजारो वाचकांच्या पसंतीस पडलेले हे समाज माध्यम आहे.या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोकोपयोगी योजना,सामाजिक,शैक्षणीक,राजकिय,सांस्कृतीक, कला,क्रीडा,व्यवसाय,रोजगार,उद्योग,नौकरी,गुन्हे जगत यासह आदींच्या ताज्या घडामोडी विषयीची सत्यशोधकी माहिती बातमी स्वरूपातून ऑनलाईन स्मार्ट फोन वापरकर्त्या वाचकापर्यंत विनामुल्य पोहोचविण्याचा सेवारुपी प्रयत्न आम्ही सातत्याने करत आहोत.अर्थ’ प्राप्तीसाठी नव्हे तर आत्मिक समाधानासाठीच शोध सत्याचा वेध न्यायाचा हे ब्रीद आम्ही अंगिकारले असून अंबुज प्रहार न्युज लाईव्ह समाज माध्यम वृत्तवाहिनीवरून सातत्याने जनसामान्यांचे हित लक्षात ठेवून सत्यशोधक बातम्यांचा वार अविरतपणे आम्ही करत आहोत.हे करतांना माध्यम व्यावसायिकांची बांधीलकी केवळ वाचकांशी व दर्शकाशी असते असे नव्हे,तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आर्थिक सहकार्य करणा -यांशी देखील असते,याचे भान आणि जान आम्ही ठेवलेली आहे.म्हणूनच अनेकजण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आम्हास नेहमीच सहकार्य करत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून बुध्दिप्रामाण्यवादी मराठी माणसाच्या स्मरणरंजन मनातील दिवाळी व दिवाळी अंकाविषयी वाचकिय कुतुहलतेची भूक या समाज माध्यमातुन भागविण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. दीपोत्सव हा भारतीय समाजात प्रचंड उत्साहात साजरा होणारा एक सण आहे.भरभराट,श्रीमंती,गरीबी,दिव्यांचा झगमगाट,ऐश्वर्याचे आणि गरीबातल्या ही गरीबाचे हे सुखाचे प्रतीक आहे.आस्मानी,सुलतानी व आरोग्यविषयक कितीही संकटे आली तरी त्यांचा सामना करुन जीवन जगतांना दीपोत्सवाच्या औचित्याने दिव्यांची रोषणाई,खाद्यपदार्थाची रेलचेल,फटाक्यांची आतिषबाजी प्रतिवर्षी केली जाते.यावर्षी देखील वैचारीक तथा समाजोपयोगी विषय घेऊन ‘अंबुज प्रहार न्युज लाईव्ह’ वरुन डिजिटल दिवाळी विशेषांक २०२२ देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या या लोकप्रिय वृत्तवाहीनीच्या नावलौकिकाला साजेल असा आणि वाचकांच्या पसंतीत पडेल अशा स्वरुपाचा हा विशेषांक यावर्षीही आम्ही आपल्या सेवेत सादर करत आहोत.यात नामंवत व नवोदित साहित्यीकांच्या कथा,कविता,लेख आदीचा समावेश आहे.आज पर्यंत कवि,लेखक,वाचक,प्रेक्षक,बातमीदार,जाहीरातदार, अशा अनेकांनी सहकार्य केलेले आहेच.करत आहेत,पुढे ही करतीलच असा आम्हास ठाम विश्वास आहे.मिळालेल्या सर्वांच्या योगदानरूपी सहकार्यामुळेच आमचा हा खडतर प्रवास सुखकर झालेला आहे.हे कदापिही आम्ही विसरणार नाही.तसेच जनसामान्यांचे प्रश्न हे आमच्या केंद्रस्थानी असल्याने शोध सत्याचा वेध न्यायाचा हे ब्रीद ही आम्ही कदापिही विसरणार नाही.तसेच अर्थ प्राप्तीसाठी सोयीची पत्रकारिता आम्ही कधीही करणार नाही,अशी ग्वाही देतो व थांबतो.या वर्षी देखील साहित्य व अर्थरुपी सक्रिय योगदान आणि सहकार्य आपल्या हर्वांकडून मिळाले आहे.पुढे देखील मिळेच यात कसलीही शंका नाही. त्याबद्दल सर्वांचे मनस्वी धन्यवाद व दिवाळीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!

सत्यशोधक बातम्यांचा वार…. अंबुज प्रहार
उत्तम वामनराव बाबळे
संपादक – अंबुज प्रहार न्युज लाईव्ह,मानवहित-मराठी बातमी लाईव्ह

लेख….नाग-कला-आणि संस्कृती….

नाग – कला आणि संस्कृती

भारतीय लोक धर्मामध्ये नाग पूजनाची परंपरा प्राचीन काळापासून लोकप्रिय असल्याचे दिसून येते. परिणाम स्वरूप भारताच्या विविध भागात नागाची अनेक स्वतंत्र मूर्ती पाहावयास मिळतात. भारतातील कुठल्याही शहरात अथवा लहानातील लहान खेड्यात गेल्यास नाग शिल्पे दृष्टीस पडणार नाहीत असे गाव मिळणे विरळच. एखादे मंदिर, झाड, तलावाच्या शेजारी किंवा घाटावर एका सपाट शिळेवर वळसे दार शरीर असलेल्या नागांचे शिल्प हमखास असतेच.त्यावर कधी हळद, कुंकू तर कधी शेंदूर लावलेले दिसते. काही ठिकाणी ‘नाग युगल’ एकमेकांना वेटोळे घातलेली शिल्पे पाहावयास मिळतात.नागांशी संबंधित असंख्य कथा या देशात अस्तित्वात आहेत. आदिवासी, अवैदिक,वैदिक समाजात वेगवेगळ्या कथांची गुंफण असून अशा कथातून भारतीय संस्कृती भक्कमपणे उभी आहे. नागाशी संबंधित असलेले अनेक शिल्पे असून सूर्य व नागाचे अनन्य संबंध सर्वश्रुत आहेतच.लोकजीवनातील नागांच्या महात्म्या मुळेच हिंदू,जैन आणि बौद्ध धर्मामध्ये ही उपदेवतेच्या रुपाने नागांना मान्यता मिळालेली दिसते.विविध धर्मातील प्रमुख देवते सोबत त्यांचा संबंध जोडलेला दिसून येतो.असे मानले जाते की नागांची उत्पत्ति श्रावण मास मधील शुक्ल पक्षातील पंचमीच्या दिवशी झालेली आहे.संपूर्ण देशात या दिवशी नागाची विधिवत पूजा होत असते. यास ‘नागपंचमी’ या नावाने ओळखले जाते. बंगालमध्ये नागदेवी ‘मनसा’ तिचे पूजनही मोठ्या उत्साहाने साजरे केली जाते.कश्मीरी ग्रंथ ‘नील मत पुराण’ यात विविध ठिकाणी जवळपास पाचशे वेळेस नागदेवतेचा उल्लेख आलेला आहे. प्राचीन काळापासून भारत निसर्गपूजक देश असल्याने सूर्य पूजेचे उल्लेख ऋग्वेदात आलेली आहेत. सादृश्यधिष्टीत कल्पनेच्या जोरावर नाग आणि सूर्याच्या अनेक कथा गुंफण्यात आलेल्या आहेत.नाग हा सूर्या प्रमाणेच गायब होतो, सूर्या प्रमाणेच विद्युल्लता नागाच्या ठायी दिसते,सूर्याची दाहकता व नागाचे विष यांची तुलना,सूर्याचे तेज व नागाचा लखलखीतपणा यातील साम्यस्थळे पाहून नाग आणि सूर्य यांचे एकत्रीकरण पौराणिक कथेतून शिल्पकलेत उतरलेले दिसते. त्यासोबतच नागाचा लिंग सदृश्य आकारही त्यास लैंगिक प्रतीक बहाल करते.

नाग पूजेची सुरुवात सर्वप्रथम इजिप्तमध्ये झाली असे मत सी. एफ. ओल्डहॅम यांनी आपल्या The sun and the Serpent a contribution to the History of Serpent Worship या ग्रंथात मांडले आहे. तर ग्राफिटन एलीएट स्मिथ यांनी, ‘Geographical Distribution of the Practice of Mummification.’ यात संशोधनपर अभ्यास करताना सूर्य पूजा आणि सर्प पूजा यांचा जन्म ईजिप्तमध्ये झाला असल्याचे सूचित केले आहे.जगात जिथे जिथे या पूजा केल्या जातात. त्या इजिपशीयन प्रभावातून केल्या जातात असेही ते मानतात. परंतु या मताला लायन कॅप यांनी मात्र विरोध दर्शविला आहे. ते Lost continent’s the Atlantis the me in History science and literature या ग्रंथात असे म्हणतात, “संस्कृतीचे एकच एक केंद्र असते व तिथून ती संस्कृती जगात प्रसरण पावते असे समजणे योग्य नाही.वास्तविक संस्कृतीचे विशेष जगात अन्यत्र पसरत असतात.म्हणून इजीप्तच्या लोकांना किंवा अन्य कोणत्याही लोकांना अशी श्रेय देणे योग्य होणार नाही.”

        ll भीती मधून नाग पूजा ll

जगभरातील सर्वच प्राथमिक धर्मामध्ये व आदिम समाजांमध्ये नागपूजा प्रचलित असल्याचे आढळते.भारतात सर्वत्र नागपूजा प्रचलित आहे. वेदपूर्व काळापासून भारतात नागपूजा प्रचारात होती. मोहोनजोदाडो येथील उत्खननामध्ये सुद्धा नाग मूर्ती आढळल्या आहेत. नाग विषारी असल्यामुळे मनुष्याला त्याची फार भीती वाटते. ऋग्वेदामध्ये नागाचा उल्लेख ‘अहि’ या शब्दाने केला असून तेथे त्याची क्रूर, घातकी व भयंकर असे वर्णन केलेली आहेत. नागाची स्तुती करून त्याला वश करून घेतले तर त्यापासून भय राहणार नाही. या कल्पनेने यजुर्वेदात नाग स्तुतीपर मंत्र आढळतात. नागपूजा नागापासून वाटणाऱ्या भयातून सुरू झाली असावी. शतपथ ब्राह्मणात नाग माता कद्रू हिला पृथ्वीचे प्रतीक समजून पूज्य मानले आहे.सर्प वेध या नावाचा अथर्ववेदाचा एक उपवेद आहे. त्यात सर्पाचे विष उतरविण्यासाठी,त्यांना वश करण्यासाठी अनेक मंत्र सांगितले आहेत. करकोटक नागाचे स्मरण करणे हे पापनाशक आहे असे मानले जाते. नागांना संतुष्ट करण्यासाठी सर्पबळी,नागबळी इत्यादी विधी गृह्यसूत्र मध्ये सांगितलेले आहेत.अशाप्रकारे नागापासून आपले संरक्षण व्हावे, या उद्देशाने प्राचीन काळापासून नागपूजा भारतात प्रचारात आली आहे.

मराठीत नागशीला म्हणून संबोधन केल्या जाणाऱ्या या शिला सारा भारत नागपूजक होता हे सिद्ध करतात.नागाला विषारी दंश असल्याने मानवजातीला त्याची प्रारंभी पासूनच भीती होती. त्याचे हे अस्त्र किती घातक आहे. याची प्रचिती सातत्याने मानवाने घेतलेली असल्याने तो या नागां पासून दूर राहात असे.भीतीतून आकर्षणाचा जन्म झाला. या सर्प योनीची भीती इतकी जबरदस्त होती की, त्यातून तो नागपूजेकडे वळला.नागाचे जमीन आणि पाण्यात ही वास्तव्य,कात टाकून द्विजत्व प्राप्त करून घेणे,त्याच्या द्विजिव्हा,हस्त – पाद – पंख विरहित शरीर, आश्चर्यकारक संभोग,अप्रतिम नागफना,त्याचा फुत्कार,त्याची भेदक नजर या सर्वांमुळे नाग मानवजातीत कुतूहल आणि आदराचा विषय बनला व त्यातूनच वेगवेगळ्या समजुती प्रचलित होऊन नागपूजा अस्तित्वात आली असावी.लोक धर्मात नागांचा उल्लेख अर्धमानव रूप आणि इच्छेनुसार कोणतेही रूप धारण करणारा अशी ही तयार झाली. लोकपरंपरेत नाग पूजनाची असलेल्या प्रबळ लोकप्रियते मुळे नाग शिव,बौद्ध आणि जैन तीर्थनकार सारख्या महत्वपूर्ण देवते सोबत संबंध जोडला गेला.ही प्रक्रिया शुंग – कुशान काळापर्यंत पूर्ण झाली होती. सृष्टीच्या संहार कार्याशी संबंधित म्हणूनच शिवाच्या गळ्यात तसेच हातातील भूषणाच्या रूपात नागाला विशिष्ट स्थान प्राप्त झाले. शिवा सोबत असलेला नाग हा काल किंवा मृत्यूचा सूचक म्हणून एक चेतावनीच्या रूपाने पाहता येते. बौद्ध परंपरेत नंद, उपनंद् आणि मुचलिंद या नागांचा उल्लेख येतो. तर जैन परंपरेत सुपार्श्वनाथ आणि पार्श्वनाथ यांचे लांछन नाग आहे.पार्श्वनाथाची यक्ष,यक्षिणी हे सुद्धा नागराज धरणेद्र आणि त्याची राणी पद्मावती यांच्या रूपाने आहेत. मथुरा,भरहुत, सांची आणि अमरावती येथे शुँग, कुषाण, सातवाहनकालीन बौद्ध स्तूपावर नागांचे प्रचुर अंकन मिळते.

नाग पूजेचा प्रारंभ नेमका कधी झाला याचा निश्चित पुरावा अद्याप सापडलेला नाही. नाग पूजा निर्मिती पाठीमागे मनोवैज्ञानिक भीती, पौराणिक साहित्यातील उल्लेख तर कुठे जनजातीय संस्कृती आणि तांत्रिक प्रतिकाच्या रूपातून तर कुठे भौगोलिक परिस्थितीच्या कारणाने भारतात नागपूजा अस्तित्वात आली असावी. लोक धर्मात ज्या स्थानीय देव- देवता असतात. त्यात नागाने आपले अस्तित्व नेहमीच टिकून ठेवले आहे.भारतीय तंत्रशास्त्रात नागाचे विशिष्ट महत्त्व असून योगातील ‘कुंडलिनी’ शक्तीचे प्रतीकही नागाला समजले जाते.नाग पूजेचे धागेदोरे शोधत असताना एक बाब निश्चितपणे जाणवते ती ही की, नागाची पूजा हा भारतीयांचा आत्मा असावा.उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत,पूर्वेकडून पश्चिमे पर्यंत,मैदान असो की उंच पर्वते,लोक परंपरेचे आद्यरूप एक सारखीच दिसून येतात.मानवी हतबलता आणि प्राण्यांमध्ये असलेलं बल यामुळे प्राण्या मधल्या असलेल्या अज्ञात शक्तीला घाबरून त्याची पूजा अर्चना सुरू झाली असावी असे वाटते. नागपूजा कदाचित अतिप्राचीन पूजेमध्ये येत नसावी.तरी नाग पूजेचे पदचिन्ह जगातल्या सर्वच संस्कृतीत आणि कानाकोप-यात पाहायला मिळतात.आणि भारतात तर मूर्ती पूजेच्या स्वरूपात नाग पूजेचे विशेष महत्त्व आहे. भारतीय साहित्यामध्ये तीन प्रकारचे स्वरूप पाहायला मिळतात.

१. देवता गंधर्व अप्सरा हे सात्विक प्रकारात येतात.

२. यक्ष,किन्नर आणि दैत्य हे राजस प्रकारांमध्ये मोडतात

३. राक्षस,नाग,प्रेत हे तामस प्रकारांमध्ये मानले जातात.

भारतीय साहित्यात नाग हा शब्दप्रयोग देवत्व प्राप्त झालेल्या सापांसाठी वापरला असावा असे वाटते.श्रीमद् भगवद् गीतेतील दहाव्या अध्यायात २८ आणि २९ व्या श्लोका मध्ये सर्प आणि नाग असे वेगवेगळे शब्द आलेले आहेत. काही जण अनेक फणा असलेल्यांना नाग,तर एक फणा असलेला सर्प असे मांनले आहे.महाभारतातील आस्तिक उपाख्याना नुसार हे समानार्थी शब्द असावेत असे वाटते.नाग आणि सर्प यात विषधर आणि विषहीन असाही भेद असावा असे काही जणांचे म्हणणे आहे.नागवंशी हा शब्दप्रयोग त्या राजवंश यांनी केला असावा जे स्वतःचा वंश नाग माता-पित्यापासून निर्मित मानतात.किंवा जे नागपूजेशी संबंधित आहेत त्यांनाही नाग लोक म्हणत असावेत. काहीही असले तरी शेवटी भारतीय राजनेतिक इतिहासात नागांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे.

          II नाग पूजा स्वरूप II

भारतात कोब्रा सापाला नाग मानले जाते. पौराणिक कथेनुसार नाग सामान्य सर्प जाती नसली तरी आज व्यवहारिक रूपाने कोब्रालाच नाग मानले जाते.उत्तर भारतात काही ठिकाणी नाग म्हणजे पूर्वज असे मानले जातात.नागाचे रूप घेऊन ते आपल्या घर परिवाराची सुरक्षा करीत असतात.नागपंचमीच्या दिवशी घरातल्या कुठल्याही एका कोपऱ्यात वाटीभर दूध ठेवले जाते.यासोबतच काही भागात पुत्र प्राप्ती नंतर बाळाचे जावळ काढल्यानंतर घरात किंवा घराच्या बाहेर पाच सर्पाकृती काढल्या जातात.दुसऱ्या पुत्र प्राप्ति नंतरच हे प्रतीक मिटवून नवीन प्रतीके निर्माण केली जातात. राजस्थानातील काही भागात ऋषीपंचमीच्या दिवशीच नाग पूजा केली जाते. गढवाल लोक परंपरेनुसार अलकनंदा नदीच्या परिसरात नाग वास्तव्य करतात,असे मानतात.इलाहाबादच्या दारागंज मध्ये वासुकी नागाचे प्रसिद्ध मंदिर आहे. प्रतिवर्ष नागपंचमीला येथे यात्रा भरते. बिहारमधील नालंदा परिसरात अनेक नागमूर्ती आढळून आले आहेत.इथेच चतुर्मुखी नागफणा असलेली स्त्री मूर्ती मिळाली आहे.तामिळनाडूमध्ये शेष नागाची पूजा केली जाते.नागपंचमी पश्चात जन्मलेल्या मुला,मुलींची नावे नागराज किंवा नागमणी असे ठेवली जातात.काठीयावड मध्येही मंदिरे आहेत.औरंगाबाद जवळील पैठण ही क्षेत्रही नाग वंशाची संबंधित आहे.ब्राह्मण कन्या गोदावरी नदीत स्नानाला गेल्यावर शेषनाग तिच्या सौंदर्यावर मुग्ध झाला.त्यांच्या प्रेमाचा परिणाम म्हणजे राजा शालिवाहन चा जन्म होय.नाग पूजेच्या संदर्भाने बत्तीस शिराळा या गावी घडलेली घटना महाराष्ट्रात सर्वदूर प्रसिद्ध आहे.नाग पंचमीला शेतात नांगर फिरविल्याने नागाची पिल्ले दगावली.त्यामुळे क्रोधित नागिन संबंधिताच्या घरातील सर्वांनाच दंश केला.सासरी असलेल्या मुलीला ही दंश करण्यासाठी ती गेली असता. ती नाग पूजेत भक्तिभावाने मग्न असलेली दिसून आली. तेव्हा नागीनीने प्रसन्न होऊन सर्वांना जिवंत केले.नागपंचमीला महाराष्ट्रात मुलीला सासरी ठेवत नाहीत. लोकपरंपरेत असे म्हटले जाते की,

आता नागपंचमीच I
नाग आल्याची खेळायला I
मी ग भैय्याला सांगयितु I
बारा सणाला नेऊ नको I
पंचमीला र ठेवू नको I

तर….पंचमीचा सण आला डोळे माझे ओले
बांधिले ग सख्यांनी झाडाला हिंदोळे
( तारा भवाळकर,लोक संचित )

हे सारे नाग पंचमीचे महत्व अधोरेखित करतात.

ऋग्वेद,यजुर्वेद,अथर्ववेद,गृह्यसूत्र,रामायण,महाभारत,मैत्रेयी सहिता आणि पुराणात नागांचे अनेक उल्लेख आढळतात.ते ही वेगवेगळ्या समानार्थी शब्दाने.नाग पूजेच्या  संदर्भाने भारतीय साहित्यात विविध विधी सांगितलेल्या आहेत.अथर्ववेदात नागाला चारी दिशांचा दिक्पाल म्हटलेले आहे. ललितविस्तार या बौद्ध ग्रंथात नागाला लोकपाल रुपात मान्यता दिलेली दिसते.नागराजा तक्षकाने स्वेच्छेने राजा परिक्षितला दंश केला नव्हता.तर ऋषीच्या शापाला पूर्ण करण्यासाठी तो दंश होता. असे नारदाने परीक्षित पुत्र जनमेंजय यास सांगून सर्पसत्र किंवा नागयज्ञ बंद करावयास लावला.त्यावेळी राजा जन्मेजय याने प्रायश्चित करण्याची तयारी दर्शविली.तेव्हा नारद मुनी ने सांगितले की, ” सामूहिक रुपाने तुझ्या प्रजेने प्रतिवर्ष नागांची पूजा करावयास हवी. ” असे म्हणतात की तेव्हापासून नागपंचमीला सुरुवात झाली.नाग संबंधी अनेक मिथके आपल्याला पाहावयास मिळतात. पंचतंत्राच्या कथित नागा संबंधी भरपूर लिखाण आढळून येते.नल दमयंती कथेत ही नल राजाने नागाची केलेली प्राण रक्षा आणि त्यातून नागाने केलेले सहकार्य वाचावयास मिळते.

         ll नाग नगरे ll

भारताचे अतिशय प्राचीन नगर जे वायव्य सीमेवर भारताच्या प्रवेशद्वारावर वसलेले नगर म्हणजे तक्षशिला होय.जगातील विद्या अभ्यासाचं प्राचीनतम केंद्र,भारतीय लोक परंपरेनुसार ही नागराजा तक्षकाची नगरी.उत्तर प्रदेशातील अहिच्छत्र नगरी ही परंपरेने नागांची जोडल्या जाते.तिचे नावच अही म्हणजे नाग.हा तिचा नागाची संबंध सांगणारे आहे.मध्य प्रदेशात गोलियर जवळ हे शहर होते.प्राचीन पद्मावती नगरी ही पुराण प्रसिद्ध नगर.पुराणात येथील नागवंशी राज्यांची विस्तृत वर्णने आहेत.येथील नागसेन नामक राजाचा उल्लेख सम्राट हर्षवर्धन याचा राजकवी बाणभट्ट याने आपल्या हर्षचरित्रात केला आहे.नागद,नागपूर,नागापूर,नागग्राम,नागठाणा,नाग हल्ली,नागुर, नागझरी अशी नाग नामक गावे भारतात सर्व प्रांतात आहेत.हल्लीचे पद्म पवया हे ग्वालियर जवळ आहे.पूर्वी पद्मावती या नावाने प्रसिद्ध होते.येथे वृषनाग,भीम नाग,स्कंद नाग,वसू नाग,व्याग्र नाग आदी राजांची नाणी सापडली आहेत.

          ll नाग वंश ll

नाग वंशाच्या उत्पत्तीच्या अनेक कथा तील ही एक कथा आहे की, कश्यप ऋषी ला कद्रू व वनिता नावाच्या पत्नी होत्या.कद्रूच्या पोटी जी संतान झाली ती नाग या नावाने प्रसिद्ध झाली.अनेक पुराणांमध्ये थोड्याफार फरकाने आली आहे.वासूकी हा नाग राजा होता त्याची राजधानी भोगावती नगरी होती.या वासुकी नंतर देवदत्त पर्यंत अनेक महान नागराजे होऊन गेले. या नागांना विविध पुराणानुसार एक,पाच किंवा सात पासून हजार पर्यंत फणा असल्याचा उल्लेख मिळतो.अनंत हा सहस्त्र फणा असलेला नाग होता.त्यावर विष्णू झोपलेला आहे असे मानतात.विष्णू त्यावर झोपला म्हणजे नागा वर विष्णूने वर्चस्व निर्माण केले असेही मानले जाते.तर नाग शिवाच्या गळ्यात असल्याने नाग लोकांचा आणि शिवाचा अनन्यसाधारण संबंध स्पष्ट होतो.नंदीवर शिव प्रसन्न झाल्यावर नंदीचा सन्मान करण्यासाठी आलेल्या नाग मंडळींची यादी वराहा पूराणात दिली आहे.नागांच्या संबंधाने सर्वात विस्तृत वर्णन माया शिल्प या ग्रंथामध्ये उपलब्ध होते.या ग्रंथात वासुकि,तक्षक, कारकोटक,पद्म,महापद्म,शंखपाल आणि कुलिक या सात प्रमुख नागांच्या लक्षणांचे वेगवेगळे उल्लेख केलेले आहेत.तक्षकाच्या मस्तकावर स्वस्तिक आणि महापद्म याच्या मस्तकावर त्रिशुल असायला हवा.अंशुमदभेदागम मध्ये चतुर्भुज आणि त्रिनेत्र नाग देवतांचे उल्लेख आढळून येतात.

धार्मिक ग्रंथानुसार, कुण्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष असल्यास नागपंचमीच्या दिवशी भगवान शिव आणि नागदेवतेची पूजा करावी.असा उल्लेख आढळून येतो.या अर्थी नाग ही देवता सामाजिक, धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातूनही रूढ झाली म्हणावी लागेल. हिंदू धर्म मान्यतेनुसार पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर विराजमान आहे. पौराणिक मान्यतेनुसार असलेल्या प्रमुख नागांचा तपशील पुढील प्रमाणे –

शेष – अनंत या नावानेही शेष नागाचा ओळखले जाते.शेषनागाने गंधमादन पर्वतावर तपस्या केल्यानंतर ब्रह्माजीच्या वरदानाने पृथ्वीचा भार सांभाळण्याचे काम त्याच्याकडे सोपविण्यात आले.हरिवंश पुराणानुसार ब्रह्मदेवाने वासुकीला नागांचा राजा,तक्षकाला सापांचा राजा आणि शेषाला सर्वच विषदंती प्राण्यांचा राजा बनविला. यावरून शेषनागाचे महत्त्व सिद्ध होते. धार्मिक ग्रंथानुसार लक्ष्मण आणि बलराम शेषनागाचे अवतार रूप आहेत.हाच शेषनाग विष्णू चा सेवक म्हणून क्षीरसागरा मध्ये आहे.विष्णू विश्राम मुद्रेत शेष नागच्या वेटोळ्यावर झोपलेले असतात.श्रीकृष्ण जन्म समयी वासुदेव कृष्णाला यमुना पार करत असताना प्रचंड वर्षा होत होती.त्यावेळी शेषनागाने आपला फणा कृष्णा वर धरून यमुना पार करण्यास मदत केली होती.

वासुकी – हा समस्त नागांचा राजा.वासुकी हा शिवाच्या कंठास लपेटलेला असतो असेही म्हणतात.समुद्रमंथनाच्या वेळी दोरीच्या रूपाने वासुकीचा उपयोग केला गेला होता.शिवाच्या त्रिपुरांतक अवतारात शिवाने एकाच बाणात असुरांची तीन पुरे नष्ट केली होती. त्यावेळी धनुष्यबाणाची प्रत्येंचा वासुकी बनला होता. कथासरित्सागर या ग्रंथानुसार लता देशाचा राजा वासुकीच्या संबंधाने आदर भाव प्रकट करण्यासाठी प्रति वर्ष उत्सव करीत असे.

तक्षक – शृंगी ऋषीच्या शापाची अंमलबजावणी करण्यासाठी तक्षक नागाने राजा परीक्षिताला डसले होते.त्यामुळे तक्षकाचा बदला घेण्यासाठी परीक्षित पुत्र जनमेंजयने सर्प यज्ञ केला होता.तेव्हा सर्व साप यज्ञात येऊन पडू लागले.त्यावेळी आस्तिक मुनीने तक्षकाची रक्षा केली. तक्षकच शिवाच्या गळ्यात असलेला नाग आहे असे ही मानले जाते.तक्षकाचा पुत्र अश्वसेन पाताळात राहत असे. खांडव वन अग्निकांड पासून तो अर्जुनाचा विरोधी होता.त्यामुळे कुरुक्षेत्र रणभूमीवर अश्वसेन कौरवांच्या बाजूने सामील झाला होता.अथर्व वेदा नुसार तक्षक हा सर्वाधिक विष असलेला नाग होता असे म्हटले आहे. कौशिक सूत्रानुसार गृहरक्षे साठी तक्षका समोर बळी द्यावा असे म्हटले आहे.असे म्हटले जाते की,तक्षशिला येथे तक्षक संप्रदायाचा प्रभाव होता.मध्यप्रदेशात तक्षकेश्वर या नावाने इंदोर जवळ नवाली गावात एक मंदिर आहे.

करकोटक – यास शिवाचा गण असेही म्हणतात. हरिवंश पुराणात या नागाचा विशेष उल्लेख मिळतो.नल-दमयंती कथेतही करकोटक येतो. आपल्या आईच्या शापातून मुक्त होण्यासाठी महाकाल वनात शिवलिंगाची पूजा केली होती.

कालिया – याचा निवास आपल्या कुटुंबासह यमुना नदी मध्ये होता. त्यामुळे यमुने मध्ये विष पसरले होते.कृष्णाने कालियाला युद्ध करून यमुना सोडण्यास भाग पाडले.

सिंधू संस्कृतीत नागांची असलेली शिक्के,भरहुत सांची आणि अमरावती येथील नागांचे शिल्पांकन यासोबतच पुढे गुप्त काळामध्ये नाग मूर्तीचे तीन प्रकारे शिल्पांकन व्हायला सुरुवात झाली.

१) मानवाकार मूर्ती ( डोक्यावर नागफणा )

२) मानव सर्प विग्रह ( कमरेच्या वर मानव रूप )

३) पूर्ण नाग रूप.

महाराष्ट्रातील काही वंशाची नावे ‘शेष’ अशी आहेत.प्रख्यात शिंदे घराणे हेही नागपूजकच होते.कर्नाटक,महाराष्ट्रात अनेक शिंदे घराणे आहेत. राष्ट्रकूट नृपती गोविंद तृतीय याच्या नेसरी ताम्रपटात त्याचा सामंत नाग हस्ती याचा उल्लेख येतो.कर्नाटक राज्यातील चंद्रवल्ली बागलकोट, भैरवमट्टी,हरिहर,मात्रहल्ली येथील शिलालेखात नागवंशी राज्यांचे अनेक उल्लेख येतात.पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे ही नागवंशीय शिंदे यांची एक शाखा राज्य करीत होती.पैठणचे सातवाहन हे नाग वंशियच राजे होते. महाराणी नागनिका ही नाग कन्याच.

          ll नाग प्रतीके ll

भारतीय कलेने भावना प्रकट करण्यासाठी प्रतीकांना जन्म दिला.जसे नाग कश्यप आणि कद्रू यांचे पुत्र असल्याचे पुराणात उल्लेख आहेत. पौराणिक नाग लोकांमधील अनंत,वासुकी,शेष हे नाग मानवा अनुकूल होते.तर तक्षक,कारकोटक,कालिया हे मानव वैरी होते.नाग हा वारूळात राहतो आणि वारूळ हे भू देवतेचे प्रतीक मानले आहे. त्यामुळे भूमीच्या सृजन शक्तीशी त्याचा संबंध जोडला गेला.शिव आणि विष्णु या दोघांचाही नागाशी संबंध आहे.नागफणी धारण करणारी कालिकादेवी आहे.त्याचप्रमाणे गणेशाच्या पोटावर ही नागबंध आवळलेला असतो.कंसाच्या कैदेतून बाहेर पडल्यानंतर पावसापासून रक्षण करण्यासाठी वासुकी नागाने कृष्णावर फना छत्र धरलेले होते. बुद्धांच्या जन्मानंतर नंद व उपनंद या नागांनी स्नान घातले होते.तर ज्ञान प्राप्ती नंतर मुचलिंग नागाने त्यांच्यावर आपला संरक्षक असे फनाछत्र धरले होते.जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे नाग हेच अभिज्ञान चिन्ह आहे. कामठा किंवा मेघमालि हा पूर्वजन्मीचा पार्श्वनाथाचा भाऊ जो वैरी बनला होता.त्याच्या हल्ल्यापासून यक्ष धरणेद्र हा आपल्या सात फण्याचे छत्र पार्श्वनाथच्या डोक्यावर धरले असल्याचे शिल्प वेरूळ लेणीत आहे.

श्रवणबेलगोळ येथील गोमटेश्वराच्या प्रचंड मूर्ती भोवती अनेक वारुळे निर्मिले असून त्यातून नाग बाहेर येत आहेत असे शिल्पात दाखवले आहे.नाग हे योगाचे ही प्रतिक मानले जाते.त्या कारणाने शिवाची योगी राजत्व दाखविण्यासाठी नाग शिवा जवळ सातत्याने दाखविला जातो.अशी ही पौराणिक मान्यता आहे.

    ll आयुध रूपातील नाग प्रतीक ll

बहुतांश देवतेसमोर नाग हे चिन्ह आयुध म्हणून दाखवण्यात येत असले तरी,प्रत्यक्षात शिवा सोबत सर्प / नाग हे लांछान कायमस्वरूपी जोडले गेलेले आहे.प्रतिमा लाक्षणिक विवरण पाहता विष्णुधर्मोत्तर पुराण,मत्स्यपुराण,मानसार,मयमत,कामिकागम,अंशुमतभेदागम,देवता मूर्ती प्रकरण,आदी शिल्प शास्त्रीय ग्रंथात शिवाच्या आयुधात कृष्णमृग, खडग,खेटक,वज्र,परशु,त्रिशूल,खट्वांग,डमरू,पाश,हस्ती चर्म,दंड, कपाल,अक्षमाला,धनुष्य,शंख,चक्र,गदा आणि सर्प किंवा नाग सांगितला आहे.

    ll नाग आणि लैंगिक काम प्रतीक ll

नाग किंवा साप यांना लैंगिक भावनेचे प्रतीक मानण्यात येते. ज्यावेळी एखादा साप खांबाला वेढा देऊन बसतो तेव्हा तो खांब प्रेरित झालेले लिंग वाटतो.साप हा पुरुषवाचक शब्द म्हणून वापरला जातो.या सरपटणाऱ्या प्राण्यात लिंगाची रचना असल्यामुळे ते वासनेचे प्रतीक आहे.त्यासाठी त्याला वैशेयिक मन,संभोग इच्छा आणि संभोग इच्छा कमी होणे इत्यादीचे प्रतिनिधित्व सरपटणारे प्राणी करतात.ज्या वेळी स्त्री व पुरुष उत्तम परिस्थितीत व तंदुरुस्त शरीराने एकमेकांकडे आकर्षित होतात.त्यावेळी त्यांच्या लिंगाची व योनीची स्थिती एखाद्या वळवळणाऱ्या प्राण्या सारखी होते. ग्रीक कथेत एडम व इव्हा यांच्याजवळ साप हे प्रतीक यामुळेच दाखवण्यात येते.प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिगमंड फ्रॉइड याने सुद्धा नागाला काम प्रतीक मानले आहे.त्यांच्या मतानुसार, आदिम समाजातील स्त्रिया नागाची पूजा काम प्रतिकाच्या रूपानेच करत असत.कदाचित यामुळेच जगभरात आणि विशेषतः भारतामध्ये नागपूजा या स्त्रियाच करतात.नागाची पुत्रप्राप्तीसाठी आराधना करणे किंवा शिवा सारखा श्रेष्ठ पती मिळावा यासाठी शिवपूजन करणे या पाठीमागे ही कामभावना प्रेरित असावी असेही मानले जाते.वांझ स्त्रिया पुत्र प्राप्ती साठी नागशिळेची पूजा करतात.नागाच्या काम रूपा संदर्भाने कश्मीरी लोक कथेनुसार, सुरिनसर किंवा सुनासर ही झील अध्यात्मिक बाबतीत  पवित्र मानली जाते.हा संदर्भ महाभारत काळाशी जोडला जातो.वनवासात असतांना पांडव जम्मू येथे गेले होते. ज्यावेळी नागकन्या उलुपी सोबत अर्जुनाचा विवाह झाला होता. तसेच माणिपूर राज्याची राजकन्या चित्रगंधा हिच्यासह ही अर्जुनाने विवाह केला होता.कालांतराने त्यांना बब्रुवाहन नामक वीर पुत्र जन्माला आला.अर्जुनाचे वास्तव्य तिथे अल्पकाळ असल्याने पुत्र जन्माची वार्ता अर्जुना पर्यंत पोहोचली नाही. महाभारताच्या युद्धसमाप्तीनंतर पांडवांनी अश्वमेध यज्ञ केला होता. यज्ञाचा अश्व बब्रुवाहन यांनी रोखून धरला होता.तो सोडविण्याचा प्रयत्न अर्जुनाने केला असता.युद्ध कौशल्यात अर्जुन कमी पडला.त्यामुळे अर्जुनाला मूर्च्छा आली.ही वार्ता चित्रगंधा हिला कळाली असता ती रणभूमीवर आली आणि पुत्र बब्रुवाहन यावर ती क्रोधित झाली. वडिलाला जिवंत करण्यासाठी बब्रुवाहन यांनी वैद्यची मदत घेतली. वैद्यांनी उपचार सांगितला की,पाताळ लोकातून नागमणी (वनौषधी) आणावी लागेल.त्यासाठी बब्रुवाहन याने पाताळ लोकात बाण मारला. त्या बाणाने इच्छित नागमणी आणला.त्या साठी नागकन्या उलुपीने साह्य केले.त्या नागमणीच्या सह्याने अर्जुन जागा झाला.ज्या मार्गाने बाण गेला आणि ज्या मार्गाने बाण परत आला तिथे दोन्ही बाजूने झील तयार झाली असे मानले जाते.तेव्हा पासून नवविवाहिता या झीलची तीन वेळा परीक्रमा करून नाग देवतेचा आशीर्वाद घेऊन वैवाहिक जीवनाला प्रारंभ करते.

वारूळ हे भूमीचे – भूमीच्या सृजनेंद्रीयचे याचे प्रतीक आहे. नर नाग हे पुरुषी तत्त्वाचे प्रतीक आहे.त्याची उपासना प्राधान्याने संतान दाता देव म्हणूनही होते.दक्षिणेत अनेक जमातीत वधूने व विवाहित स्त्रियांनी नाग पूजा करण्याची चाल आहे.काही ठिकाणी विवाहित स्त्रिया वारुळाची पूजा करतात.संतान प्राप्तिची अपेक्षा करणाऱ्या स्त्रिया नागाच्या अथवा नाग युगालाच्या मूर्तीची पूजा करतात.नवस फेडण्यासाठी नागमूर्ती तयार करून मंदिराच्या आवारात अथवा झाडांच्या पायथ्याशी प्रतिष्ठित करतात.

नागाचे संतान दायी सामर्थ्य भारतीय जनमानसातील अनेक धारणांमधून व्यक्त होत असते.दक्षिणेतील सर्व प्रमुख क्षेत्रपाल देव आपले नागरूपात्व सांभाळून आहेत.ग्रामीण भागातून आजही अशी दृढ समजूत आहे की,एखाद्या गर्भवती स्त्रीने साप पाहिला असता, त्याचे तत्क्षणी डोळे जातात आणि ती स्त्री प्रसूत झाल्यावर तिच्या नान्ही घराचा गंध अनुभवल्यावर तो नाग पुन्हा डोळस होतो.ती गरोदर असताना त्या स्त्रीचा आणि पुरुषाचा संबंध येऊ नये किंवा समागम घडू नये,असा निषेध त्यात अभिप्रेत असावा. सर्व पुरुष नागाचे प्रतिनिधी आहेत आणि नाग हे पुरुषी तत्त्वाचे प्रतीक आहे.म्हणून वारुळाची पूजा भूमीच्या सृजनेंद्रीयचे प्रतीक म्हणून केली जाते.वारूळास पृथ्वीची योनी म्हणतात. योनी रूपिनी भुदेवी आहे.योनी प्रतीक म्हणून नैसर्गिक वारूळची उपासना अति प्राचीन काळापासून आजपर्यंत दक्षिण भारतात तरी अखंड प्रचलित आहे.वारूळ ही फारच नाजूक असल्यामुळे वारूळ सादृश्य घडीव शीला मूर्तीचे प्रचलन क्वचित कोठे असल्याचा पुरावा उपलब्ध आहे.वारुळाच्या शीला रूप प्रतिकृती नंतर नाभी पर्यंतच्या योनी मूर्ती घडविल्या जाऊ लागल्या.तसेच प्रसवा बरोबरच पोषणाचा ही मातृत्वाशी संबंध असल्यामुळे योनि प्रमाणेच स्थानांना उठाव देणाऱ्या स्कंदा पर्यंतच्या मूर्तीची निर्मिती होत गेली.भू देवीच्या सर्जक आणि पोषक इंद्रियांच्या मूर्तीचा हा वारूळ ते योनी – स्तन- युक्त मूर्ती पर्यंतचा क्रमविकास श्री रा.चि.ढेरे यांनी सिद्ध केला आहे.

II काम शास्त्रीय ग्रंथानुसार नाग II

कल्याणमल्ल,कोक्कोक,दीक्षित श्यामराज,श्री प्रोढदेवराज,मथुरा प्रसाद दीक्षित यांनी नायिकेच्या माणस प्रकृतीचा ही उल्लेख केलेला आहे.देव सत्वा,यक्ष सत्वा,मनुष्य सत्वा,पिशाच्च सत्वा,नाग सत्वा,काक सत्वा, वानर सत्वा आणि खर सत्वा असे प्रकार सांगण्यात आलेले आहेत. सत्व या शब्दाचा अर्थ शील असा होतो.अर्थात नायिकेच्या चारित्र्य आणि वागणुकीवरून हे सत्वाचे प्रकार दिलेले आहेत.त्यानुसार जी नेहमी एखादी घटना किंवा काम विसरते,विसराळू स्वभावाची जी नेहमी व्याकुल,घाबरलेली असते, सापाप्रमाणे दीर्घ श्वास घेणारी,नेहमी निद्राधीन राहणारी,नेहमी जांभळी देणारी ती नाग सत्वा जाणावी.असे म्हंटले आहे.

वरील विवेचनावरून असे म्हणता येईल की,

१) सर्वच प्राचीन मानवी सभ्यतेत नागा विषयी भीतीतून आदरभाव निर्माण झाला.२) नाग सादृश्यधिष्टीत कल्पनेच्या जोरावर सूर्या सोबत संबंध जोडून कथा निर्मिती केल्या गेल्या.३) नाग हे अत्यंत जहाल विष बाळगून असल्यामुळे आमचाही वंश नागसम आहे. हे दाखविण्यासाठी कुळवंश प्रतिकाच्या रूपाने नाग हे ‘कुलचिन्ह’ म्हणून ज्या जमातींनी किंवा राज वंशानी स्वीकारले त्यास नागलोक या नावाने ओळखण्यात येते.४) नागाची शरीर रचना ही पुरुष लिंगाप्रमाणे असल्यामुळे आणि वारूळ स्त्री लिंग अथवा भूमिचे / सृजनाचे प्रतीक म्हणून स्वीकारले गेले असावे.५) दक्षिणेतील अनेक क्षेत्रपाल देवता आपले नागरूप प्रकट करताना दिसतात.६) आशीर्वाद देत असताना हाताची मुद्रा ही पाच फडा असलेल्या शेषनागाची मुद्रा मानली जाते. यज्ञोपवीतातील एका सूत्राचे नाव नाग तंतू असे आहे.

डॉ.अरविंद सोनटक्के,
मूर्ती शास्त्र अभ्यासक,
प्रमुख,इतिहास विभाग,
दिगंबरराव बिंदू कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,भोकर.जि.नांदेड.
(९४२३१३९६७६)

लेख- थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला…

पणती जपून ठेवा अंधार फार झाला
आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे
नाती जपून ठेवा अंधार फार झाला
काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून
घरटी जपून ठेवा अंधार फार झाला
हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात
ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला
वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची
स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला
हे  वाटतील परके आपुलेच श्वास आता
हातात हात ठेवा अंधार फार झाला
शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे
हरणे जपून ठेवा अंधार फार झाला
बाजार हा फुलांचा येथे फुलेच विकती
कलिका जपून ठेवा अंधार फार झाला
ह्रदयात पाळलेल्या जखमातुनीच आता
कंदील एक लावा अंधार फार झाला
हिमांशू कुलकर्णीचं हे अमरगीत दिपावलीच्या प्रकाशपर्वपुर्व काळात सहजच आठवल.
दीपावली आता लवकरच येणार आहे.दिपावली या शब्दातच दिपावलीचा आशय दडलेला आहे.
दीपावली म्हणजे,दिव्यांचा सण,प्रकाशाचा सण. दिपावली;दिवाळीचा थेट अर्थ ‘दीपावली’ या शब्दातच दडलेला आहे.दीपावली म्हणजे,दिव्यांचा सण,प्रकाशाचा सण.दिवाळी या शब्दाची जर फोड केली तर ‘दिवा’ आणि ‘आली’ अशी शब्दफोड करता येईल.
या सणानिमित्त सगळ्यांमध्ये एक उत्साह असतो.हिंदू धर्म संस्कृतीत दिव्याला वेगळचं महत्त्व आहे.कारण दिवा हा आत्मज्ञानाचा प्रतीक मानला जातो.
दररोज आपण सकाळ संध्याकाळ देवापाशी दिवा लावतो. ‘शूंभकरोती कल्याणम’अस म्हणतो.दिव्याच म्हणजेच प्रकावाच महत्व आणि महात्म्य हिंदु संस्कृतीन जपल आहे.
दरवर्षी साजरी होणारी दिवाळी दिव्यांची रोषणाई जीवनात  प्रकाशाच महत्त्व समाज मनाला समजावते.आपल्या जीवनातल्या प्रकाशमय दिव्याला आपले आयुष्य प्रकाशमय करण्याचे आवाहन करत असतो.मानवी शरीरात ज्ञानाला प्रकाश मानण्यात आलं आहे. ज्ञानज्योती उजळावी म्हणून दिव्यांची रोषणाई केली जाते.
दिवाळी या सणाचे महत्त्व हिंदू संस्कृतीत जरी मोलाचे असले तरी,दिवाळी सण नेमका का? व कसा? साजरा करायचा?याचाच विसर आजच्या पिढीला पडलेला आहे.

त्यातच संस्कृतीविरोधक हिंदुच्याच संस्कृतीतल्या सणांत सुक्ष्मदर्शित्राने दोष शोधत नावबोट ठेवु लागतात.त्यांच सोडा त्यांच तर हे कामच आहे.
कालानुरूप आपणच आपल्या सणाचं बाजारीकरण झालेलं उघड्या डोळ्यांनी पाहतोय.गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवासारखे दिवाळी हा सण घरात,मनात,जीवनात साजरा होण्याऐवजी जाहीरातीत साजरा होतय.कंपन्यांनी आपल्या आरोग्याला मारक वस्तुंच्या मार्केटींगसाठी सणांचा उपयोग करुन देशातला पैसा परदेशात नेण्याचा घाट बांधला आहे अशी शंका मनात येते.खरी का खोटी पडताळा मन करु लागतय.
खरतर,दिवाळी प्रेमाची,ऐक्याची,बंधूभावाची आणि माणुसकीची असे शब्द फक्त आता लोकांच्या तोंडून ऐकायला बरे वाटते.कारण दुभंगलेली घर,मन अन आपलीच माणस दुरावलेली असल्यान दिवाळी ही ऑनलाईन सुरु झाली.दिवाळी हा सण कधी सुरू झाला,त्याची नेमकी पार्श्वभूमी काय होती,या मागे पूर्वजांचा काय विचार होता.आणि संतकाळापासून ही दिवाळी कशी साजरी केली गेली.हे आपल्याला माहीतच नाही.आपण कधी याचा प्रयत्नही करत नसल्यामुळ संस्कृती विरोधकांच फावतय.
लोक करतात म्हणून आपण त्यांची काॅपी करुन आपण सण साजरे करतोय अस वाटत.असाच दिवाळसण गतवर्षी केलाय याही वर्षी करणार आहोत.
हिंदु संस्कृतीत सणावारांचा क्रम अगदी अभ्यासपूर्णरित्या लावला आहे.असं वाटतं.हे खरंही असेल.
नवरात्राच्या नऊ दिवसात शक्तीउपासनना करुन दशमीला विजयादशमी सण येतो.या दिवशी प्रभुरामांनी रावणरूपी विकृतींचा नाश केला.अयोध्येत परतले.अयोध्येत प्रभुंच स्वागत दिपोत्सव करुन अयोध्यावासीयांनीच नव्हेतर, देशवासीयांनी केल.
ह्या परंपरेची मुळ खोलवर रुजत गेली.आजही आपण दिवाळी साजरी करतो.या दिवाळीत अंगणातच नव्हेतर,आपल्या मनाच्या अंगणातही स्वास्थ समाधान,स्नेह अन आपुलकीचे दिप लावु या.
दिवाळी म्हणजे चांगला मरगच्च सण असतो.सगळ्याच अर्थाने भरगच्च दिवाळी येण्यापूर्वीच पंधरा वीस दिवसांपासून दिवाळीची चाहूल लागायची.घराघरामधून प्रथम आवराआवरीचे आवाज येऊ लागायचे.घर स्वच्छ व्हायची मनही स्वच्छ व्हायची.आता आपण आपल्या नात्यातली संवादाची दारच बंद केलीत.अहंकार जोपासुन ताठ राहण पत्करल्याने दिवाळीची लगबग कशी दिसणार?नंदा,भावजयांचे हसणे खिदळणे,पोरासोरांची भांडणे इतीहासजमा झालीत.
भाजणी भाजल्याचे खमंग वासानं दरवळणं सोडलं.ती जागा कंपण्यांच्या प्रॉडक्टने घेतली.कोणाच्या घरात कोणता पदार्थ चालला आहे,हेदेखील सांगता येत का? पोहे,शेंगदाण्याचे डबे रिकामे करुन त्यामध्ये करंज्या,चकल्या,शेव,चिवडा असे अनेकविध प्रकार भरले जात.महिला बिचाऱ्या काम करुन दमायच्या,मुले सुट्ट्या सुरु झाल्याने आनंदात असत.पुरुष मंडळी खर्चाचे आकडे मोजत परंतु फराळाची चव चाखत मजेतच असायचे.पैशाची उणीव नात्यांनी भरुन निघायची.
दिवाळीची धामधूम राजा असो की रंक असो सगळ्यांच्याच घरांमधून आपापल्यापरीने चालू असायची.
काही ना काही खरेदी करण्याची इच्छा प्रत्येकाला व्हायचीच आणि आपापल्यापरीने ती इच्छा पूर्णही केली जात असे.अशा या धामधुमीच्या काळात या सणाचे पौराणिक महत्त्व मात्र विसरल जातच नव्हत.हे पुर्वीचे चित्र आणि आजचं कसं याचा आपणच विचार करु या.
दिवाळीच्या सणामागे पौराणिक अर्थही आहेत “आणि सामाजिक आशयही दडलेला आहे.दिवाळीची सुरुवात वसुबारस सणापासून होते.
अश्विन महिन्यातील कृष्ण द्वादशी दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. यालाच आपण वसुबारस असे म्हणतो. त्यालाच संस्कृतमध्ये गोवत्स द्वादशी म्हटले जाते.भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे गायवासराचे पूजन केले जाते. ही शेतीसाठी उपयोगी असल्यान गोवत्साबद्दलचा कृतज्ञताभाव प्रकटीकरण करतानाच गोवत्स पालनाकडं भर असायचा अत्यंत मंगलमय वातावरणात पुजन व्हायचं. मनाला अधिक प्रसन्न करण्यासाठी अनेक ठिकाणी या दिवसापासूनच पणत्या लावायला सुरुवात व्हायची आजही होते.
कित्येक घरांमधून या दिवशी हे भात व गोड पदार्थ,गाई गुरांना घालण्याची पद्धत आहे.महिला या दिवशी उपवासही करतात.वसुबारस या दिवसांपासूनच घराघरामधून आकाशदिवे दीपमाळांची सजावट केली जाते.आज अंगणे फारशी शिल्लक नाहीत तरी देखील आहे त्या जागेमध्ये रांगोळ्या काढून दिवाळीच्या सणाचे सर्वत्र स्वागत केले जाते.
आज आपली गोमाता संकटात आहे तीची कत्तल होते आहे.ती थांबवण्यासाठी अनेक गोभक्त प्रयत्न करताहेत गोशाळा चालवल्या जातात त्यांना आपल्या परीने दान देवुन आपण संस्कृतीसंवर्धनात खारीचा वाटा देवु शकतो.आपल्या परीसरात अनेक गोशाळा आहेत.
     भोकर शहरातल्या बिंदू काॅलजातले प्राध्यापक गोभक्त डाॅ.व्यंकट माने सरांनी तर गीर गाय घरी आणली.अख्ख कुटुंब गोसेवेत रमल. मनात आणल तर हेही होवु शकत हे दाखवुन दिल.तर उद्योजक देवानंद धुत यांनी पोमनाला येथे गोशाळा स्थापन करुन अनेक गायींना आश्रय दिला आहे.या माध्यमातून गोसेवा ते करत आहेत.
धनत्रयोदशी- वसुबारसच्या दुसर्‍या दिवशी धनत्रयोदशी आहे.खरे म्हणजे हे तर यमराजाच्या प्रसन्नतेसाठी केलेले पूजन होय.या दिवशी यम दीप दान असा धार्मिक विधी सांगितला आहे.धनत्रयोदशी दिवशी नवीन वस्त्रे तसेच दागिन्यांची खरेदी केल्यास ती शुभ कल्याणपद ठरते,असे मानले जाते.याच दिवशी घरातले दागदागिने तसेच देवदेवताही घासून पुसून लखलखीत करुन मांडून ठेवायच्या असतात. महाविष्णु,महालक्ष्मी,कुबेर,गणेश,योगिनी,द्रव्य निधी देवता यांचे पूजन करुन त्यांच्यासमोर नंदादीप लावण्याची प्रथा आहे.धनत्रयोदशी दिवशी खिरीचा नैवेद्य दाखविला जातो.धनत्रयोदशी हा दिवस ‘धन्वंतरी’ या देवतेच्या पूजेसाठी आयुर्वेदाचे उपासक श्रद्धेने जपतात.धन्वंतरी म्हणजे,आयुर्वेद शास्त्राची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाते.चौदा रत्नांपैकी एक अशी धन्वंतरीची ओळख होते.रामदेव बाबा आयुर्वेदाचा प्रचार प्रसार करताहेत.
भोकर विचार विकास मंचाचे अध्यक्ष डाॅ.उत्तम जाधव, उपाध्यक्ष डाॅ.बी.आर.जाधव पारवेकर,सचिव डाॅ.विठ्ठल माने,केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष राजुसेठ लोकावाड व त्यांचे सहकारी आजार्‍यांची सेवा करताहेत.
नरकचतुर्दशी-दिवाळीची खरीखुरी सुरुवात नरकचतुर्दशीपासून केली जाते.भल्या पहाटे उठून अभ्यंग स्नान करणे हाच नरकचतुर्दशीचा मुख्य उद्देश असतो.सुवासिक तेलाचे सर्वांगाला मर्दन करून,उटणे लावून यथेच्छ स्नान करणे हा मुख्य कार्यक्रम झाल्यानंतर सर्वच जण ताबडतोब फराळाकडे वळतात.आठ साडेआठ पर्यंत पोटभर फराळ झाल्यानंतर पुन्हा दुपारी गोडधोडाचे ‘जेवण असतेच.हाच या दिवसाचा उद्देश नाही तर,नरकासुराचा वध ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने केला तो दिवस नरकचतुर्दशी म्हणून आपण साजरा करत असतो.सप्त भगिनीपैकी एक असणाऱ्या मणिपूर राज्यांमध्ये नरकासुराचे राज्य होते.त्याने अश्राप अशा सोळा हजार कन्यांना कारागृहात डांबून ठेवलें होते.या जुलमी राजाच्या तडाख्यातून श्रीकृष्णाने सोळा हजार कन्यांना मुक्त केले आणि नरकासुराचा वध केला.
या सर्वांना कृष्णपत्नीची प्रतिष्ठा लाभावी म्हणून या सर्वांशी विवाह करुन त्यांचे पती होऊन पालन केले,असे या दिवसाचे परंपरागत वैशिष्ट्य मानले जाते.आजही अनेक नरकासुर आपल्या देव,देश,धर्मावर आघात करताहेत.आपल्या श्रद्गास्थानांवर हल्ले,भारत तेरे तुकडे होंगे,सर तन से जुदा सारखे नारे व कृती,शत्रु राष्ट्रांचे छुपे हल्ले, कश्मीरच नव्हेतर,देशभरात पथ्थरबाजांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत आहे.हे होतय त्यांच्या बहाद्दूरीमुळे नाहीतर,सज्जनांच्या निष्क्रीयतेमुळे होतेय.ज्यांना रक्षणाची सुत्रे दिली तेच यांचे तारणहार बनत आहेत.अशा सर्व बाबींचा विचार करुन सध्याचे लक्षावधी नरकासुर संपवायचे असेल तर घटनात्मक मार्गाने संपवता येतात, त्यांचाही विचारदिप मनात चेतवावा लागेल.या नरकासुरांनी थैमान घातलं आहे. लोकशाही मार्गाने या नरकासुरांना आपण सहजपणे विचारांनी संपवु शकतो.
लक्ष्मीपूजन-अकारणच वाईट म्हणून ओळखली जाणारी. त्यापैकी अमावस्या हा दिवस.उगाचच काळा ठरविला गेला आहे; परंतु आश्चर्य म्हणजेच वर्षभरातील १२ अमावस्यांपैकी दहा अमावस्या सणासुदीच्या म्हणून साजऱ्या होत असतात.पिठोरी अमावस्या,दिवाळीची अमावस्या ही काही माहिती असणारी नावे आहेत.सणांचा राजा असणाऱ्या दिवाळीतील महत्त्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन होय.व्यापारी लोक हा सण सर्वाधिक धडाक्यात साजरा करतात.त्या दिवशी घरोघरी लक्ष्मी कुबेराचे पूजन केले जाते.या दिवसांपासून पुढील वर्षाच्या लक्ष्मीपूजनापर्यंत समृद्धी,ऐश्वर्य व भरभराटीची कामना लक्ष्मी कुबेराकडे केली जाते.दिव्यांची रोषणाई,फटाक्यांची आतषबाजी या धडाक्यात लक्ष्मीपुजन केल जात.
बलिप्रतिपदा – दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे स्वतः चे म्हणून एक विशेष वैशिष्टय आहे.नरकचतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुराला संपविले म्हणून तो दिवस आनंदाचा तर,बलिप्रतिप्रदा हा दिवस बली राजाच्या किर्तिमानतेसाठी साजरा होत असतो.बली राजा हा अत्यंत प्रजाहितदश असा राजा होता.लोकांमध्ये त्याच्याविषयी कमालीचा जादर होता; परंतु हा राजा आसुर शक्तीचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे बटू वामनाने बली राजाला संपविले.परंतू हा राजा जनतेच्या दृष्टीने फारच आदर्श राजा होता.त्याच्या राजपदाचे व कर्तृत्वाचे स्मरण म्हणून बलिप्रतिपदा साजरी होत असते.व्यापारी लोकांमध्ये हा दिवस नववर्षारंभाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पहाटे मंगल स्नान करून देवता दर्शन करणे हा मुख्य विधी या दिवशीची असतो.काही ठिकाणी पहाटेच सरस्वती पूजन म्हणून वही पूजन अगर चौपडी पूजन केले जाते.ग्रामीण भागामध्ये दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर गोवर्धन अन्नकूट केले जाते.गाईच्या शेण | पर्वत करून हा पर्वत सुशामित का जातो,त्याच्या भोवती गोपाळकृष्ण त्याचे सखे सवंगडी तसेच गाय वासरे यांची चित्रे बनवून ती रोवली इंद्राचेही चित्रीकरण केले जात असते.ही आरास चांगली सजवून त्याला वस्त्रालंकार अर्पण केले जातात.उत्तर भारतामध्ये याच दिवशी शेकडोंच्या संख्येने देवदेवतांसमोर मिष्टान्नाचे अत्रकूट तयार केले जाते. अन्नकूट म्हणजे,विशिष्ट मिठाईने किल्ला तयार करावयाचा.अन्नकुटाची पूजा समर्पित करुन झाल्यावर ही सारी मिठाई गोरगरिबांना वाटून टाकली जाते.गुजरात,राजस्थान या भागामध्ये अन्नकुटाचे अतिभव्य स्वरुपात पूजन केले जाते.
भाऊबीज-यमद्वितीया समस्त भगिनी वर्गाला अगदी आवडणारा सण म्हणजे भाऊबीज होय.या दिवशी बहीण भावाला ओवाळते.त्याच्या भरभराटीसाठी दीर्घायुष्यासाठी,आरोग्यासाठी शुभचिंतन करत असते. यमीने आपल्या घरी आपल्या भावाला म्हणजेच यमाला बोलावून त्याचा सत्कार केला.त्याला भोजन दिले.तेव्हापासून भाऊबीजेची सुरुवात झाली,असे मानतात.हा काळ केव्हाचा हे नेमके कोणालाही माहिती नाही.मात्र या सणाचे नाव यमद्वितीया असे पडले आहे. भावानेही बहिणीचा सन्मान करावा तिला भेटवस्तू द्यावी.अशी परंपरा आहे.उत्तरेकडे हाच दिवस भैय्या दूज म्हणून साजरा केला जातो.असे आहे दिवाळीचे पारंपरिक महत्त्व.
आज काळाला अनुसरुन आपण दिवसाला अधिक व्यापक आशयांनी दिवाळी साजरी करु शकतो.उदाहरणार्थ नरकासुराला प्रत्यक्ष मारण शक्य नसलतरी,स्वतःच्या घराची साफसफाई करताना आजूबाजूला केरकचरा पडणार नाही याची काळजी घ्यायलाहवी.आपल्या बहिणीला भेटवस्तू देताना थोडी विशालता बाळगून गरजू लोकांना दानधर्म हा शब्द न वापरता मदतीचा हात देवू शकता.माझ्या मित्राची कन्या कु. ऋतुजा लामकाणीकर दरवर्षी रुग्णांना फळवाटप करते.यासह कु.सिद्गी अडकिणे व तिच्या मैत्रीणींनी आपल्या खाऊच्या पैशातुन आमच्या बोरगाव शाळेत शालेय साहित्य वाटप केलं.त्यातुनच आम्हास एक हात मदतीचा उपक्रम सुचला.आम्ही बोरगाव शाळेने अपघातग्रस्त गणेश कांबळेला मदत दिली.हाच उपक्रम विस्तारत गेला.दिलीप सोनटक्के या सेवाभावी व्यापार्‍याने,माने सर व आम्ही कोरोना संकटकाळात ४५ दिवस भोजन पॅकेट व धान्यकिट दिल्या. त्यात भोकर विचार विकास मंच,किसान संघ,सावली प्रतिष्ठान सारख्या सेवाभावी संस्था सहभागी झाल्या.हाच ऊपक्रम श्रीकांत गोरशेटवार सरांना सांगीतला त्यांनी उचलुन धरला व नुतन शाळेतल्या सातव्या अ च्या विद्यार्थ्यांनी सुरु केला.खाऊचे पैसे साठवले.अशा अनेक सेवाभावी हातासह अनेक सेवाभावी संस्था ज्यात वनवासी कल्याण आश्रम,गोसेवा मंडळ, जनकल्याण समिती,भोकर विचार विकास मंच,सेवासमर्पण परिवार, सावली प्रतिष्ठाण,साईसमर्पण,एक हात मदतीचा परीवार सारख्या अनेक सेवाभावी संस्था आपापल्या परीने मनामनातला अंधार दुर करण्यासाठी सेवा पणत्या चेतवत आहेत.आपणही त्यांच्या सेवापणत्यांत धन,मन अन श्रम रुपी तेलवात टाकुन या सेवा कार्यात सहभागी होवु शकतो.
या दिपावली निमित्त आपल्या मनात आयुष्यभरासाठी सेवादिप लावू या..
आपल्या क्षमतेनुसार आपण गरजुंची सेवा करु  शकतो. त्यासाठी फारकाही लागत नसतं.लागते ती समर्पण भावाची ज्योत जागवण्याची मनोवृत्ती.
चला तर,आपल्या मनातली पणती चहु दिशांनी विस्मृतीचे तुफान जरी आले,चोहोदिशांनी वीजा कडाडु लागल्या,शिशिरातल्या हिमात श्वास गोठु लागला असतानाही,आपण माणुसकीची नाती जपु या. अशिक्षितांच्या मनात ज्ञानज्योत तर,शिक्षित व श्रीमंतांच्या मनात सेवाज्योत लावण्याचं कार्य आपण या दिवाळीत करु या.

चंदु चक्रवार
     भोकर

लेख…..ऑनलाईन शिक्षण-एक अनुभूती…

“शिक्षण हे एक असे अस्र आहे जे वापरून आपण जग बदलताना पाहू शकतो.”

याप्रमाणे शिक्षणाच्या जोरावरच एकविसाव्या शतकातील भारत हा माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती केलेला आहे.यामुळेच कोणताही विद्यार्थी,व्यक्ती एका क्लिकवर  जगभरातील कोणतीही माहिती मिळवतो.परंतु विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास होण्यासाठी मूल्यांची व व्यक्तीमत्व विकासाची रुजवणूक ही घर व शाळेतूनच होत असते.

आजच्या शिक्षण पद्धतीत अमूलाग्र बदल झालेला दिसून येतो. पारंपारिक शिक्षणपद्धतीच्या जोडीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबवून शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी सतत प्रयत्नशील असतात. एखाद्या विषयातील अवघड किंवा क्लिष्ट वाटणा-या संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी शिक्षक हा विविध व साधनतंत्राचा व कौशल्यांचा वापर करत आहे.कोरोनासारख्या महाभयंकर काळात अवघं जग ठप्प झालेले होते.तेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून झालेले आहे.
आज सर्वांकडेच मोबाईल आहे.कोरोनाच्या काळात याच साधनाचा वापर करून ऑनलाईन शिक्षण एक पर्याय म्हणून शिक्षकांडून आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला गेला.यामध्ये विविध विषयातील संकल्पना स्पष्ट करणारे व्हिडीओ,ऑडिओ,इमेजेस तयार करून ते विद्यार्थ्यांपर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पोहचवले गेले.
गुगल मीट,झुम मिटींग इत्यांदीच्या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यात संवाद होण्यास मदत झाली,पर्यायाने घरी बसूनच ऑनलाईन वर्ग व शैक्षणिक प्रवास सुरू झाला.
      कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणाचे माझे स्वतःचे काही अनुभव असे की,ऑनलाईन क्लाससाठी मी नियमितपणे सायंकाळी सात वाजता झुम मिटींगसाठी लिंक टाकायची.विद्यार्थी अतिशय आतुरतेने लिंक येण्याची वाट पाहायचे.बरोबर सात वाजता नियमित क्लासला उपस्थित असणारे विद्यार्थी अगदी पटापट जॉईन व्हायचे. जॉईन करून घेण्यासाठी किंवा लिंक पाठवण्यासाठी थोडा जरी उशीर झाला तर लगेचच दोन चार कॉल किंवा दहा बारा मेसेज व्हॉट्सअप गृपवर येऊन धडकायचे की मडम आज क्लास नाही का….?
   सांगायचे एवढेच की शिक्षक विद्यार्थी शैक्षणिक संवाद हा जरी समोरासमोर होत नसला तरी झुम मिटींगच्या माध्यमातून विद्यार्थी संवाद साधण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक अडचणी मांडण्यासाठी अतिशय उत्साहाने सज्ज असायचे.अधूनमधून होत असलेल्या पालक सभेसाठी देखील पालक उत्साहाने सहभागी होऊन आपल्या प्रतिक्रिया देऊन त्यांच्या पाल्यांबाबत व होत असलेल्या ऑनलाईन क्लासबाबत समाधान व्यक्त करायचे.तसेच याच माध्यमातून वरिष्ठ अधिकारी आदरनिय गटशिक्षणाधिकारी डॉ.मठपती साहेब यांचे विद्यार्थी-शिक्षक व पालकांना मार्गदर्शन मिळायचे.त्यांच्या मार्गदर्शन व कौतुकामुळे विद्यार्थी व शिक्षकांना आणखीच नवउर्जा व प्रेरणा मिळायची. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन उपस्थिती व शिक्षणात दाखवलेल्या उत्साहाबद्दल व विविध ऑनलाईन शैक्षणिक उपक्रमात दाखवलेल्या सक्रिय सहभागाबद्दल त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातूनच डॉ.मठपती साहेबांच्या उपस्थितीत ई-सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत व शैक्षणिक कार्यातच आणखीच भर पडली.
या ऑनलाईनच्या काळात जरी १००% विद्यार्थ्यांची उपस्थिती नसली तरी जे काही ७०-७५% विद्यार्थी यात सहभागी झाले होते त्यांना या ऑनलाईन क्लासचा व त्यांच्या इयत्तेतील संबंधित विषयाच्या अध्ययन क्षमता प्राप्त करून घेण्यासाठी नक्कीच फायदा झाला.आणि अशा प्रतिक्रियाही  पालकांनी दिल्या.
   ऑनलाईन शिक्षण कितीही दर्जेदार असले तरी ते वर्ग खोल्यांतून मिळालेल्या शिक्षणाची जागा कधीच घेऊ शकत नाहीत.परंतु कोरोना काळात सर्व विद्यार्थी-शिक्षक व पालकांनी ऑनलाईन शिक्षणाकडे एक पर्याय म्हणून पाहिले व ते उपयुक्तही ठरले.एक वेगळी अनुभूती मिळाली.
    आजही जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यासाठी,जागतिक स्तरावरील शिक्षण स्पर्धेत आपले पाय रोवून ठेवण्यासाठी सहाय्यक म्हणून ऑनलाईन शिक्षणाला एक पर्याय म्हणून वापरण्यास काहीच हरकत नाही.
     ऑनलाईन व ऑफलाईन यांचे सुयोग्य मिश्रण असलेली “संमिश्र शिक्षण पद्धत” भविष्यातील महत्त्वाची व उपयुक्त शिक्षण पद्धत ठरेल यात मुळीच शंका नाही..

      लेखिका-हंचनाळे एस.व्ही.
      वि.शि.कें.प्रा.शा.नुतन भोकर

लेख …सँडविच आणि बर्गर

सँडविच आणि बर्गर

नावावरून हा आरोग्य विषयक लेख असावा अशी बहुतेकांची समजूत होऊ शकते..पण असं काहीही नसून,हा लेख म्हणजे लेखिकेचं सँडविच आणि बर्गर मधलं कन्फ्युजन (अज्ञान) आहे…!

दोन दिवसांपूर्वी मुलीच्या शाळेतून PTM (parent teacher meeting) विषयी ग्रुप वर legal नोटीस आली,ती नोटीस सगळ्या पालकांना पर्सनली देखील आली होती,म्हणूनच जरा सिरीयसलीच वाचली..माझ्या मुलीच्या (जी आता UKG ला आहे) काही दिवसापूर्वी झालेल्या टेस्ट चा निकाल आणि पाल्याच्या पुढील वाटचालीसाठी चर्चा असा काहीसा मीटिंगचा,heavy menu होता.. मुलांच्या शाळेत (PA tests) periodic assessment tests होत राहतात.पण या नंतर आज पहिल्यांदाच निकालासाठी पालकांना शाळेत बोलाविण्यात आलं…

सकाळ पासून meeting ला जायची मुलीची लगबग सुरू होती, माझ्या सोबत आई पण शाळेत बसणार या विचारा मध्येच स्वारी खूश होती..आणि सकाळ पासून मी हे आठवण्याचा प्रयत्न करित होते की, मी शाळेत असताना माझे आई बाबा माझ्यासोबत शाळेत कधी आले होते.. आठवेचना..! (आले असतील तर आठवेल ना..)

मी आणी ती वेळेत शाळेत पोहचलो,पण आमच्या आधीच बहूतेक सिन्सिअर आणि सिरियस पालक येऊन बसले होते.. एक नजर हॉलमध्ये फिरवून मी मुली सोबत पहिल्याच बाकावर बसले..तशी आम्हाला सवय होती असं नाही पण जागा फक्त तिथेच असल्याने पर्याय नव्हता..!

तशी Good morning all..नी,बैठक सुरू झाली.. (English medium you know..!) Teacher च्या बोलण्यातून कळालं की,मुलांनी लिहिलेले टेस्टचे पेपर आम्हाला पाहायला मिळणार होते..ते पाहून आपल्या पाल्यामध्ये आपल्याला काय सुधार करायचा आहे याची कल्पना पालकांना द्यायची होती..आणि सगळ्या पालकांना आपल्या पाल्यांचे पेपर हातात मिळाले,माझ्या मुलीच्या पेपर पाहिल्यावर मला तरी माझ्या पाल्यामध्ये सुधारण्यासाठी काहीही वाव दिसला नाही…अगदी perfect..(माझ्यासारखी).. थोड्या वेळाने miss माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की आर्टिकल्स (A,An,The) मध्ये तिचा एक मार्क कापला गेलाय,आणि दुसरा मार्क हेल्दी फूड आणि अनहेल्दी फूड ओळखता न आल्याने कापलाय..

मी पाहिलं की लेकीने An Engineer नंतर Doctor शब्दाला सुध्दा An Doctor, article वापरलयं.. (पाच वर्षाच्या मुलांना कोण आर्टिकल शिकवतं…)

Engineer ला An सारखा भारीचा प्रत्यय..आणि Doctor ला मात्र साधा A हे काही तिला पटलं नसणार आणि म्हणूनच तिने कसला ही अन्याय न होऊ देता हे असं केलं असणार याची मला खात्री होती..

पूढच्याच पाणावर काही फोटोज होते,त्यात हेल्दी फूड ला राईट तर अनहेल्दी फूडला रॉंग मार्क करायचे होते.फोटोज मध्ये ब्रेड आणि पाव पासून बनवलेले दोन पदार्थ होते त्या दोन्हींनाही हिने रॉंग मार्क केले.. पण हे बरोबर ना.. मग मार्क कसा कापला हे काही मला समजले नाही..

मात्र मिस नी सांगितलं.. ‘mam जो फर्स्ट फोटो है वो है बर्गर,विच इस अनहेल्दी and she is right,मगर जो दुसरा वाला फोटो है सँडविच..सँडविच is the healthy food जो उसने wrong मार्क किया है..’ ‘मगर हम तो उसे घर मे ब्रेड खाने नही देते..’ मी सांगितलं असता त्या म्हणाल्या… ‘क्यो नहीं mam..देणा चाहिए ब्राऊन ब्रेड हेल्दी होता है, and sandwich is made up of brown bread with veggies,with lots of cheese inside.. very healthy..’

माझ्या चेहऱ्यावरचे शून्य भाव पाहून how illiterate..! असं ती मनातल्या मनात म्हणाल्याचं मला ऐकू आलं.. ‘book मे भी है.. आप देख लेना..!’असं म्हणतं माझ्या ज्ञानात भर पाडण्याचा प्रयत्न तिने केला.

‘और कोई doubt..mam ..’ मी नकारार्थी मान डोलावली.. ‘pls उसकी handwriting आप देख लेना उसका u और v एक जैसा लगता है,कभी कभी b और d मे भी वो confuse हो जाती है.. pls look after..’ मला काही सूचना वजा आदेश देऊन,feed back register sign साठी समोर केलं.. बाकीचे पेरेंट्स अजूनही मुलांचे पेपर लक्ष देऊन पाहत होते,काही पालक तर तिथेच मुलांना रागवताना दिसले..मुले बिचारी शिक्षक पालक आणि पेपर यांचा मेळ घालण्यात अगदी शांत झाले होते..अनेक मुलांना पैकी च्या पैकी मार्क पडून ही पालक मात्र समाधानी नव्हते..

पण मी मात्र feed back register वर “satisfied.. Happily Growing..” remark टाकून बाहेर पडले..

‘मम्मा मला किती मार्क पडले..?’ या प्रश्नाला .. मी ‘खूऊऊऊप..’ असं उत्तर देऊन मुलीच्या डोळ्यात खूऊऊऊप.. आनंद पाहत होते .

स्पर्धेच्या नावाखाली.. nursery,lkg,UKG च्या निमित्ताने मुलांपासून लहान पण हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला..? त्याची गुणवत्ता ठरवणारे योग्य मार्क किती..? घरची प्रार्थना आणि शाळेतली prayer या मधली त्यांची दमछाक कोण समजून घेणार..? असे एक नाही अनेक प्रश्न पडतात.. पैकी च्या पैकी मार्क पडणा-या मूलांच कौतुक तर आहेच,पण घरी खात नसून.. घरी unhealthy समज असणा-या ‘अंडी’ या फूड ला फक्त पुस्तकात वाचून परिक्षेसाठी healthy मार्क करणा-या लेकराचा अभिमान नको का वाटायला..!

म्हणून एखाद्या PTM नंतर किंवा एखाद्या exam च्या result नंतर.. एवढ्या लहान मुलांच घरातील आणि शाळेतील वेगळी भाषा,संस्कार, शिकवणी या मध्ये होणारं sandwich खरं तर समजून घेतलं पाहिजे..दुसऱ्या मुलांसोबत compare करत बसण्यापेक्षा, त्यांना एखादी healthy ‘sandwich’ party द्यायला काय हरकत आहे.. खरंतर खूप अभ्यासाची गरज आहेच,पण ती आपल्याला,मुलांचं काय ती तर हुशारच असतात…!

डॉ.स्वाती भद्रे
  नांदेड

लेख…चहातील गोडवा…

चहातील गोडवा…

अचानक एका मित्राची भेट झाली.भेटीप्रसंगी नमस्कार झाला. पुढे मित्राला सोबत घेऊन चहा घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेलो.तिथं गेलं तर नुसती गर्दीच गर्दी प्रत्येकाच्या समोर चहाचा कप दिसत होता.गप्पा गोष्टी मधून त्यांचा आनंद मात्र वेगळाच जाणवत होता.माणसं जशी जशी मोठी होतात ना,तेवढीच ती समजदार पण होतात हे मात्र खरं आहे.आपलेपणा त्यांच्या अंगी येतो आणि मी पणा मात्र बाहेर निघून जातो.आजकाल माणसातला संवाद हरवल्या सारखा पाहायला मिळतो.कारण माणूस एवढा व्यस्त झाला आहे की,कोणासाठी त्याला वेळ नाही.आणि स्वतःसाठी काय करतो हा तिळमात्र मेळ नाही..!

स्वतः बरोबर इतरांच्या सहवासात राहून मनमोकळ्या गप्पा आणि संवाद कशाच्या माध्यमातून करता येईल तर ते म्हणजे चहा होय… चहाच.कारण सकाळी उठल्यावर आपल्याला लागतो तो पण चहा,मित्र परिवार,नातेवाईक,यांच्या भेटीप्रसंगी काय लागतो तर ते म्हणजे चहा, ऑफिसच्या खुर्चीवर बसून थकवा जाणवला तर काय लागतो तर ते म्हणजे चहा,डोकं काम करत नाही.फुल टेन्शन डोकं हलकं आणि मन बोलकं करायचं असेल तर काय लागतो तर ते म्हणजे चहा,रात्रभर अभ्यास करायचा पण झोप येणार नाही.अशी जादू कोणती तर ते म्हणजे चहा..!

खरंच सकाळपासून ते झोपेपर्यंत माणसाला चहा लागतो.म्हणून माणूस हा कायमस्वरूपी आनंददायी जगतो.चहामुळे अनेकांचे वाद मिटले, चहामुळे अनेकांच्या चर्चेला उधाण आले.चहामुळे अनेकांना माणसं जोडता आली.चहामूळे अनेकांना माणसातले वाद सोडता आले. चहामुळे नशेच्या व्यसनाला दूर करता आले.चहामुळे सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग एका ठिकाणी बसून सांगता आले..!

खरंच चहामध्ये किती गोडवा आहे..!

एक साधी गोष्ट तिला महत्व प्राप्त करून का दिलं जातं.तर त्या गोष्टीमध्ये इमानदारीची क्षमता कायमस्वरूपी टिकून राहिली जाते.तिला छोट्या पडद्यावर सुद्धा मोठं आव्हान म्हणून सुद्धा आपल्याला पाहता येत.अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात पेटून उठणाऱ्या सशक्त भावनेच्या भरात ज्यांनी छोट्या माणसाला सुद्धा मान-सन्मान मिळवून दिला.हे सर्व कोणाच्या साहाय्याने तर प्रेमळ आणि जिव्हाळ्याच्या चहातील गोडवा या साखरेच्या पाकातुन ही सर्व माणसं कमावली आणि ही माणस कायमस्वरूपी टिकवून ठेवणारा एकच जल्लोष तो म्हणजे चहातील गोडवा..!

लेखक
– युवा साहित्यिक सोनू दरेगावकर,नांदेड
संपर्क 📲  मो. : ७५०७१६१५३७

कविता….मासीक पाळी

मासीक पाळी

प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते,
हळुच एका दिवशी नाजुक कळीचे फूल होते.

सगळे तुला खूप सांगतील अळीमिळी गुपचिळी,
तु मात्र लाजु नकोस समजुन घे मासीक पाळी.

बोल सारं मोकळं अगं घाबरून नको रडू,
साजरं कर ‘स्त्रीत्व’ तुझं काळजीत नको पडू.

महिन्यातले चार दिवस तुला मैत्रीण मिळाली नवी,
बहरून येशील तिच्यासोबत चिंता कशाला हवी..?

सुरवंटाचं फुलपाखरू होतं कष्ट पडतातच ना थोडे,
तुझ्या असण्याचे उत्तर समज,समजू नकोस कोडे.

‘आईपण’ ‘बाईपण’ तुझ्या पाळी तून साकार होईल,
बालपण संपून तुझं तरुणपण आकार घेईल.

स्वच्छता,व्यायाम,योग निरोगी जीवनाचे सूत्र पाळ,
सकस आहार रोज घ्यावा,जंक फुडचा मोह टाळ.

सॅनिटरी नॅपकिन वापर रोगराई टाळायला,
कपडा सुद्धा चालेल स्वच्छ,उन्हात हवा वाळायला.

ऋतू,भूमी,बीज,पाणी सारा निसर्ग तुझ्यात आहे,
निर्मितीचा हक्क तुझा आणखी सुख कशात आहे..!

हसत नाहीस,बोलत नाहीस,कोपऱ्यात का गं बसतेस,
‘या’ चार दिवसात तर तू आणखी पवित्र असतेस..!!

कवयित्री- डॉ.स्वाती भद्रे-आकुसकर
नांदेड
मो.९९७५४६८०२३

लेख….सात बारा

                              सात बारा

        पुस्तकी ज्ञानाचा,लिहण्याचा व चिंतनाचा प्रत्यक्ष आयुष्याच्या वाटेवर काडीचा ही कधी संबंध आलेला दिसत नाही.उलट चांगला विचार करुन राहणाचा प्रयत्न फसल्यामुळे त्याच्या शरीरात विविध आजार प्रवेश करतात.येवढे निश्चीत आहे.या निष्कर्षावर आणी मतावर मी तरी अलीकडे ठाम झालोय.
        मन लागत नसले की,घरा बाहेर फिरत फिरत रस्ताच्या कडेला चालतांना कधी साधे कुत्र ही आपल्यावर भुंकले तर त्याला जोरात आपण ‘ हार्ड ऽऽ….’ करत काही तरी हातात घेवून कुत्र्यावर फेकल्या सारखे करावे लागते.तेव्हा ते कुत्र थांबते आणी माणूस पुढे जावू शकतो.ही कृत्ती केली तरच ते कुत्र पळून जाते.तत्वज्ञानाने कुत्र पळवता येत नाही.बरं हे झाले प्राण्याचं,पण माणसाचे तसेच हो…काय सांगावे गेली तीन महिने झाले एका दप्तरी रोज फिर फिरतोय.काम काही होईना जीव काही लागेचना…त्यामुळे काम लवकर मार्गी लागण्यासाठी मनाला पटत नसले तरी बाप्पाने घाम गाळून सोयाबीन पिकवलेल्या अन ईमानदारीने विकलेल्या सुगंधी असलेले पैसे त्या सरकारी काम करणा-या व्यक्तीच्या हातावर टिकवले तरी काही ते शासकिय काम पुढे जाईचना.दिलेल्या पैशाने त्याचे मन बदलेना…नेहमी येतो तसेच आल्या पावली परत जात गेलो.परंतू  मनात मात्र पुस्तकी विचारांची आणी महाराष्ट्रात रास आणि गोंडर गाजवलेल्या आमच्या जगदिश कदम गुरुजीच्या ‘ गणित कुठं चुकले ‘ या कविताची सारखी आठवण येत गेली.सरकारी दप्तरी कुठल्या  बिसतान्याची ओळख काढून काम करुन घेण्या पेक्षा पदर मोड करुन  घेतलेली बरी.चार दोन पैसे हातावर टिकवायचे अन चटकन काम करुन घेयाचे ही वरवर साधी,सोपी पध्दत सर्वानी व्यवहारात आणलेली होती.म्हणून न कळत भष्टाचार अलिखीत सर्वाना मान्य झाल्या सारखा होता.इकडे या सरळ शिकलेल्या अन चारदोन पुस्तकी बाता समाजात हाणलेल्या माझ्या मनाला काही पटेना गेले.

चारचौघात काही सांगायला जावाव तर ते बी जमना…  तोंड दाबून बुक्याच्या मार सहन करत बस तशाच बोंबलत अशी गत त्या सरकारी दप्तरी या माझ्या जीवाची झालेली व्हती.बरं शिकून सवरुन ही गत नशिबी आली होती.त्याचं दु:ख माझ्या जीवाला फार वेदनादायी होते.ते लपवत एका झाडा खाली सावलीचे मी तस्याच विचारात थांबलेला. येवढ्यात माझ्या नेकीने राहण्याची,जगण्याची,वागण्याची पुस्तक लिहण्याची त्याला परिस्थिती ठावूक असलेला माणूस समोर हून आला. तो माणुस माझ्या सरळ वागण्यावर कायम जीव लावायचा… कामापुरता शिकलेला म्हणून की काय की पण त्याचे पाय मातीवर असल्यामुळे आमच्या प्रत्येक भेटीत आपुलकीने दोन गोष्टी बोलून पुढे अंगावरची दस्ती कायम उढवत जायाचा…या त्याच्या वागण्यामुळे माझे अंग फुगायचे… आपण पुस्तक लिहतो त्याचे परिणाम आहे असे कायम वाटायचे… की,मला तो खिजवायचा.ते कधीच समजले नव्हते.
      तसा तो वाईट ही नव्हता पण त्याच्या वाट्याला गेला तर तो एका फटक्यात सरळ करुन सोडायचा.त्याच्यामुळ याला सर्व टरकून राहत गेले.त्याच्या शब्दाला समाजात किंमत होती.असे म्हणायला हरकत नव्हती.आयुष्याच्या वाटेवर जिकडे जाईल तिकडे त्याच्या शब्दाला अन वागण्याला किंमत नक्कीच होती.त्याने सांगीतलेले कोणते ही काम कोणत्याही सहकारी दप्तरी एका झटक्यात करुन आणत गेला.लईच मोठ काम असले तर चारदोन पैसे कुणाच्या तरी हातावर टेकवून लोकांची कामे करुन गळ्यातली दस्ती उडवत मोठ्या एैटीत लिडर म्हणून समाजात फिरत गेला. असा माणूस आज,आता मला चटकन पुढे भेटला.नेहमी सारखी भेटीत बोलतो तसे न बोलता त्यांने सरळच विषयाला हात घालत म्हणला..
  ” कसे काय सर ? इकडे आज … व्याख्यान बिख्यान हाय की काय  ?” असा प्रश्न करत त्याने ठोकळ डोळे त्या सरकारी ऑफीसवर फिरवले.तो नेहमीच या पध्दतीने साहित्यिकांची टळ उडवायचा.. तसे त्याचे खरे ही होते म्हणा… समाजात नेत्या येवढे उच्च स्थान अनपड असून ही इतर कुणालाच मिळाले नाही म्हणा.. मी पुस्तकी शब्दात कामाचे स्वरुप सांगीतले.त्याला ते चटकन कामाचे सारे काही समजून आल्या सारखे करत गळ्यातली दस्ती मागे टाकत म्हणला…
      ” अर्धा एक घंटा इथंच थांबा… सावलीला बसून रहा गुमान.. मी जावून येतो मधून ” चार दोन पावल पुढ गेलेला माघे अजून येत हाताने दोन बोटाने नोटा मोजतो तसा इशारा करत म्हणला….
” बरं त्याचे त्याला दिल का ?”
मी हो म्हणत मान हालवत त्याच्या बोलण्याकडे एकटक पाहत तसाच थांबलो.इथ येवढे दिवस गेले चकरा मारतो काम नाही झाले.मग एक घंटा अजून थांबू इथच.त्यात काय होते.
       बराच वेळ गेला.तरी मधून बाहेर कुणी येईना.मनाला वाटले या माणसांने ही आपल्या सरळ स्वभावाला फसवले. आपली टिंगल करत आत गेला ते बाहेर आलाच नाही.असे वाटू लागले.येवढ्यात त्याची ते दस्ती हवेत उढायेली ठळक नजरेत भरली.तो जवळ येत माझ्या डोळ्या समोर तो कागद हलवत,नाचवत म्हणला…
” घ्या…सर…. तुमचे काम झाले.”
त्याच्या बोलण्यात मला काही विश्वास बसला नाही.म्हणून ते कागद उघडून आत डोकावून पाहिले.त्या कागदावर आपले पुर्ण नाव दिसले.त्यावेळी जीवाला किती तरी समाधान वाटले.आयुष्याच्या वाटेत सातबाराच्या कागदावर पहीलांदा आपले नाव वाचून मन खूष झाले होते.आपले नाव आता सातबारावर आहे.याचा केवढा अभिमान वाटून गेला.तो क्षण फक्त या माणसामुळेच पाहायला मिळाला.
म्हणून त्याच्या गळ्याला वयाने मी मोठा असून ही प्रेमाने मिठ्ठी मारली.मनात मात्र अनेक प्रश्न घेवून पुन्हा आयुष्याची वाट चालू लागलो.का आपले येवढी पुस्तक समोर पाहलेली, वाचली व लिहली तरी एक ही पुस्तक प्रत्यक्ष कामाला आली नसेल ?
की,आयुष्याच्या कपाटातील अनुभावाचे पुस्तके वेगळी व  छापलेली पुस्तके वेगळी आहेत ?आज घडीला तर याचे उत्तर माझ्याकडे नव्हते.

                         विजय चव्हाण,नांदेड
                            ९९२२३४९९४०

कविता….आयुष्य

॥ आयुष्य॥

नित्य नवा अनुभव
तुझी आठवण
माझ्या आयुष्यातली
हीच अमूल्य साठवण
वाटेल तेव्हा सोडावी
आठवणींची शिदोरी
एखादी खट्याळ
एखादी लाजरी
वाटे परत यावे
ते गेलेले दिवस
कधी सुखाची पौर्णिमा
कधी दुःखाची अमावस
झोकून द्यावे स्वतःला
समुद्रात आठवणींच्या
कुशीत जाऊन दडावे
त्या गेलेल्या काळाच्या
एकदा भूतकाळात गेल्यावर
परत जाऊ नये भविष्यात
असा एखादा चमत्कार
घडेल का माझ्या आयुष्यात..?
असा एखादा चमत्कार
घडेल का माझ्या आयुष्यात..?

         कवयित्री – प्रिती कंठके(केतकी)

कविता….भविष्यवाला बाबा

भविष्यवाला बाबा

भविष्यवाल्या बाबाची झाली एकदा भेट
हात पाहून माझा भविष्य सांगायला लागला थेट
ग्रह तारे,राहू केतू,मंगळ शनि,बोलत होता
बिन भांडवली धंदा छान छान चालवत होता

स्वभाव गोड तुम्ही नेक पण जवळच्या पासून धोका
टाळायचा आहे शाप शनी तर मी सांगतो ते ऐका
कडक इस्त्री पैसेवाला साहेब दिसला छान
भीती त्यास दाखवल्याशिवाय देणार नाही दाम

या बाबांनी सांगितल्या खूप भाकडकथा
समजून पैसेवाला अनेक मागण्या घालत होता
मी मात्र स्तब्ध,तो बोलून बोलून थकला
तुम्ही आता बोला म्हणून जमिनीवर घेऊन बसला

प्रश्न मला पडला काय काय बोलावे बाबाला
बसवेश्वर चक्रधर,नामदेव ज्ञानदेव,तुकोबा ज्योतिबा,
चांद्रयान मंगळयान नवनवे किती शोध मानवता सदाचार परोपकार यात देव

खूप खूप ऐकल्यावर
बाबा आता बोलत होता
अज्ञानी जणांना फसवून
का सांगता तुम्ही भविष्य
याचे उत्तर देत होता

अडाणी माणसापेक्षा बुद्धिवान लवकर फसतात
माझ्या प्रवचनाला चिकित्सा नकरणारे विद्वान जास्त असतात

सुंदर बायको मिळावी,
व्यापार छान चालावा,
नोकरी चांगली लागावी,
यासाठी माझ्याकडे येतात ग्रॅज्युएट तरुण
पण;…..
तू जे माझ्याशी बोललास त्यामुळे मन आले भरून

माहित आहे मला यंत्र तंत्राचा करिष्मा गॅलिलिओ,राईट बंधू
अंतराळातील मोहिमांचा शोध
खूपदा घेतला मी यांच्याकडूनही बोध

काय करू मी आता मात्र थकलो आहे माझ्या मनातील स्वगत तुला सांगतो आहे

पदवी घेऊन व्यवसाय करण्यासाठी गेलो बँकेकडे
गॅरेंटर सर्च रिपोर्ट काढून त्यांनी झिडकारले
नोकरी करावी म्हणून वळलो संस्थानिकाकडे
डोनेशनचे आकडे पाहून पळालो शेतीकडे

पाऊस पडेना शेती पिकेना, झाली वाताहात
पुढाऱ्यांच्या मागेपुढे फिरलो रातोरात  भ्रमिष्ट झालो काही दिवस काय करावे सुचेना
अंधाऱ्या या आयुष्यात उजेड काही दिसेना

चार घरी मागून आता दारोदारी फिरतो नवे काही सांगून बायकापोरांची पोट भरतो
तूच सांग मित्रा, आता काय करू
का औषध घेऊन… कायमच मरू
कायमच मरू का… कायमच मरू..?

                 कवी
         प्रा.डॉ.व्यंकटी पावडे
के.आर.एम.महिला वरिष्ठ महाविद्यालय,नांदेड.
भ्रम.क्र.९६५७२७८२१७

कविता….दुष्काळ

दुष्काळ

आयुष्या लाभला
काट्या कुट्याचा र धुरा…
पडित आलंया
उभ्या संसाराचा तुरा…

पदरात भरलाय सपान
मोडीचा र चुरा…
कष्टाच्या सावलीत
काळवडलाय रंग गोरा…

दोन सुखाच्या दाण्यानं
ओंजळ माही र भरा…
टिपून दाणे चोंचत
वाढवी मी हो पोरा…

आस माय लय मोठी
अंगी नेसावी म्हणते मोराचा र पिसारा…
पण,वंगाळ दिसान हाती भरला
तुटक्या काचाच हो चुरा…

कवयित्री- सौ.रूचिरा बेटकर,नांदेड.

लेख…भारत-रशियातील परराष्ट्रसंबंधांची पंच्च्याहत्तरी-ऐतिहासिक उपक्रमाने केलोत साजरी

भारत-रशियातील परराष्ट्रसंबंधांची पंच्च्याहत्तरी-ऐतिहासिक उपक्रमाने केलोत साजरी

75th Years  of Indo-Russian Diplomatic Relations: Reflections in Art,Culture and Literature.
‘भारत-रशियातील परराष्ट्रसंबंधांची पंच्च्याहत्तरी : साहित्य आणि कला,संस्कृती वरील प्रभाव’ या विषयावर मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मॉस्को रशिया,या रशियातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय ग्रंथालयामध्ये ही परिषद पार पडली.मुंबई विद्यापीठाच्या “साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र”, सेंटर फॉर सेंट्रल युरेशियन स्टडीज, अखिल भारतीय साहित्य परिषद महाराष्ट्र आणि रशियामधील लोमोनोसोव मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ ओरिएंटल स्टडीज ऑफ द रशियन अकॅडमी ऑफ सायन्सेस, पुश्किन रशियन लँग्वेज इन्स्टिट्यूट,आणि सेंट पीटर्सबर्ग युनिव्हर्सिटी ही सहा विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या दि.१४ व १५ सप्टेंबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील परिषदेच्या सुरुवातीला साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मार्गारिटा रूडोमिनो ग्रंथालयाच्या जगप्रसिद्ध प्रांगणामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिततीत व महाराष्ट्र विधान मंडळाचे अध्यक्षराहुल नार्वेकर यांच्या विशेष उपस्थित पार पडले.मार्गरिटा रुडूमिनो ग्रंथालयाचे संचालक पावेल एल.कुझमीन आणि ग्रंथालयाचे इतर अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कार्य कर्तुत्वावर प्रकाशझोत टाकणारी एक पाच मिनिटाची चित्रफीत संस्थेच्या भव्य प्रांगणामध्ये डिजिटल वॉलवर दाखवण्यात आली.प्रा.डॉ.बळीराम गायकवाड व प्रा.सोनू सैनि,दिल्ली यांनी बनवलेली ही शॉर्ट फिल्म सर्वांचं लक्ष आकर्षित करून घेणारी ठरली.
भारत आणि रशिया या दोन्ही देशांचे राष्ट्रगीताने ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली.पावेल एल श.कुझमीन ह्यांनी या पुतळा अनावरणाच्या प्रसंगी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील आंतरराष्ट्रीय प्रवाह आणि त्यांच्या  विचारांची समकालीन गरज आणि त्या अनुषंगाने अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे त्यांच्या संस्थेमध्ये होत असलेले अनावरण यासंदर्भामध्ये भूमिका मांडली आणि भारतातून आलेल्या सर्व मान्यवरांचे त्यांनी स्वागत केले.त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर सेंट्रल युरेशन स्टडीज विभागाचे संचालक डॉ.संजय देशपांडे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या आनावरणाचे द्विराष्ट्रीय संबंध बाबत असलेले महत्त्व विशद केले.यासाठी कार्यरत असलेले विविध संस्था व यांच्या योगदानाबाबतही त्यांनी माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याची महती विशद करताना अण्णा भाऊ साठे स्वतः एक चालते बोलते विद्यापीठ होते आणि त्यांच्या साहित्यावरच अनेक विद्वान कशाप्रकारे पी.एच.डी.सारखं उच्च विद्याविभुषित शिक्षण घेत आहेत हे अधोरेखित केले.
या कार्यक्रमाप्रसंगी बोलत असताना महाराष्ट्र विधान मंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि विधानमंडळामध्ये पारित झालेला ठराव पुनश्च एकदा या कार्यक्रमाच्या ठिकाणी वाचून दाखवला,संस्थेला धन्यवाद दिले आणि तो ठराव या संस्थेचे डायरेक्टर जनरल पॉवेल कुझमीन यांना सुपूर्त केला.

भारत सरकारच्या आयसीसीआर संस्थेचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्त्रबुद्धे हे या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित होते.त्यांनी या घटनेकडे भारत रशिया द्विराष्ट्रीय संबंधांच्या दृढी करणच्या अनुषंगाने कसे पाहिले जाऊ शकते किंवा पाहायला हवे या अनुषंगाने मांडणी केली.
रशियन सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कल्चर विभागाचे अधिकारी नागेझदा एरकिमन आणि मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स रशिया यांच्या अधिकाऱ्यांचीही या ठिकाणी भाषणे झाली.अण्णाबभाऊ साठे यांच्या साहित्याचे रशियन भाषेमध्ये उपलब्ध असलेले साहित्य त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रांसाठी आणि मानवतेच्या लढ्यासाठी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे महात्म्य या अनुषंगाने या अधिकाऱ्यांनी मांडणी केली.आणि या सर्व मनोगता नंतर या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन करणारे मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक प्रा.डॉ.बळीराम गायकवाड यांनी सर्व उपस्थितांना आपण एका नेतृदीपक,ऐतिहासिक क्षणाचे साथीदार होत आहोत असा उद्घोष करत सर्व मान्यवरांना अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याची विनंती केली.आणि पॉवेल कुझमिन,देवेंद्र फडणवीस,राहुल नार्वेकर या मान्यवरांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.अण्णा भाऊंच्या साहित्यावर प्रचंड प्रेम करणारा वाचक वर्ग,तिथला रम्य निसर्ग यांचीही प्रामुख्याने येथे उपस्थिती लाभली.रशियातील भुरभुरणारा पाऊस बोचऱ्या थंडीमध्येही न चुकता उपस्थितांच्या भेटीला आला आणि संपूर्ण वातावरण बहरून गेले.
या परिषदेचा दुसरा टप्पा म्हणजे परिषदेचा उद्घाटन सोहळा. पॉवेल कुझमीन डायरेक्टर जनरल यांनी स्वागताध्यक्ष या भुमिकेतून या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या आयोजना संदर्भातली भूमिका मांडली.यानंतर सेंटर सेंट्रल युरेशियन स्टडीज संचालक डॉ.संजय देशपांदे यांनी प्रास्ताविक केले आणि सर्वांचे स्वागत केले.यानंतर १९६० च्या दशकामध्ये अण्णा भाऊ साठे यांचे रशियन भाषेमध्ये भाषांतरित झालेल्या साहित्याच्या प्रति खूपच कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने ह्या परिषदेच्या निमित्ताने “बुंतार” या अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या रशियन भाषांतरित ग्रंथाचे पुनर्प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी अण्णा भाऊ साठे लिखित “माझा रशियाचा प्रवास” या पुस्तकाचा प्रा.अश्विन रांजणीकर यांनी केलेल्या इंग्रजी अनुवादित पुस्तकाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले.
यानंतर सदरील “बुंतार” या पुस्तकातील काही परिच्छेद मराठी, इंग्रजी,हिंदी आणि रशियन भाषांमधून वाचन करण्यात आले. पॉवेल कुजमिन यांनी रशियन भाषांतर देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा भाऊंच्या मराठी परिच्छेदाचे वाचन,तर राहुल नार्वेकर यांनी अण्णा भाऊंच्या साहित्यातील इंग्रजी परीच्छेदाचे वाचन केले.डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी अण्णा भाऊंच्या साहित्यातील  हिंदी भाषेतील परिच्छेदाचे वाचन करून मार्गदर्शन केले.
यानंतर या आंतरराष्ट्रीय परिषदेला शुभेच्छा पर विचार मांडण्यासाठी देवेंद्र फडणवीस,राहुल नार्वेकर,डॉ.विनय सहस्त्रबुद्धे यांनी सभागृहाला उद्देशून भाषण केले.
यानंतर रशियन सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कल्चर आणि डिपार्टमेंट ऑफ सोशल डिप्लोमसी विभागाच्या एकतेरीना तोरूबारोवा यांनीही विचार मांडले.
लोमोनोसोव मास्को स्टेट युनिव्हर्सिटीचे इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीचे संचालक प्रा.अलेक्सी मसलाव यांनी अण्णा भाऊ साठेंचे साहित्य आशियाई आणि युरोपीय देशांसाठी कसे महत्त्वपूर्ण आहे या अनुषंगाने मांडणी केली.
प्रा.ए.स्टयालीराव,रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फोर हुम्यानिटी यांनी या परिषदेचे अनन्यसाधारण महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले.
त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राच्या अभ्यास मंडळाचे सदस्य सुनील वारे यांनीही अध्यासनाची भूमिका मांडली आणि मार्गरिटा रुडोमिनो संस्थेशी तीन वर्षापासून सुरू असलेला पत्रव्यवहार आणि सदरील परिषदेसाठी कराव्या लागणाऱ्या अनेक आवश्यक गोष्टींचा लेखाजोखा मांडला.
या परिषदेमध्ये सॅमी कोटवानी,अध्यक्ष इंडियन बिझनेस अलायन्स मॉस्को, यांनीही विशेष निमंत्रित म्हणून पूर्णवेळ हजेरी लावली होती आणि भारत मैत्री संबंधांना आणि व्यापार दृढ करन्याची गरज अधोरेखित केली.अभिषेक सिंग,व्हाईस प्रेसिडेंट दिशा फाउंडेशन,इगोर सिद,पब्लिशर इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅव्हल यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.दिगंबर शिर्के यांनी पाठविलेल्या शुभेच्छा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्राचे संचालक डॉ.बळीराम गायकवाड यांनी वाचून दाखवल्या.प्रा. सुहास पेडणेकर,माजी कुलगुरू,प्रा.रवींद्र कुलकर्णी,माजी प्र- कुलगुरू यांच्या ही शुभेच्छा प्रा.बळीराम गायकवाड यांनी वाचून दाखवल्या.
त्यानंतर हिंदी,इंग्रजी आणि मराठी भाषेतून आभार प्रदर्शन केले गेले.
प्रा.बोरिस झखारिंन,यांनी रशियन भाषेतून,डॉ.बळीराम गायकवाड यांनी मराठीतून तर डॉ. सोनू सैनी यांनी हिंदीतून आभार प्रदर्शन केले.

यानंतर के.रत्नप्रभा (आयएएस) यांचे विशेष सत्रात अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर झाले..सदरील सत्रात लुदमिला खोखलोवा यांनी ही मत मांडले.डॉ.नरेंद्र पाठक-अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र अध्यक्ष यांचे ही विशेष व्याख्यान झाले .
एकूण ३६ शोध निबंधाचे वाचन ह्या दोनदिवसीय परिषदेमध्ये करण्यात येऊन भारत-रशियातील परराष्ट्रसंबंधांची पंच्च्याहत्तरी-अशा आप्रकारे ऐतिहासिक उपक्रमाने केलोत साजरी…

प्रा.डॉ.बळीराम गायकवाड
संचालक
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे अध्यासन केंद्र
मुंबई विद्यापीठ तथा
मा.कुलसचिव मुंबई विद्यापीठ आणि
प्राचार्य-कोकण ज्ञानपीठ महाविद्यालय उरण.

आपल्या लोकप्रिय ‘अंबुज प्रहार न्युज लाईव्ह’ मराठी ऑनलाईन समाज माध्यम वृत्तवाहिनीच्या ‘दिवाळी विशेषांक-२०२२’ साठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केले आहे आणि अमुल्य योगदान दिले आहे.त्या सर्व सन्माननियांचे आम्ही शतशः ऋणी आहोत.सर्वांचे अगदी मनापासून खुप खुप धन्यवाद!

विशेषतः – अंबुज प्रहार न्युज लाईव्ह मराठी ऑनलाइन वृत्तवाहिणी वेब पोर्टलवर सदरील दिवाळी अंक देण्यात आला असून यातील लेखक कविच्या मजकुरांनी संपादकीय मंडळ सहमत असेल असे नाही- संपादक

उत्तम बाबळे,संपादक आणि अंबुज प्रहार परिवार


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !